गेल्या दोन वर्षांतील जगातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे अफगाणिस्तानातून अमेरिकेने घेतलेला काढता पाय. नंतरची कोणतीही व्यवस्था न लावता केवळ आपल्याला अफगाणिस्तानातून सहिसलामत बाहेर कसे पडता येईल एवढाच स्वार्थी विचार अमेरिकेने केला आणि अफगाणिस्तानची सूत्रे तालिबानच्या हाती गेली…
तालिबानी सत्तेचा परिणाम
तालिबान्यांच्या हाती सत्ता आल्यानंतर त्यांनी सर्व लक्ष केंद्रीत केले ते अफगाणिस्तानातील अमलीपदार्थांच्या तस्करीवर. अमलीपदार्थांसाठी लागणाऱ्या गांज्याची सर्वाधिक शेती अफगाणिस्तानात होते. पाकिस्तान आणि इराण मार्गे अमलीपदार्थ तस्करीच्या मार्गाने जगभरात नेण्यास दहशतवाद्यांनी सुरुवात केली. सुरुवातीस ते कराचीनजिक असलेल्या भारतातील गुजरात किनारपट्टीवर तस्करीच्या मार्गाने आणण्यास सुरुवात केली. गुजरात किनापट्टीवर भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने त्यांची कोंडी केल्यावर त्यांनी मालदिव मार्गे तस्करीचा मार्ग बदलला. तिथेही कोंडी केल्यानंतर त्यांनी थेट श्रीलंकेत तस्करीचा साठा नेऊन तिथून तामिळनाडू मार्गे अमली पदार्थ भारतात आणण्याचा घाट घातला.
‘मोडस ऑपरेंडी’ बदलली
अमली पदार्थांच्या तस्करीचा शोध घेताना भारत सरकारच्या हे लक्षात आले की, गुप्तचर यंत्रणा आणि कारवाई करणाऱ्या यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय गरजेच आहे. त्यानंतर नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (एनसीबी), सीबीआय, आयबी आणि रॉ यांच्याचबरोबर स्थानिक पोलीस यांचा एक कोअर गट निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सर्व कारवाया या एनसीबीच्या नियंत्रणाखालील कोअर गटातर्फे केल्या जातात. या निर्मितीनंतरच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर खास करून गुजरात आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करून काही हजार किलोचे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अब्जोवधींची किंमत असलेले अमली पदार्थ पकडण्यात आले. बऱ्याचशा कारवाया तर थेट समुद्रात करण्यात आल्या. यामधून अमलीदहशतवाद्यांची बदलेली ‘मोडस ऑपरेंडी’ गुप्तचर यंत्रणांना लक्षात आली.
गांज्यावर प्रक्रिया करणारे रसायन महत्त्वाचे
केवळ गांज्याचे उत्पादन करून भागत नाही. तर त्यावर प्रक्रिया करणारे रसायन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावे लागते. या साऱ्याचा शोध घेतल्यानंतर गुप्तचर यंत्रणांना असे लक्षात आले की, प्रक्रियेसाठी लागणारे रसायन आखाती देशांमधून पाकिस्तान आणि इराणला पुरविले जाते. केवळ त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची निर्मिती करणे शक्य होते. गांजा अफगाणिस्तानातून येतो पाकिस्तानात कराची आणि ग्वादार बंदरांच्या जवळफास असलेल्या भागांमध्ये अमली पदार्थांच्या निर्मितीचे मोठे कारखाने आहेत. असेच मोठे कारखाने मकरान किनाऱ्याजवळ आहेत. हाच तयार माल नंतर तस्करीसाठी वापरला जातो. गांज्याची किंमत अगदीच नगण्य असते मात्र अमली पदार्थ तयार करण्याची प्रक्रियादेखील फारशी खर्चिक नाही. मात्र तयार उत्पादन बाजारपेठेत पोहोचते तेव्हा त्याची किंमत एक हजारपट झालेली असते. अमली पदार्थ मात्र अतिशय महाग असतात. त्यामुळे या व्यवसायात मोठा नफा मिळतो, हाच नफा शस्त्रास्त्र खरेदीसाठी दहशतवाद्यांकडून वापरला जातो. त्यामुळे अमली पदार्थ पकडणे म्हणजे दहशतवाद्यांचे नाक दाबण्यासारखेच आहे. म्हणूनच आता गुप्तचर यंत्रणांनी हे साठे पकडणे आणि तस्करी रोखणे यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
विश्लेषण: इराणने ‘मोरॅलिटी पोलीस’ अचानक बरखास्त करण्याचे कारण काय? हे बदलाचे लक्षण आहे की धूळफेक?
माणसांचीही वाटमारी…
अमलीपदाार्थांच्या या तस्करीसाठी अडचणीत असलेल्या माणसांचीही वाटमारी केली जाते असे गुप्तचर यंत्रणांना लक्षात आले. नौदलाने भर अरबी समुद्रात धाडसी कारवाया करून अनेक तस्करांना ताब्यात घेतले. त्यात तस्करीसंदर्भात वापरल्या जाणाऱ्या माणसांच्याही वाटमारीच्या अनेक कहाण्या आणि त्यातील ‘मोडस ऑपरेंडी’ समो आल्या. तस्कर प्रत्यक्ष कधीच कारवाईत सहभागी नसतात. ते पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा इराणमधून सर्व गोष्टी ऑपरेट करतात. तस्करीसाठीची माणसे आणली जातात ती भूकेकंगाल झालेल्या किंवा यादवीसदृश्य परिस्थिती असलेल्या सोमालिया किंवा त्यासारख्या आफ्रिकन देशांमधून. अर्थव्यवस्था कोलमडलेली, हाताला काम नाही, भुके मरण्याची अवस्था… अशी स्थिती. तस्करीत सहभगी झाल्यास दोन पिढ्यांचे भागेल एवढे पैसे मिळतात. आणि पकडले गेले तर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली जाते. भुकेकंगाल बेरोजगारांना इथे धोका असला तरी तीही संधीच ठरते.
…हाती लागू नये म्हणून
यातही तस्करीसाठी तयार केलेल्यांना प्रशिक्षण दिले जाते पाकिस्तान आणि इराण किनाऱ्यानजिक. मोठ्या प्रमाणावर माणसे व बोटी तयार केल्या जातात. नौदलाची नजर वळविण्यासाठी कसा पळ काढायाचा,त्यांचे लक्ष कसे विचलीत करायचे आणि खरा माल असलेली बोट कशी सहिसलामत बाहेर काढायची याचे हे प्रशिक्षण असते. शिवाय अगदीच पकडले गेल्यास मालासह संपूर्ण बोट कशी बुडवायची, नष्ट करायची याचेही प्रशिक्षण दिले जाते. नौदल सूत्रांनी अधिक माहिती देताना सांगितले की, एका वेळेस किमान पाच ते सात बोटींची योजना माल भरून पाठवण्यासाठी केली जाते. अमलीपदार्थांची मूळ किंमत एवढी कमी असते की, तीन बोटी बुडवल्या आणि दोनच तस्करीच्या ठिकाणी पोहोचल्या तरी त्याची बाजारपेठीय किंमत मिळाल्यानंतर हजार पटींमध्ये गोष्टी वसूल होतात. मालावरील खर्च अगदीच क्षुल्लक पण बाजारपेठीय उत्पादनाची किंमत हजारपटीत; म्हणूनच किंबहुना अमली पदार्थांचा वापर दहशतवाद्यांसाठी फायद्याच्या सौद्यासाठी अधिक केला जातो!