चिन्मय पाटणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकताच शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय शैक्षणिक आराखडय़ाचा मसुदा प्रसिद्ध केला असून त्यावर पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक यांच्याकडून हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. या आराखडय़ात ३ ते १८ वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या गरजा, अध्ययन-अध्यापन पद्धती, शैक्षणिक साहित्य, शिक्षणाचे विविध टप्पे यांचा समावेश आहे. आराखडय़ावरील हरकती सूचना  ncf.ncert@ciet.nic.in वर पाठवता येतील.

नवा शैक्षणिक आराखडा कशासाठी?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून पूर्वप्राथमिक शिक्षणापासून पदवीपर्यंतची रचना   ५ -३ -३ -४ अशी होणार आहे. त्यानुसार अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी शिक्षण मंत्रालयाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली १२ तज्ज्ञांची समिती नेमली होती. मूल्यांवर भर देण्यात आलेल्या या आराखडय़ात ज्ञानविषयक दृष्टिकोन ठेवून आशय, भाषा शिक्षण, अध्यापनात साधने, स्रोतांचा उपयोग आणि तत्त्वज्ञानाचा आधार दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पूर्वी २००५ मध्ये काँग्रेस सत्तेत असताना अभ्यासक्रम आराखडा बदलण्यात आला होता.

आराखडा निर्मितीची प्रक्रिया कशी झाली?

आराखडय़ाचा मसुदा तयार करण्यापूर्वी देशभरातील ५०० जिल्हास्तरीय बैठका झाल्या. मंत्रालये, धार्मिक गट, वेगवेगळय़ा संस्था, स्वयंसेवी संघटना, विद्यापीठे आदींबरोबर ५० हून अधिक बैठका झाल्या. यात आठ हजारहून अधिक लोकांचा समावेश होता. तसेच मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून केलेल्या डिजिटल सर्वेक्षणात १२ लाख लोकांनी भाग घेतला.

अभ्यासक्रम आराखडय़ाचा केंद्रिबदू काय?

प्राचीन भारतातील तत्त्वज्ञानाची बैठक हा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा खरा स्रोत असल्याचे नमूद करून प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थनिष्पत्ती, अनुपलब्धी आणि शब्द या सहा प्रमाणांवर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. तसेच पंचकोश विकासाच्या माध्यमातून मुलांच्या मनोविकासालाही महत्त्व देण्यात आले आहे. पंचकोष या प्राचीन संकल्पनेत मानवी अनुभव आणि आकलनासाठी शरीर आणि मन यातील संबंध महत्त्वाचा मानला गेला आहे. त्यामुळे चौकस आहार, पारंपरिक खेळ, योगासने, गाणी, खेळ, कविता, सांस्कृतिक नाते तयार होण्यासाठी प्रार्थना यातून मुलांचा मनोविकास करण्याची शिफारस करण्यात आली आहे. देशातील समृद्ध, सांस्कृतिक वारसा आणि परंपरांच्या माध्यमातून भारतीयत्व समजून घेण्यावर, आयुर्वेद आणि योग शिकण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील लढय़ाचे विविध टप्पे, त्यात गांधी आणि संबंधितांच्या चळवळी, माध्यमिक शिक्षणातील इतिहासाच्या अभ्यासक्रमात ग्रीक आणि मगध साम्राज्य, बु्द्ध, जैन, वैदिक आणि कन्फ्युशियन तत्त्वज्ञान शिकण्याची शिफारस आहे.

दहावी- बारावीच्या परीक्षांचे काय होणार?

नव्या आराखडय़ात दहावी आणि बारावीच्या सध्याच्या शिक्षण, परीक्षा पद्धतीमध्ये बदल प्रस्तावित आहेत. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मानव्यता, गणित आणि संगणन, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, समाजशास्त्र, विज्ञान आणि आंतरविद्याशाखा या शाखांमध्ये विषय उपलब्ध होतील. प्रत्येक वर्षी आठ या प्रमाणे १६ विषय पूर्ण करून उत्तीर्ण व्हावे लागेल. सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांना किमान पाच विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागते. दहावीच्या वार्षिक परीक्षेसाठी तीच पद्धत कायम ठेवली जाईल. अकरावी -बारावीसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा ही पारंपरिक रचना मोडीत काढण्याची शिफारस करण्यात आली आहे. अकरावी – बारावीमध्ये विद्यार्थ्यांना मानव्यता, गणित आणि संगणन, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, समाजशास्त्र, विज्ञान आणि आंतरविद्याशाखा यांतून त्यांच्या आवडीनुसार तीन शाखांतील एकूण १६ विषयांची निवड करता येईल. सध्याच्या परीक्षा पद्धतीनुसार अकरावी आणि बारावीची परीक्षा एकदाच घेतली जाते. मात्र नव्या आराखडय़ात वर्षांतून दोनवेळा, सत्र पद्धतीने परीक्षा घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन परीक्षांचा मिळून एकत्रित निकाल जाहीर केला जाईल. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील तरतुदीनुसार टप्प्याटप्प्याने ‘मागणीनुसार परीक्षा’ पद्धतीकडे जाण्याबाबतही आराखडय़ात नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आधीच्या वर्षी शिकलेल्या संकल्पनांची उजळणी होण्यासाठी महिन्याभराचा ‘ब्रिज कोर्स’ प्रस्तावित करण्यात आला आहे. नवा आराखडा २०२४-२५ पासून लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

chinmay.patankar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National curriculum framework class 10th 12th semester exam print exp 0423 zws
Show comments