ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमानवाढ आदींचा फटका जगाला बसत आहे. आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून, त्याचा सर्वाधिक परिणाम नामिबिया देशावर झाला आहे. देशात अन्नधान्याचा भीषण तुटवडा निर्माण झाला आणि भूकबळीने लोकांचा मृत्यू होत आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी १.४ दशलक्ष लोकांना याची सर्वाधिक झळ बसताना दिसत आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांचे पोट भरण्यासाठी नामिबियाने डझनभर हत्ती आणि पाणघोड्यांसह शेकडो वन्यप्राण्यांना मारण्याची योजना आखली आहे. नामिबियात ही परिस्थिती नेमकी कशी उद्भवली? खरंच या देशात शेकडो प्राण्यांची हत्या करण्यात येईल का? याचा काय परिणाम होईल? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
सातशेहून अधिक प्राण्यांना ठार मारून, त्यांचे मास लोकांना खाऊ घालण्यास देण्याचे आदेश नामिबिया सरकारने दिले आहेत. एकूण ७२३ प्राण्यांमध्ये ३० पाणघोडे, ६० म्हशी, ५० काळवीट, १०० ब्ल्यू वाइल्ड बीस्ट (जंगली बैल), ३०० झेब्रा, ८३ हत्ती व १०० नीलगाई यांचा यात समावेश आहे. त्यातील १५० हून अधिक प्राण्यांना आधीच मारून, त्यातून ६३ टन मांस मिळवण्यात आले आहे. “हे करणे आज आवश्यक आहे. नैसर्गिक संसाधनांचा वापर नामिबियाच्या नागरिकांच्या फायद्यासाठी केला जात आहे,” असे देशाच्या पर्यावरण, वनीकरण आणि पर्यटन मंत्रालयाने २६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नामिबियामध्ये भीषण दुष्काळयुक्त स्थिती निर्माण होण्याचे कारण काय?
नामिबिया हा दुष्काळग्रस्त प्रदेश दक्षिण आफ्रिकेत स्थित आहे. या प्रदेशात भीषण दुष्काळयुक्त स्थिती वारंवार निर्माण झाली आहे. २०१३, २०१६ व २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणातील दुष्काळामुळे या देशाने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती. परंतु, सध्याचा दुष्काळ मोठा आणि विनाशकारी आहे, असे नामिबियातील जागतिक वन्यजीव निधीचे संचालक ज्युलियन झेडलर यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले. ऑक्टोबर २०२३ मध्ये बोत्सवानामध्ये दुष्काळाची सुरुवात झाली. पुढे हा दुष्काळ अंगोला, झांबिया, झिम्बाब्वे व नामिबियामध्ये पसरला आणि भीषण रूप धारण केले. आज दक्षिण आफ्रिकेच्या बहुतेक भागांवर दुष्काळाचा परिणाम झाला, असे युरोपियन कमिशनच्या अहवालात म्हटले आहे.
परिस्थिती एवढी वाईट आहे की, मुख्यत: एल निनोमुळे प्रदेशात तीव्र उष्णता आणि कोरड्या हवामानाची परिस्थिती निर्माण झाली आहे. २०२३ मध्ये सात वर्षांनी एल निनोची घटना परत घडल्याने संपूर्ण प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त तापमान आणि किमान पर्जन्यवृष्टी झाली. जमिनीतील आर्द्रतेच्या कमतरतेमुळे भीषण दुष्काळ पडला. तसेच, अनेक अभ्यासांतून असे आढळून आले आहे की, हवामान बदलामुळे तापमानात वाढ झाल्याने, दुष्काळ आणि पूर यांसारख्या अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या घटना वारंवार घडत आहेत
दुष्काळाचा नामिबियावर कसा परिणाम झालाय?
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत नामिबियामध्ये अन्नाची उपलब्धता कमी असते आणि दुष्काळामुळे ही परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. मक्यासारखी मुख्य पिके सुकली आहेत, मोठ्या संख्येने पशुधन नष्ट झाले आहे आणि देशातील जवळपास ८४ टक्के अन्नसाठा संपला आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्याने २३ ऑगस्ट रोजी सांगितले. अन्नसाठा कमी झाल्यामुळे किमती गगनाला भिडल्या आहेत; ज्यामुळे अन्नधान्याची उपलब्धता कमी झाली आहे. “एप्रिल ते जून २०२४ दरम्यान अंदाजे १.२ दशलक्ष लोकांना नामिबियामध्ये तीव्र अन्नटंचाईचा सामना करावा लागला आहे आणि उपजीविकेच्या संरक्षणासाठी तातडीची कारवाई करण्याची आवश्यकता आहे,” असे इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी फेज क्लासिफिकेशन (आयपीसी)ने जुलैमध्ये एका अहवालात म्हटले आहे.
देशात पाच वर्षांखालील मुलांमधील तीव्र कुपोषण वाढले आहे आणि काही भागांत मृत्यूचीही नोंद करण्यात आली आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालयाने (ओसीएचए) म्हटले आहे. ‘ओसीएचए’ने दुष्काळामुळे स्त्रियांच्या वाढलेल्या असुरक्षिततेवरही प्रकाश टाकला आहे. “महिला आणि मुलींना अन्न व पाण्यासाठी जास्त अंतर चालावे लागत असल्यामुळे हिंसाचाराचा धोकादेखील वाढतो,” असे ‘ओसीएचए’ने सांगितले आहे.
वन्य प्राण्यांची हत्या
नामिबियात केवळ मांसासाठी वन्य प्राण्यांना मारले जात नसून सरकारला भीती आहे की दुष्काळामुळे प्राणी अन्न व पाण्याच्या शोधात स्थलांतरित होतील. मग त्यामुळे प्राणी-मानव संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. देशात २४ हजार हत्तींसह वन्य प्राण्यांची लक्षणीय संख्या आहे. ही प्राण्यांची जगातील सर्वांत मोठी वन्य प्राण्यांची संख्या आहे. पर्यावरण, वनीकरण व पर्यटन मंत्रालयाच्या निवेदनात असेही म्हटले आहे की, काही प्राण्यांच्या कत्तलीमुळे वन्यजीवांवर दुष्काळाचा परिणाम कमी होईल. चारा आणि पाण्याची उपलब्धता व्यवस्थापित करण्यास मदत मिळेल.
हेही वाचा : देशात अब्जाधीशांच्या संख्येमध्ये मोठी वाढ, भारतीय आता होत आहेत अधिक श्रीमंत; हे कसं घडतंय? जाणून घ्या
वन्य प्राण्यांची हत्या करणे सामान्य आहे का?
जगभरात विविध प्रजातींच्या वन्य प्राण्यांची शिकार केली जाते. नामिबियाच्या यादीत असलेले झेब्रा, ब्ल्यू वाइल्ड बीस्ट (जंगली बैल) व नीलगाय यांसारखे प्राणी सामान्यतः दक्षिण आफ्रिकन प्रदेशातील लोक खातात, असे ‘एनवायटी’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्रामचे आफ्रिका कार्यालयाचे संचालक रोझ म्वेबाझा यांनी ‘एनवायटी’ला सांगितले की, या प्राण्यांची कत्तल वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध, शाश्वत पद्धतींचा वापर करून केली जाते. त्यात प्राणी कल्याणाचा विचार केला जातो आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय वचनबद्धता आणि कायद्याचे पालन केले जाते. त्यामुळे काळजीचे कारण नाही.