नरेंद्र मोदी सरकारने दिल्लीतील तीन मूर्ती भवन कॉम्प्लेक्समधील ‘नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी’ संग्रहालयाचे नाव आता ‘प्राइम मिनिस्टर्स म्युझियम ॲण्ड लायब्ररी’ असे नामकरण केले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर पंडित जवाहरलाल साधारण १६ वर्षे याच तीन मूर्ती भवनात वास्तव्यास होते. याच कारणामुळे नेहरू यांना ही वास्तू समर्पित करण्यात आली होती. या वास्तूला ‘नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी’ असे नाव देण्यात आले होते. आता मात्र या वास्तूचे नाव बदलण्यात आले असून विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील तीन मूर्ती भवनाचा इतिहास काय आहे? मोदी सरकारने या वास्तूचे नाव बदलण्याचा निर्णय का घेतला? हे जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी’चा इतिहास काय?

दिल्लीतील तीन मूर्ती भवन हे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अधिकृत निवासस्थान होते. पुढे १६ वर्षे ते या निवासस्थानात वास्तव्यास होते. याच कारणामुळे साधारण सहा दशकांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांच्या हस्ते ही वास्तू नेहरू यांना समर्पित करण्यात आली होती. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एडविन ल्युट्येन्स यांच्या राजधानीचा भाग म्हणून १९२९-३० या काळात या वास्तूची उभारणी करण्यात आली. या इमारतीला तेव्हा ‘फ्लॅगस्टाफ हाऊस’ म्हटले जायचे. भारतातील ब्रिटिशांच्या सैन्याचे तत्कालीन कमांडर-इन-चीफ या इमारतीत वास्तव्यास होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऑगस्ट १९४८ साली या वास्तूला पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान म्हणून घोषित करण्यात आले. पुढे या वास्तूत पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या निधनापर्यंत याच इमारतीत वास्तव्यास होते. नेहरू यांच्या निधनानंतर ही वास्तू त्यांना समर्पित करण्यात आली. तेथे एक वस्तुसंग्रहालय आणि ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली.

हेही वाचा >> जपानमध्ये लैंगिक संबंधासाठी सहमतीचे वय आता १६ वर्षे, बलात्काराच्या व्याख्येत सुधारणा ; जाणून घ्या कायद्यातील नेमके बदल

‘नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी सोसायटी’ची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर १९६४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांच्या हस्ते हे वस्तुसंग्रहालय आणि ग्रंथालय देशाला समर्पित करण्यात आले आहे. पुढे दोन वर्षांनंतर ‘नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी सोसायटी’ची स्थापना करण्यात आली. या सोसायटीवर ‘नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी’च्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली. आधुनिक आणि समकालीन इतिहासावर संशोधन करण्यासाठी चालना देण्याचीही या सोसायटीवर जबाबदारी सोपवण्यात आली होती.

नवे संग्रहालय उभारण्याची मोदी यांची कल्पना

२०१४ साली देशात सत्तांतर झाले. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची सत्ता आली. पुढे मोदी यांनी देशातील सर्व पंतप्रधानांना समर्पित असे एक संग्रहालय उभारण्याची कल्पना मांडली. मोदी यांच्या या कल्पनेला तेव्हा विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी याबाबत मोदी यांना एक पत्रदेखील लिहिले होते. ‘नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी’ आणि ‘त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स’च्या स्वरूपात बदल करू नये, असे तेव्हा मनमोहन सिंग म्हणाले होते.

हेही वाचा >> कर्नाटकमधील धर्मांतरविरोधी कायदा रद्द होणार! भाजपाला धक्का; काँग्रेसची नेमकी भूमिका काय? जाणून घ्या सविस्तर…

संग्रहालयात कोणताही बदल केला जाणार नाही, भाजपाने दिले होते स्पष्टीकरण

पुढे मनमोहन सिंग यांच्या पत्राला सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी उत्तर दिले होते. नवे संग्रहालय उभारले जात असताना नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररीच्या संरचनेत कोणताही बदल केला जाणार नाही. तसेच ही जमीन सरकारच्या मालकीची आहे. त्यामुळे या जागेच्या मालकी हक्कावरही वाद होणार नाही, असे स्पष्टीकरण महेश शर्मा यांनी दिले होते.

सोसायटीतील अनेक जुन्या सदस्यांना हटवण्यात आले

दरम्यान, देशातील सर्व माजी पंतप्रधानांना समर्पित असलेल्या संग्रहालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी सोसायटीमध्ये अनेक बदल करण्यात आले. सोसायटीच्या अनेक जुन्या सदस्यांना हटवण्यात आले. त्याऐवजी भाजपा नेते तथा राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे, वृत्तवाहिनीचे सूत्रसंचालक अर्णब गोस्वामी, राम बहादूर राय, तत्कालीन परराष्ट्र सचिन एस. जयशंकर यांचा या सोसायटीमध्ये समावेश करण्यात आला. अर्थतज्ज्ञ नितीन देसाई, बी. पी. सिंह, प्राध्यापक उदयन मिश्रा आदी मान्यवरांना या सोसायटीच्या समितीमधून हटवण्यात आले. अशोका विद्यापीठाचे कुलगुरू प्रताप भानू मेहता यांनी २०१६ साली या सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आमच्यावर राजकीय दबाव टाकला जात आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

हेही वाचा >> ग्रीसजवळ बोट नेमकी का बुडाली? शेकडो स्थलांतरितांना जलसमाधी मिळाल्याची भीती, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

‘नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी’ सोसायटीच्या सदस्यांमध्ये बदल करण्याच्या काही दिवसांपूर्वी एनएमएमएलच्या वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सहा सदस्यांनी सोसायटीमध्ये बदल करण्यास आक्षेप नोंदवला होता. यामध्ये काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते जयराम रमेश, इतिहासकार नयनज्योत लाहिरी, नितीन देसाई, बी. पी. सिंह आदी सदस्यांचा समावेश होता. या सर्व व्यक्ती एनएमएमएलच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होत्या. सोसायटीमध्ये बदल केल्यास या संस्थेच्या मूळ उद्देशापासून दूर गेल्यासारखे होईल, असे मत या मान्यवरांनी मांडले होते. २०१४ साली मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या साधारण आठवड्यानंतर सोनिया गांधी यांनी एनएमएमएलच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

मोदी यांच्या कार्यकाळात नव्या संग्रहालयाची निर्मिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी नव्या पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केले होते. या संग्रहालयात देशाच्या सर्व १४ माजी पंतप्रधानांच्या कार्यकर्तृत्वाविषयी फोटो, वस्तू, आणि दस्तऐवजांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे भविष्यात होणाऱ्या पंतप्रधानांसाठीच्या कार्याबद्दल जनतेला माहिती मिळावी यासाठी येथे जागा निर्माण करण्यात आलेली आहे. हे संग्रहालय उभारण्यासाठी एकूण २७१ कोटी रुपये लागले. या संग्रहालयात पंतप्रधानांची विचारधारा तसेच कार्यकाळ लक्षात न घेता त्यांच्या कार्याविषयी माहिती उपलब्ध असेल, असे तेव्हा सांस्कृतिकमंत्र्यांनी सांगितले होते.

हेही वाचा >> Ashadhi Wari 2023: पंढरपूर वारीची प्राचीन परंपरा आणि संलग्न आख्यायिका

‘नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी’चे आधुनिकीकरण

‘नेहरू मेमोरियल म्युझियम ॲण्ड लायब्ररी’ आता नव्या संग्रहालयाशी जोडण्यात आली आहे. या इमारतीला ब्लॉक-१ असे नाव देण्यात आले असून अत्याधुनिक सेवातंत्राच्या मदतीने या संग्रहालयाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. ब्लॉक-१ मध्ये नेहरू यांना वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आलेल्या भेटवस्तू सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. याआधीही कधीही सार्वजनिक न केलेल्या भेटवस्तूंचाही यामध्ये समावेश आहे.

नरेंद्र मोदी यांच्या कार्याविषयी माहिती देणारी एक गॅलरी

दरम्यान, देशातील सर्व पंतप्रधानांच्या संग्रहालयामध्ये विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याविषयी माहिती देणाऱ्या एका गॅलरीची निर्मिती करण्यात येत आहे. आगामी काही महिन्यांत या गॅलरीचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. ही गॅलरी तळमजल्यावर असेल. अन्य माजी पंतप्रधानांच्या जीवन आणि कार्यावर जशा प्रकारे प्रकाश टाकण्यात आलेला आहे, अगदी तशाच पद्धतीने मोदी यांच्याही कार्यावर या गॅलरीच्या माध्यमातून
प्रकाश टाकण्यात येईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi government change nehru memorial museum library name know detail history of teen murti bhavan prd