-अमोल परांजपे
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अमेरिका-युरोप विरुद्ध रशिया या संघर्षाला नवी धार चढली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन अणुयुद्धाची धमकी देत असताना युरोपीय महासंघदेखील तशाच भाषेत उत्तर देताना दिसतो आहे. तशातच आता ‘नाटो’ ही लष्करी संघटना आणि रशिया या दोघांचेही अणुयुद्धाभ्यास होत आहेत. यामुळे तणाव निवळण्याऐवजी अधिकच वाढला आहे.
युद्धाभ्यास म्हणजे काय आणि त्याची गरज काय?
आपण युद्धाभ्यासाबाबत नेहमीच ऐकतो-वाचतो. या युद्धाभ्यासामागे तीन मुख्य कारणे असतात. शांतताकाळात सैनिकांना लढण्याचा सराव रहावा, त्यानिमित्ताने लष्करी ताकद तपासली जावी हा यामागचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे सैन्यदले सुस्त होत नाहीत आणि आयुधांना गंज चढत नाही. दुसरे कारण म्हणजे अर्थातच आपल्या संभाव्य शत्रूंना ताकद दाखवत राहणे. तिसरे कारण असते ते दोन देशांमध्ये किंवा देशांच्या गटांमध्ये परस्पर सहकार्याचे. अनेकदा दोन किंवा त्यापेक्षा जास्त मित्रराष्ट्रांचा एकत्रित युद्धाभ्यास होतो. त्यामुळे एकमेकांच्या युद्धनीतीचा अभ्यास करता येतो आणि एकत्र लढायची वेळ आलीच तर दोन्ही सैन्यदलांमध्ये समन्वय किती राहील, हे आजमावता येते.
युद्धाभ्यास आणि अणुयुद्धाभ्यास यामध्ये फरक काय?
नावांवरून लक्षात येईलच, की युद्धाभ्यास म्हणजे साधारणतः नौदल, हवाईदल आणि लष्कराचा सर्वसामान्य सराव असतो. तर अणुयुद्धाभ्यासामध्ये अणुहल्ला झाला तर त्याचा प्रतिकार किंवा प्रतिहल्ला कसा करता येईल, याचा सराव केला जातो. अर्थात उत्तर कोरियासारखा अपवाद वगळता सर्व देशांचे प्रथम अणुहल्ला करायचा नाही, हेच धोरण आहे. त्यामुळे अणुयुद्धाभ्यासात प्रामुख्याने आण्विक हल्ल्याच्या प्रतिकाराचा सरावच केला जातो.
‘नाटो’चा अणुयुद्धाभ्यास नेमका काय आहे?
‘उत्तर अटलांटिक करार संघटना’ (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन – नाटो) ही अटालांटिक महासागराच्या परिसरातील देशांची लष्करी संघटना आहे. अमेरिका, कॅनडा ही उत्तर अमेरिकेतील राष्ट्रे, जर्मनी, फ्रान्ससह अनेक युरोपीय देश, ब्रिटन, पोर्तुगाल, तुर्कस्तान असे एकूण ३० देश या संघटनेचे सदस्य आहेत. यातील १४ देशांचा ‘स्टेडफास्ट नून’ नावाचा अणुयुद्धाभ्यास सुरू झाला आहे. बेल्जियम हा या युद्धाभ्यासाचा यजमान देश आहे. सुमारे आठवडाभर हा युद्धाभ्यास चालेल. यामध्ये अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या विविध देशांच्या सुमारे ६० प्रकारच्या लढाऊ विमानांचा समावेश आहे. तसेच अणुहल्ला झाला तर त्याचा मुकाबला कसा करता येईल, याचाही सराव यावेळी केला जातो आहे. ‘नाटो’तर्फे दशकभरापासून अणुयुद्धाभ्यास केला जात असला तरी यावेळी युक्रेन युद्धामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुतिन यांच्या अण्वस्त्रहल्ल्याच्या धमकीचा परिणाम किती?
पुतिन ‘टोकाचे पाऊल उचलण्याची’ अर्थात अण्वस्त्रे डागण्याची धमकी खरी करतील का, याविषयी युरोप-अमेरिकेत मतांतरे आहेत. मात्र धोका कुणालाच पत्करायचा नाही. त्यामुळे यंदाच्या ‘स्टेडफास्ट नून’ युद्धाभ्यास सर्वार्थाने वेगळा आहे. यात सहभागी झालेल्या देशांना आणि सैनिकांना ही केवळ लुटुपुटीची लढाई असली, तरी या प्रसंगातून खरोखरच जावे लागू शकणार नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे यंदा अधिक गांभिर्याने अणुयुद्धाभ्यास केला जातोय. शिवाय यावेळी रशियाला खरोखरच ‘नाटो’ची अण्वस्त्रसिद्धता दाखवून देणे ही काळाची गरज आहे. त्यातच महिनाअखेरीस रशियाचाही अणुयुद्धाभ्यास होणार असल्यामुळे अमेरिका-युरोप अधिकच सावध झाले असल्यास नवल नाही.
रशियाच्या अणुयुद्धाभ्यासामुळे तणावात आणखी भर पडेल?
एकीकडे युक्रेन युद्धात गुंतलेल्या रशियाने आपल्या वार्षिक अणुयुद्धाभ्यासाचा कार्यक्रम ठरल्यानुसार घेण्याचे निश्चित केले आहे. या अणुयुद्धाभ्यासाला ‘ग्रोम’ असे नाव देण्यात आले आहे. ढोबळमानाने ‘ग्रोम’चा अर्थ मेघगर्जना किंवा गडगडाट असा आहे. अर्थात यामध्ये नेमका कसला अभ्यास केला जाणार आहे, हे रशियाने स्पष्ट केलेले नाही. एकीकडे युक्रेन आणि युरोपला अण्वस्त्रहल्ल्याची धमकी पुतिन यांनी दिली आहे. त्यामुळे या युद्धामध्ये प्रत्यक्ष हल्ल्याचा सराव केला जाण्याची शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. ‘नाटो’ आणि रशियाच्या अणुयुद्धाभ्यासांमध्ये हाच मूलभूत फरक आहे.
‘स्टेडफास्ट नून’ आणि ‘ग्रोम’ यामध्ये फरक काय?
आपल्या अणुयुद्धाभ्यासात केवळ अण्वस्त्र वहनाची क्षमता असलेल्या विमानांचा समावेश असेल, मात्र यावेळी कोणतीही जिवंत स्फोटके वापरली जाणार नाहीत, हे ‘नाटो’ने आधीच जाहीर केले आहे. प्रामुख्याने अण्वस्त्रहल्ल्याच्या प्रतिकाराचा सराव यावेळी केला जाणार आहे. रशियाच्या ‘ग्रोम’मध्ये मात्र अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांचीही चाचणी केली जाणार असल्याची माहिती आहे. याचा अर्थ ‘नाटो’चा सराव हा प्रामुख्याने बचावात्मक आहे, तर रशिया आक्रमणाचा सराव अधिक करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच रशियाच्या सरावावर अमेरिका आणि युरोपचे यावेळी अधिक बारीक लक्ष असेल.
अणुयुद्धाभ्यासांमुळे तणाव निवळण्याऐवजी आणखी वाढणार?
युद्धाभ्यास हा शांतताकाळात केला जाणारा लष्करी सराव आहे आणि रशियामध्ये आजमितीस शांतताकाळ नाही. त्यांनीच छेडलेल्या युद्धाच्या झळा सगळ्या जगाला बसत आहेत. अशा वेळी ‘सरावा’ची खरोखर गरज आहे का, असा प्रश्न ‘नाटो’कडून विचारला जातो आहे. त्याबरोबरच ‘अणुयुद्धाभ्यास करायचा तर करा, पण आपल्या मर्यादांचे भान ठेवा आणि सीमारेषांचे काटेकोर पालन करा,’ असा इशाराही ‘नाटो’च्या प्रमुखांनी रशियाला दिला आहे. दुसरीकडे रशियाचा अणुयुद्धाभ्यास आणि त्यांच्या सर्व अण्वस्त्रांच्या हालचालींवर अमेरिकेचे बारीक लक्ष असेल. कोणतीही अनपेक्षित गोष्ट निदर्शनास आली तर त्याचे गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे हे अणुयुद्धाभ्यास संपेपर्यंत वातावरणात वाढलेला अण्वस्त्रांचा तणाव कायम राहणार आहे.