आजच्या घडीला करमणूक, संगीत ऐकणे, चित्रपट पाहणे व बातम्या वाचणे हे आता बोटांच्या इशाऱ्यांवर शक्य झाले आहे. पण, भारताच्या आधुनिक इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या सुविधा सर्व भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. त्यासाठी अनेक कारणे कारणीभूत असली तरी पायाभूत सुविधांची वानवा हे त्यातले एक मोठे कारण होते. १०० वर्षांपूर्वी या क्षेत्रात मैलाचा दगड रचण्यात आला. ब्रिटिश काळात १०० वर्षांपूर्वी पहिले रेडिओ प्रसारण करण्यात आले. भारतात २३ जुलै हा दिवस राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो. रेडिओ क्लब ऑफ बॉम्बे (काही व्यावसायिकांनी स्थापन केलेली) या संस्थेने जून १९२३ मध्ये देशात प्रथमच प्रसारण सुरू केले होते आणि त्याचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या रेडिओ क्लबनंतर पाच महिन्यांनी ‘कलकत्ता रेडिओ क्लब’ची स्थापना झाली.
२३ जुलै १९२७ रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (IBC) अस्तित्वात आली; मात्र तीन वर्षांच्या आत कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. पण, त्यामुळे भारतीय नागरिकांच्या अनेक पिढ्यांना भुरळ पाडणारे ‘ऑल इंडिया रेडिओ’ (AIR) हे नाव अस्तित्वात आले. ते कसे आणि का? या विषयीचा घेतलेला हा आढावा ….
ऑल इंडिया रेडिओची सुरुवात
‘ऑल इंडिया रेडिओ’च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ‘एआयआर’ने प्रायोगिक तत्त्वावर प्रसारण सेवा केली; पण काही दिवसांतच त्यांनाही तोटा झाल्यामुळे आर्थिक चणचण जाणवू लागली. रेडिओ पुनरुज्जीवित करण्यासाठी ब्रिटिशांनी ऑगस्ट १९३५ साली ‘बीबीसी’चे प्रोड्युसर लिओनल फिल्डेन यांना प्रसारण सेवेचे नियामक म्हणून नियुक्त केले.
हे वाचा >> भाषासूत्र : रेडियो ते आकाशवाणी!
जवाहर सरकार हे ‘प्रसार भारती’चे एकेकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. २०१४ साली जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी लिओनेल फिल्डेन यांच्या कार्यशैलीची माहिती दिली. “फिल्डेन कमालीचे हुशार, सर्जनशील व तितकेच उतावीळ गृहस्थ होते. व्यवस्था अनुकूल नसतानाही फिल्डेन यांनी आपल्या गुणांच्या आधारे अतिशय समर्पित भावनेने काम केले. जानेवारी १९३६ पर्यंत त्यांनी किंग्जवे कॅम्प येथे दिल्लीचे रेडिओ केंद्र उभारले. कोणतेही अडथळे आले तरी काम करूनच राहायचे, अशी त्यांच्या एकूण कामाची शैली होती. माझ्याही कार्यकाळात मी सचिव आणि उपसचिवांसोबत खूप भांडलो. फिल्डेन यांचेही लॉर्ड केथ यांच्यासोबत वाद झाले होते.
फिल्डेन यांची नियुक्ती झाली, त्याच वर्षी खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले होते. ८ जून १९३६ रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचे (ISBS) रूपांतर ऑल इंडिया रेडिओमध्ये झाले. ऑगस्ट १९३७ साली ऑल इंडिया रेडिओचा ‘द सेंट्रल न्यूज ऑर्गनायजेशन’ (CNO) हा नवा अवतार पाहायला मिळाला. चार वर्षांनंतर एआयआर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या अखत्यारीत गेले (त्यानंतर या विभागाला मंत्रालयात बदलण्यात आले). ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले, त्यावेळी भारतात सहा रेडिओ केंद्रे होती. दिल्ली, बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, तिरुचिरापल्ली व लखनऊ ही केंद्रे भारतात; तर पाकिस्तानमध्ये पेशावर, लाहोर व ढाका अशी तीन केंद्रे होती.
ऑल इंडिया रेडिओ भारतातील ११ टक्के लोकसंख्या आणि २.५ टक्के प्रदेश व्यापत होते. काही काळानंतर ‘सीएनओ’ची न्यूज सर्व्हिस डिव्हिजन (NSD) व एक्स्टर्नल सर्व्हिसेस डिव्हिजन (ESD) अशा दोन भागांत विभागणी झाली. राष्ट्रीय प्रसारणासाठी १९५६ साली ‘आकाशवाणी‘ हे नाव स्वीकारण्यात आले. ‘एआयआर’च्या हिंदी प्रसारणासाठी या नावाचा विशेषकरून वापर होत असे.
‘एआयआर’चे खिन्न भावना असणारे प्रसिद्ध जिंगल वॉल्टर काफमन यांनी संगीतबद्ध केले होते. काफमन प्राग आणि बर्लिनमध्ये संगीत शिकलेले होते. जर्मनीत नाझींचा उत्पात सुरू होण्यापूर्वीच त्यांनी बर्लिनमधून काढता पाय घेतला आणि १९३० च्या आसपास ते भारतात आले. १९३७ साली त्यांनी ‘एआयआर’मध्ये नोकरी सुरू केली. त्यावेळी बॉम्बे केंद्रात ते संगीत दिग्दर्शक म्हणून काम करीत होते. काफमन यांनी भारतीय स्थानिक संगीत परंपरांचे विस्तृत संशोधन केले आणि काही काळ त्यांनी बॉलीवूडमध्येही काम केले.
रेडिओवर चित्रपटांच्या गाण्यांना कशी संधी मिळाली?
१९५७ साली चित्रपटातील गाण्यांना प्रसारित करणाऱ्या ‘विविध भारती’ सेवेची सुरुवात झाली; पण हे करणे त्या काळी सोपे नव्हते. त्यावर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने नमूद केल्यानुसार १९५२ साली, ऑल इंडिया रेडिओने ‘रेडिओ सिलोन’ आणि त्यांच्या प्रचंड प्रसिद्ध अशा ‘बिनाका गीतमाला’वर काही वर्षे बंदी घातली होती. बिनाका गीतमाला अमीन सयानी सादर करीत असत. अमीन सयानी यांचा सुमधुर आवाज आणि गाणी सादर करण्याची त्यांची विशिष्ट शैली आजही जुन्या पिढीतील अनेकांच्या स्मरणात आहे. सयानी हिंदी चित्रपटांतील गाण्यांचे तारणहार होते, असे अनेक जण मानतात.
हे ही वाचा >> ‘एक राज्य एक आकाशवाणी केंद्र’ धोरणाचा फटका
माहिती व प्रसारण मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री बी. व्ही. केसकर यांचे मानणे होते की, चित्रपटातील गाणी ही पाश्चिमात्य शैलीतील आहेत आणि भारतीय नागरिकांना स्वदेशी शास्त्रीय संगीत ऐकवले जाण्याची गरज आहे. शास्त्रीय संगीताचा लोकानुनय कमी होत असून, हे संगीत लुप्त होते की काय? अशी भीती त्यांना होती. आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या गाण्याची झलक आधी संस्थेला दाखविण्यात यावी; तसेच जेव्हा गाणे सादर होईल, तेव्हा चित्रपटाचे नाव सांगण्यात येऊ नये. कारण- ‘एआयआर’ चित्रपटांची प्रसिद्धी करू इच्छित नाही, असे नियम केसकर यांनी घालून दिले होते.
पण, त्यानंतर काही महिन्यांतच चित्रपट निर्मात्यांनी ‘एआयआर’ला दिलेले संगीत हक्क काढून घेतले आणि रेडिओवर चित्रपट संगीताचे प्रसारण खंडित झाले. तथापि, श्रीलंकेच्या ‘रेडिओ सिलोन’ने काही वर्षांपूर्वी सुरू केलेले हिंदी गाण्यांचे केंद्र या काळात सक्रिय केले. चित्रपटाच्या गाण्यांचा एक मोठा चाहतावर्ग भारतात निर्माण झाला होता. या वर्गामध्ये प्रसिद्ध होण्यासाठी रेडिओ सिलोनकडे ही मोठी संधी होती. या काळातच बिनाका गीतमाला या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. अमीन सयानी यांनी त्या काळातील काही अजरामर गाणी आपल्या अमोघ समालोचनातून सादर केली.
आज ऑल इंडिया रेडिओची २६० केंद्रे आहेत. भारतातील जवळपास सर्व लोकसंख्येला रेडिओ सहज उपलब्ध होऊ शकतो, तसेच रेडिओने भारताचा ९२ टक्के प्रदेश आज व्यापलेला आहे. प्रसारण क्षेत्रातील सर्वांत मोठी संस्था असलेल्या ए’आयआर’कडून २३ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध्ये प्रसारण करण्यात येते.