-मंगल हनवते
‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले नाहीत, तर अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे…’ या अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन केनेडी यांच्या वाक्याचा हवाला देत आता राज्य सरकारने महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्था आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात आता ५००० किमीच्या द्रुतगती म्हामार्गांचे जाळे विणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याच प्रकल्पात नागपूर ते गोवा या ७६० किमीच्या महामार्गाचा समावेश आहे. समृद्धी महामार्गापेक्षाही लांब असा हा राज्यातील महामार्ग असेल. या महामार्गामुळे भविष्यात नागपूर ते गोवा हे अंतर २० ते २२ तासांऐवजी केवळ आठ ते दहा तासांत पार करता येणार आहे. हा महामार्ग नेमका कसा आहे याचा हा आढावा….
राज्यात पाच हजारांहून अधिक किमीचे महामार्गांचे जाळे…
राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि जिल्ह्याजिल्ह्यातील अंतर कमी करून त्यांचा विकास साधण्यासाठी सरकारने राज्यात पाच हजारांहून अधिक किमीच्या महामार्गांचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा महामार्गाने जोडून प्रवास अतिजलद करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार ५२६७ किमीच्या महामार्गांचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुमारे ४२१७ किमीच्या द्रुतगती महामार्गांची कामे केली जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय)च्या माध्यमातून सुमारे १०५० किमीच्या महामार्गांची बांधणी केली जाणार आहे. एमएसआरडीसीच्या प्रकल्पात १५ महामार्गांचा समावेश असून यातील मुंबई ते पुणे हा ९४ किमीचा महामार्ग सेवेत दाखल आहे. तर मुंबई ते नागपूर या ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. इतर १३ महामार्गांचे काम सुरू होणे बाकी आहे. याच १३ प्रकल्पांतील एक महत्त्वाचा आणि सर्वांत मोठा महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा महामार्ग.
नागपूरसाठी आणखी एक महामार्ग?
राज्याची राजधानी आणि उपराजधानी यांच्यातील अंतर कमी करून या दोन्ही शहरांना जवळ आणण्यासाठी मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग बांधला जात आहे. या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई अंतर केवळ आठ तासांत पार करता येईल, असा दावा केला जातो. हा प्रकल्प नागपूर आणि विदर्भाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाद्वारे नागपूर मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांशी जोडले जाणार आहे. मात्र त्याच वेळी नागपूर कोकणाशीही थेट जोडले जावे याकरिता नागपूर ते गोवा महामार्ग प्रकल्प एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. त्यामुळे आता समृद्धीनंतर आणखी एक महामार्ग नागपूरला इतर जिल्ह्यांशी जोडणार आहे.
नागपूर ते गोवा महामार्ग कसा असेल?
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा महामार्ग बांधण्यात येणार आहे. ७६० किमीचा हा महामार्ग विदर्भातील वर्धा येथून सुरू होणार असून सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे संपणार आहे. वर्धा येथून हा मार्ग समृद्धीद्वारे नागपूरला जोडण्यात येईल. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा १२ जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे चारही विभाग या महामार्गाने जोडले जातील. ७०१ किमीच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी ५५ हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तिथे नागपूर ते गोवा महामार्गासाठी अंदाजे ७५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आजच्या घडीला नागपूर ते गोवा अंतर रस्तेमार्गे पार करण्याकरिता २१ ते २२ तास लागतात. हे अंतर १००० किमीपेक्षा अधिक आहे. हा महामार्ग झाल्यानंतर मात्र हे अंतर ७६० किमीवर होणार असून प्रवासाचा वेळ २० ते २१ तासांवरून केवळ आठ ते दहा तासांवर येणे अपेक्षित आहे.
शक्तिपीठ महामार्ग हे नाव का?
नागपूर ते गोवा महामार्गाला ‘शक्तिपीठ महामार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. कारण हा महामार्ग महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि पत्रादेवी अशा शक्तिपीठांना जोडतो. तसेच हा महामार्ग ज्या जिल्ह्यातून जाणार आहे त्या त्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या देवस्थानांपर्यंत तो जोडण्यात येणार आहे. त्यामुळे याला नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. रेणुका माता, सेवाग्राम आश्रम, औंढा नागनाथ, नांदेड गुरुद्वारा, सिद्धेश्वर, परळी-वैजनाथ, पंढरपूर, तुळजाभवानी, महालक्ष्मी आणि पत्रादेवी अशा धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवास हा महामार्ग सुकर करेल.
महामार्गांचा त्रिकोण…
एमएसआरडीसीकडून मुंबई ते सिंधुदुर्ग हा अंदाजे ४०० किमीचा पर्यावरणपूरक द्रुतगती महामार्ग (ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे), मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग आणि नागपूर ते गोवा द्रुतगती महामार्ग असे तीन प्रकल्प आता राबविण्यात येत आहेत. या तिन्ही प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील ३०हून अधिक जिल्हे जोडले जाणार आहेत. महामार्गांचा त्रिकोण यामुळे साधला जाणार आहे.
प्रकल्पाची सद्यःस्थिती काय?
शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला येत्या दीड ते दोन वर्षांत सुरुवात करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. कारण समृद्धी महामार्गाचे काम एक ते दीड वर्षांत संपणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प संपल्याबरोबर दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाला अर्थात शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएसआरडीसीने आता या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी मागील आठवड्यात निविदा मागविली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून सल्लागाराची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर सल्लागाराकडून आराखडा तयार करून घेत तो मंजूर करून घेतला जाईल. त्यानंतर बांधकामासाठी निविदा काढून ती अंतिम करून मग बांधकामाला सुरुवात करण्यात येईल. बांधकामापूर्वीची प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू करण्यास दोन वर्षे तरी लागण्याची शक्यता आहे. काम सुरू झाल्यापासून पाच ते सात वर्षांचा कालावधी काम पूर्ण होण्यास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर ते गोवा असा अतिजलद प्रवास करण्यासाठी नागरिकांना किमान २०२८-२९ पर्यंत वाट पाहावी लागेल.