पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय गुजरातच्या लोथल येथील राष्ट्रीय सागरी वारसा संकुल प्रकल्पाचा दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी, ”सिंदू संस्कृतीत लोथल हे केवळ व्यापारी केंद्र नसून भारताच्या सागरी सामर्थ्याचे प्रतिक असल्याची भावना व्यक्त केली. तसेच आपल्या इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याकडे आपण दुर्लेक्ष करत असल्याचे ते म्हणाले. मात्र, लोथल नेमकं कुठे आहे? येथील गोदी आणि हा प्रकल्प नेमका काय आहे? जाणून घेऊया.
हेही वाचा – विश्लेषण : बंगालच्या उपसागरात धडकणार ‘Sitrang’ चक्रीवादळ; जाणून घ्या महाराष्ट्राला किती धोका?
लोथल कुठे आहे?
फाळणीनंतर सिंधू संस्कृतीची साक्ष देणारी बरीच ठिकाणे पाकिस्तानात गेली असली तरी काही ठिकाणे भारतातही आढळली आहेत. १९५५ ते १९६० दरम्यान भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये उत्खननाची एक मोहीम हाती घेतली होती. एस.आर. राव यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले होते. या मोहिमेतूनच सिंधू संस्कृतीची साक्ष देणाऱ्या काही ठिकाणांचा शोध लागला. यात लोथल येथील गोदीचाही समावेश होता. अहमदाबादपासून ८५ किमीवर असलेल्या भाल या ठिकाणी ही गोदी आहे. सिंधू संस्कृती दरम्यान, लोथल हे व्यापारी केंद्र होते. या ठिकाणाहूनच पश्चिम आशिया आणि आफ्रिकेच्या देशांपर्यंत व्यापार केला जात होता. लोथलला एप्रिल २०१४ मध्ये युनेस्कोच्या ( UNESCO) जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नामांकन मिळाले होते. मात्र, अद्यापही त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला नाही. लोथल येथील गोदीच्या रचनेचा आणि एकूण वैशिष्टांचा विचार केला तर ही गोदी ओस्टिया (रोम), इटलीतील कार्थेज (पोर्ट ऑफ ट्युनिस), चीनमधील हेपू, इजिप्तमधील कॅनोपस, यासारख्या प्राचीन बंदरांच्या दर्जाची होती, असे म्हणता येईल.
हेही वाचा – विश्लेषण: आपण रोज किती तास झोप घ्यायला हवी? कमी किंवा जास्त झोपेमुळे शरीरावर कसा परिणाम होतो जाणून घ्या
प्रकल्प नेमका काय आहे?
दरम्यान, भारत सरकारकडून याठिकाणी ३५०० कोटींचा एक प्रकल्प उभारण्यात येत आहेत. तंत्रज्ञानाच्या आधारे हडप्पा संस्कृती, वास्तूकला, हडप्पाकालीन जीवनशैली पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तसेच याठिकाणी विविध थीम पार्कही उभारण्यात येणार आहेत. याबरोबच भारताच्या सागरी सामर्थ्याचे दर्शन घडवणाऱ्या १४ गॅलरीही उभारण्यात येणार आहेत. लोथल येथील राष्ट्रीय सागरी वारसा संकुल भारताचा सागरी इतिहास शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करेन, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे. तसेच लोथलला जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.