NASA: जगातील प्रथितयश अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’ने शुक्रवारी स्पेसएक्स फाल्कन नाइन या अंतराळ यानासोबत वायूप्रदुषणाचे मापन करणारी यंत्रणा थेट अंतराळात धाडली असून ‘पृथ्वीवरील मानवी जीवन खऱ्या अर्थाने अधिक समृद्ध करण्यासाठी’ असे त्या उपक्रमाचे वर्णन केले आहे. काय आहे नेमका हा उपक्रम? कशा पद्धतीने केले जाणार आहे हे मापन आणि ते थेट अंतराळातूनच करण्यामागचे कारण काय?
आणखी वाचा : विश्लेषण : सिंधू जलवाटप करार; भारताने पाकिस्तानला नोटीस पाठवण्यामागचे कारण काय?
टेम्पो हा उपक्रम नेमका आहे तरी काय?
ट्रोपोस्फिअरिक एमिशन मॉनिटरिंग ऑफ पोल्युशन (टेम्पो) हा उपक्रम ‘नासा’ने हाती घेतला असून या अंतर्गत उत्तर अमेरिका आणि परिसरातून होणाऱ्या वायुप्रदूषणाचा बारकाईने शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी हे उपकरण घेऊन ‘नासा’च्या ‘स्पेसएक्स फाल्कन नाइन’ या यानाचे यशस्वी उड्डाण शुक्रवारी पार पडले. ही मोहीम केवळ संशोधनात्मक नाही तर ‘पृथ्वीवरील मानवी जीवन खऱ्या अर्थाने अधिक समृद्ध करण्यासाठी’ हा त्याचा व्यापक उद्देश आहे, असेही या प्रसंगी ‘नासा’ने जाहीर केले. या उपकरणामुळे वायुप्रदूषक आणि त्यांचे उत्पत्तिस्थान या दोन्हींचा बारकाईने शोध घेणे शक्य होणार आहे.
वायुप्रदूषणाची मोजदाद करण्याचा कालावधी
‘नासा’च्या टेम्पो प्रकल्पाचे व्यवस्थापक केविन डॉघर्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर अमेरिकेवरील वायुप्रदूषणाची मोजदाद दर तासागणिक केली जाणार आहे. प्युअर्तो रिको ते कॅनडाच्या तार सॅण्डस्पर्यंतचा परिसर यात समाविष्ट असेल. यातून हाती येणाऱ्या डेटाचा वापर यूएस एन्व्हायरोन्मेंटल प्रोटेक्शन एजन्सी (EPA), नॅशनल ओशनिक ॲण्ड ॲटमॉस्फिअरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA)आदी पर्यावरण आणि वातावरणाच्या अभ्यासाशी संबंधित संस्थांतर्फे केला जाणार आहे.
आणखी वाचा : विश्लेषण : धर्म केव्हा अस्तित्वात आला? तुर्कस्तानमधील उत्खननात मिळाले पुरावे?
टेम्पो या प्रकल्पाचा महत्त्वाचा विशेष काय?
केवळ पर्यावरण आणि प्रदूषणाचा अभ्यास करणे एवढाच या प्रकल्पाचा उद्देश नाही तर ‘पृथ्वीवरील मानवी जीवन खऱ्या अर्थाने अधिक समृद्ध करण्यासाठी’ ही या प्रकल्पामागची धारणा आहे, या शब्दांत ‘नासा’चे प्रशासक बिल नेल्सन यांनी प्रकल्पाचे महत्त्व विशद केले. गर्दीच्या वेळेस वाढणारे, वाहतुकीतून होणारे प्रदूषण, जंगलांमध्ये लागणारे वणवे, त्याचप्रमाणे ज्वालामुखी आदी अनेकविध बाबींमधून होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास संशोधक या प्रकल्पामध्ये करणार आहेत. ‘नासा’च्या या प्रकल्पामुळे उत्तर अमेरिकेतील प्रदूषण नियंत्रित करण्यास मोठी मदत होईल आणि जगाला त्यातून नवीन धडेही मिळतील. एकुणात संपूर्ण जगासाठी हा प्रकल्प अतिमहत्त्वाचा असा आहे. यामुळे हवेची प्रत सुधारणे शक्य होईल.
‘टेम्पो’मधील तंत्रज्ञान
वॉशिंग मशीनच्या आकाराएवढाच टेम्पोचा आकार आहे. ही एक विशिष्ट प्रकारची रासायनिक प्रयोगशाळाच आहे. टेम्पो पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत राहणार असून इन्टेलसॅटच्या मदतीने त्याचे संदेशवहन होणार आहे.
सध्यादेखील जगभरात हे प्रदूषण मोजमाप करणारे उपग्रह अस्तित्वात आहेत. मात्र ते पृथ्वीनजीकच्याच कक्षेत असल्याने केवळ दिवसातून एकदा तेही ठरलेल्या वेळेलाच त्याद्वारे मापन करता येते, ही त्यांची मर्यादा आहे.
टेम्पोची क्षमता खूप अधिक असल्याने पृथ्वीच्या वातावरणातील प्रदूषणाबरोबरच १० किलोमीटर्सच्या परिसरापर्यंतचे अचूक मापन थेट अंतराळातून करणे शक्य होणार आहे.
भूस्थिर कक्षा म्हणजे काय?
हावर्ड ॲण्ड स्मिथसोनिअन सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्समधील वातावरण संशोधक कॅरोलिन नोव्लान सांगतात,
“वातावरण, दूरसंवाद किंवा हवामानाचा अभ्यास करणारे सर्व उपग्रह भूस्थिर कक्षेमध्येच भ्रमण करतात. मात्र आजवरच्या उपग्रहांमध्ये वायुप्रदूषणाच्या संदर्भातील अद्ययावत यंत्रणा नव्हती. शिवाय ते भूस्थिर कक्षेत नसल्याने त्यांच्या मापनाला अनेक मर्यादा होत्या. उत्सर्जित होणाऱ्या विविध वायूंच्या मापनाचीही यंत्रणा नव्हती. भूस्थिर कक्षा ही पृथ्वीच्या विषुववृत्तापासून सुमारे ३५ हजार ७८६ किलोमीटर्स वरती अंतराळात असते. त्या कक्षेत गेल्यानंतर उपग्रहाला पृथ्वीच्या गतीशी जुळवून घेणे सोपे जाते. त्यामुळे उपग्रह सतत उत्तर अमेरिकेवरच लक्ष ठेवून राहू शकतो. यामुळे टेम्पोला दर तासागणिक वायुप्रदूषणाचे मापन करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभरात प्रदूषण कसे वाढते किंवा कमी होते, या संदर्भातीलही अनेक बाबी लक्षात येतील.”
याशिवाय ‘टेम्पो’मध्ये कोणत्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे?
वायुप्रदूषक चाचण्यांशिवाय टेम्पोमध्ये प्रत्येक प्रदूषकाचे नेमके मापन करण्याची सोय आहे. त्याचप्रमाणे या मापनानंतर हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो. त्याप्रमाणे हवेची प्रत कशी असेल, या संदर्भातील अंदाज व्यक्त करणेही शक्य होणार आहे. त्याचा वापर प्रदूषण नियंत्रणासाठी करता येईल. त्याचप्रमाणे प्रदूषण नियंत्रणासाठीची धोरणेही राबविता येतील.
अमेरिकेसाठी हे का महत्त्वाचे?
अमेरिकन लंग असोसिएशनच्या अभ्यासानुसार, केवळ वायुप्रदूषणामुळे अमेरिकेत दरवर्षी तब्बल ६० हजार जणांचा मृत्यू होतो. मृत्यूचे हे प्रमाण कमी करण्याच्या कामी उपग्रहाची खूप मोठी मदत होणे अपेक्षित आहे. नायट्रोजन डॉयऑक्साइडचे मापन सर्वात महत्त्वाचे असेल. इंधनाच्या ज्वलनानंतर होणारे या वायूचे उत्सर्जन अधिक घातक ठरते.
टेम्पोचे मापन पारदर्शीपणे उपलब्ध होणार…
टेम्पोने केलेले वायूप्रदूषणाचे मापन सार्वजनिकरीत्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे जनसामान्यांनाही वायुप्रदूषणासंदर्भात नेमका अंदाज येऊ शकेल.
भारताकडे अशा प्रकारची उपग्रहीय सोय आहे का?
नाही. पण भारताला अशा प्रकारच्या उपग्रहीय संशोधन सर्वेक्षणाची सर्वाधिक गरज आहे. आपल्याकडे असलेले उपग्रह हे वातावरणाचा, खास करून हवामानाचा अभ्यास करणारे अधिक आहेत. प्रदूषणाच्या अभ्यासासाठी पूर्णपणे स्वतंत्र यंत्रणा विकसित करावी लागेल. भारताला या यंत्रणेचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो. आपल्याकडे वायूप्रदूषणाची मात्रा शहरांमध्ये सर्वाधिक असल्याने त्याच्या नियंत्रणासाठी याचा वापर होऊ शकतो. आपल्याकडे मुंबई- दिल्ली सारख्या महानगरांनी तर हवेच्या प्रतीच्या संदर्भात धोक्याची पातळी तर केव्हाच ओलांडली आहे. त्यामुळे अशी यंत्रणा अधिक आवश्यक आहे.