-चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील छोटी शहरे रेल्वेने जोडण्यासाठी ब्रॉडगेज मेट्रोची संकल्पना मांडली होती. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भातील भंडारा रोड ते भंडारा शहरापर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याला नुकतीच मान्यता दिली. त्यामुळे काहीसा मागे पडलेला विदर्भातील ब्रॉडगेज मेट्रोचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. छोट्या शहरांना जोडणारा हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल का आणि तो प्रत्यक्षात येईल का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

काय आहे ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प?

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला लगतच्या शंभर-दीडशे किलोमीटर परिघातील शहरांना मेट्रोने जोडणारा हा ब्रॉडगेज मेट्रो एक प्रवासी रेल्वे प्रकल्प आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार असून संचालन महामेट्रो करणार आहे. नागपूर ब्रॉडगेज मेट्रोसाठी अर्बन मास ट्रान्झिट कंपनीने तयार केलेल्या अहवालानुसार अंदाजे २७० किमीचा ४१८ कोटींचा हा प्रकल्प आहे. भारतीय रेल्वेच्या रुळांवरून तीन डब्यांची मेट्रो ताशी १६० किमी प्रती तास या वेगाने धावेल. प्रत्येक गाडीची प्रवासी क्षमता ८८५ प्रवासी असेल. महाराष्ट्र सरकारने मार्च २०१९ मध्ये ब्रॉडगेज मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. रेल्वे बोर्डानेही त्याच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला (डीपीआर) मान्यता दिली.

प्रकल्पाची विदर्भात गरज का?

नागपूर हे विदर्भाचे प्रमुख शहर आहे. विदर्भाची राजधानी अशी या शहराची ओळख आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने मध्य भारताचे ते प्रमुख व्यापार केंद्र आहे. सर्वच प्रकारच्या उच्च शिक्षणाची व्यवस्था, अद्ययावत वैद्यकीय उपचाराची सुविधा, केंद्र व राज्य सरकारची प्रमुख राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यालये येथे आहेत. आजूबाजूच्या गावातील मुले येथे शिक्षणासाठी, रोजगारासाठी येतात, रोज हजारो कर्मचारी रेल्वेने ये-जा करतात.  शेतकरी, दुग्ध व्यावसायिक रेल्वेनेच त्यांचा माल विक्रीसाठी नागपुरात आणतात. प्रवासी गाड्यांची सध्याची अवस्था, त्यात होणारी गर्दी आणि प्रवासात जाणारा प्रचंड वेळ यासाठी जलदगतीने धावणाऱ्या लोकल गाड्यांची गरज अनेक वर्षांपासून होती.  

विदर्भातील कोणती शहरे जोडली जाणार? 

नागपूर मेट्रो रेल्वेची फीडर सेवा म्हणून ब्रॉडगेज मेट्रो चालवली जाईल. त्याद्वारे विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, बल्लारपूर, नरखेड, काटोल, रामटेक, भंडारा आणि छिंदवाडा (लवकरच नागभीड) आदी शहरांना नागपूरशी जोडले जाईल. नागपूर-भंडारा कॉरिडॉर ५९.२. किलोमीटर लांबीचा असेल आणि त्यात नऊ स्थानके असतील. नागपूर-वर्धा हा ७८.८७ किमीचा असेल व त्यात ११ स्थानके असतील. नागपूर-नरखेडचे अंतर ८५.५३ किमीचे आणि १० स्थानके असतील. नागपूर-रामटेक अंतर ४१.६ किमीचे व मार्गात सहा स्थानके असतील. प्रत्येक स्थानकांचे सरासरी अंतर ७.५.किमी असेल. 

प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन काय?

पहिला टप्पा २०३१पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दुसरा टप्पा २०३१ नंतर सुरू होईल. या प्रकल्पात महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार आणि महा मेट्रो यांचे भागभांडवल असेल. नागपूर मेट्रो प्रकल्पाला अर्थपुरवठा करणारी आंतरराष्ट्रीय वित्त संस्था केएफडब्ल्यूकडून कर्ज घेण्याचे नियोजन आहे. त्याची जबाबदारी महामेट्रोकडे  देण्यात आली आहे.

विदर्भातील लोकांचा फायदा काय?

रेल्वेच्या विद्यमान पायाभूत सुविधांचा वापर करून नागपूरसह विदर्भातीतील शहरांना, जलद आणि आरामदायी सेवा देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. त्याचा फायदा विदर्भातील प्रवाशांना होईल. विदर्भातून मोठ्या संख्येने विविध कारणांसाठी नागपूरला जाणाऱ्या रोजच्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे खाजगी वाहने आणि वाहतूक सेवांवरील अवलंबित्व कमी होईल. तसेच वाहतूक कोंडी, रस्ते अपघात आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल. शेजारच्या जिल्ह्यातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार सर्व घटकांची सोय होईल.

ब्रॉडगेज मेट्रोसाठी डबे कुठे तयार करणार?

नागपूर मेट्रोसाठी चीन येथून डबे आणण्यात आले. ब्रॉडगेज मेट्रोसाठी ‘वंदे भारत’ या द्रुतगती रेल्वेगाडीचे डबे वापरण्याचे प्राथमिक नियोजन आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यात गुंतवणुकीसाठी नागपूर-विदर्भातील गुंतवणूकदारांना आवाहन केले होते. साधारणत: तीन डब्यांच्या एका गाडीची किंमत २४ कोटी निर्धारित करण्यात आली होती. परिचलन व देखभालीसाठी सुमारे ६ कोटी रुपये, असा ३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. खासगी गुंतवणूकदारांनी मेट्रो खरेदी केली असती तर देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच अभिनव प्रयोग ठरला असता. मात्र, या प्रस्तावाला पुढे गती मिळाली नाही. आता रेल्वेने ब्रॉडगेज मेट्रोसाठी डब्यांसह गाडी उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली.

प्रकल्पापुढील आव्हाने, अडचणी कोणत्या?

रेल्वे मंडळाने २०१९मध्ये या प्रकल्पाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल मंजूर केला होता. काही त्रुटींमुळे आणि निधीच्या व्यवस्थेमुळे तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. प्रायोगिक तत्त्वावर प्रथम नागपूर-वर्धा या मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो सुरू केली जाण्याची शक्यता आहे.  ब्रॉडगजेसाठी वंदे भारतचे डबे वापरल्यास रेल्वेस्थानकांवरीस फलाटात सुधारणा करावी लागेल. सध्या फक्त नागपूर, सेवाग्राम आणि वर्धा स्थानकावरच ही सोय आहे. ब्रॉडगेजचे संचालन मेट्रो करणार असले तरी  मेट्रो आणि रेल्वे यांच्यातील महसूल वाटपाचा मुद्दा कायम आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur broad gauge metro project will have seven corridors three new lines planned print exp scsg