नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर (आयएसएस) अडकले आहेत. त्यांच्या यानात बिघाड झाल्याने दोघांचाही परतीचा प्रवास लांबला आहे. दोन्ही अंतराळवीर २०२४ च्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी पृथ्वीवर परत येणार नाहीत. परंतु, असे असले तरी दोन्ही अंतराळवीरांना अंतराळस्थानकातून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ५ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. अंतराळवीरांसाठी डिझाइन केलेल्या प्रक्रियेचा वापर करून दोन्ही अंतराळवीर मतदान करू शकणार आहेत. विल्मोर यांनी शुक्रवारी सांगितले, “अमेरिकेचे नागरिक म्हणून आम्ही बजावत असलेली ही एक अतिशय महत्त्वाची भूमिका आहे आणि नासा आमच्यासाठी ही प्रक्रिया अगदी सोपी करीत आहे.” दोन्ही अंतराळवीर अंतराळातून कसे मतदान करतील? ही प्रक्रिया नक्की काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

अंतराळवीरांच्या मतदानासाठी कशी सुविधा?

विल्यम्स आणि विल्मोर यांच्यासारखे नासाचे अंतराळवीर पारंपरिक मतदान केंद्रांपासून दूर असले तरी ते अजूनही अमेरिकेतील निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू शकतात. १९९७ साली टेक्सासच्या खासदारांनी अंतराळवीरांना अंतराळातून मतदान करण्याची परवानगी देणारे विधेयक मंजूर केले होते, तेव्हाच ही प्रणाली स्थापित झाली आणि अंतराळवीरांनाही मतदानाचा अधिकार मिळाला. सर्वांत आधी अंतराळवीर डेव्हिड वुल्फ यांनी या प्रणालीचा वापर करून अंतराळातून मतदान केले होते. त्यांनी पूर्वीच्या सोविएत युनियनद्वारे चालवल्या गेलेल्या आणि आता बंद झालेल्या ‘मिर’ या अंतराळस्थानकावरून मतदान केले होते. अंतराळवीर सुरक्षित इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया वापरून मतदान करतात.

Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Sunita Williams forgets how to walk
सुनीता विल्यम्स अंतराळात बसणं, झोपणं अन् चालणंही विसरल्या? प्रदीर्घ काळ अवकाशात राहिल्याचा काय परिणाम होतो?
Astro Lovers , Moon, Planets Positions, Planets ,
सर्व ग्रहांच्या दर्शनाचा ‘चंद्र असेल साक्षीला’, अवकाश प्रेमींसाठी पर्वणी
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
Cecile Richards personality
व्यक्तिवेध : सीसिल रिचर्ड्स
Sunil Tatkare On Raigad Guardian Minister
Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित केल्यानंतर सुनील तटकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आल्यानंतर…”
दोन्ही अंतराळवीर टेक्सासचे रहिवासी आहेत. (छायाचित्र-कामर्शियल क्रू/एक्स)

हेही वाचा : नोकरीचं आमिष दाखवून भारतीयांना केलं रशियन सैन्यात भरती; आतापर्यंत किती भारतीयांची सुटका?

दोन्ही अंतराळवीर टेक्सासचे रहिवासी आहेत. टेक्सासमधील निवडणूक अधिकारी हॅरिस काउंटी ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नासाबरोबर काम करतात. अंतराळवीर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करतात. अंतराळवीरांना सॅटेलाइट फ्रिक्वेन्सीद्वारे त्यांच्या मतपत्रिका पाठविल्या जातात; ज्यानंतर अंतराळवीर आपले मत देतात. हॅरिस काउंटी यांच्या कार्यालयाचे प्रवक्ते रोसिओ टोरेस-सेगुरा यांनी ‘एनबीसी’ न्यूजला सांगितले, “अंतराळवीरांना त्यांची मतपत्रिका पाठविण्यापूर्वी ती अंतराळवीरांना सोइस्कर होईल अशा कागदपत्राच्या (पीडीएफ) स्वरूपात तयार केली जाते; जेणेकरून अंतराळवीर त्यांचे मत देऊ शकतील, ते जतन करू शकतील व ते परत पाठवू शकतील. त्यासाठी चाचणी म्हणून एक पासवर्ड असलेली मतपत्रिका आधी पाठविली जाते. त्यानंतरच मुख्य मतपत्रिका पाठविली जाते.”

नासाचे अंतराळवीर कोणाला मत देतील?

दोन्ही अंतराळवीर टेक्सासमध्ये राहत असल्याने ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यती आणि टेक्सास सिनेट निवडणुकीसह राज्यातील हाय-प्रोफाइल निवडणुकांसाठी मतदान करणार आहेत. ते कोणत्या उमेदवाराला मत देतील, याविषयी त्यांनी काहीही सांगितले नाही. अर्थात, त्यांच्याकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यातील एकाला निवडण्याचा पर्याय असेल. अमेरिकेच्या सिनेट निवडणुकीत ते विद्यमान रिपब्लिकन सिनेटर टेड क्रूझ आणि त्यांचे डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी कॉलिन ऑलरेड यांच्यातील एकाला मतदान करू शकतील. विशेषत: सिनेटच्या शर्यतीत चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. “मी आज मतपत्रिकेसाठी माझी विनंती पाठवली,” असे विल्मोर यांनी शुक्रवारी सांगितले होते.

अंतराळ मतदानामागील तंत्रज्ञान

अंतराळातून मतदान करण्याची पद्धत १९९७ मध्ये सुरू झाली, त्याच वर्षी टेक्सासने अंतराळवीरांना दूरस्थपणे मतदान करण्याची परवानगी देणारा ऐतिहासिक कायदा पारित केला. तेव्हापासून अनेक अंतराळवीरांनी अंतराळात असताना त्यांचे लोकशाही कर्तव्य पूर्ण करण्यासाठी ही पद्धत वापरली आहे. डेव्हिड वुल्फ हे अंतराळातून मतदान करणारे पहिले अमेरिकन होते आणि अलीकडेच नासाच्या अंतराळवीर केट रुबिन्सने २०२० च्या निवडणुकीत आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकातून मतदान केले. नासाच्या स्पेस कम्युनिकेशन्स अॅण्ड नेव्हिगेशन (SCaN)मधील सुविधांद्वारे ही प्रक्रिया सुलभ केली जाते.

अंतराळवीराने त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका भरून झाल्यावर, ती एनक्रिप्ट केली जाते आणि नासाच्या नियर स्पेस नेटवर्कद्वारे ती पृथ्वीवर पाठविले जाते. एनक्रिप्शन ही एक अशी पद्धत आहे की, ज्याद्वारे माहिती गुप्त कोडमध्ये रूपांतरित केली जाते. मतपत्रिका नासाच्या ट्रॅकिंग आणि डेटा रिले सॅटेलाइटमधून न्यू मेक्सिकोमधील ग्राउंड अँटेनामध्ये पाठवली जाते. त्यानंतर ह्युस्टनमधील मिशन कंट्रोलकडे पाठवली जाते आणि सगळ्यात शेवटी ती संबंधित काउंटी क्लर्ककडे पाठवली जाते.

विल्यम्स आणि विल्मोर अंतराळात कधीपर्यंत असतील?

बोईंगच्या स्टारलायनर स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक समस्येमुळे जून २०२४ च्या सुरुवातीपासून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ‘आयएसएस’वर अडकले आहेत. त्यांची मोहीम केवळ आठ दिवस चालणारी होती; परंतु स्पेसक्राफ्टमधील समस्यांमुळे दोघेही फेब्रुवारी २०२५ पर्यंत अंतराळात राहतील. २०२५ मध्ये त्यांना स्पेसएक्स कॅप्सूलवर परत आणण्याची योजना आखली जात आहे. दोन्ही अंतराळवीरांनी आव्हाने असूनही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. ‘आयएसएस’चा अनुभव असलेल्या विल्यम्स म्हणाल्या, “हे माझे आनंदाचे ठिकाण आहे. मला अंतराळात राहायला आवडते.” त्यांनी नमूद केले की, त्यांच्या पूर्वीच्या अनुभवामुळे अंतराळ स्थानकात परत येणे त्यांच्यासाठी कठीण नव्हते. विल्मोर स्टारलायनरने परत येऊ शकत नसल्याबद्दल निराश होते. मात्र, दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळयान सुधारण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसाही केली.

पुढे काय?

अंतराळवीरांनी ‘आयएसएस’वर त्यांची विस्तारित मोहीम सुरू ठेवली आहे. ते फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर परत येण्याची तयारी करीत आहेत. त्यांच्या घरी परतण्यासाठी एलोन मस्कचे ‘स्पेस एक्स’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. त्यामध्ये अंतराळवीरांना क्रू ९ कॅप्सूलमध्ये परत आणण्याची योजना आहे. दोन्ही अंतराळवीर एवढ्या मोठ्या कालावधीसाठी कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहिल्याचा भावनिक परिणाम त्यांच्यावर होणे साहजिक आहे. दोन्ही अंतराळवीर त्यांच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विल्यम्स यांनी कबूल केले की, वाढलेल्या मुक्कामाच्या कालावधीमुळे त्या थोड्या चिंताग्रस्त होत्या; परंतु त्यांच्या कुटुंबाच्या समर्थनामुळे त्यांना आश्वस्त वाटले.

हेही वाचा : माणसाप्रमाणे विचार करणारं AIचं नवं मॉडेल; नोकऱ्यांवर गदा आणणार का?

विल्मोर यांनी अंतराळात जास्त काळ राहिल्याबद्दल कोणतीही खंत व्यक्त केली नाही. ते म्हणाले, “आम्ही यशाला गाठू शकलो असतो. मला विश्वास होता की, आम्ही स्टारलायनरवर परत येऊ; पण आमच्या हातून वेळ निघाली.” तांत्रिक आव्हानांमुळे त्यांच्या परत येण्यास विलंब झाला असला तरी त्यांना अंतराळातून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे आणि अशा परिस्थितीतही अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत त्यांना सहभागी होता येणार आहे. ही नक्कीच प्रशंसनीय बाब आहे.

Story img Loader