भारतीय नौदलाचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत आहे. भारत आपल्या पाणबुडी नौदल दलाचा हळूहळू विस्तार करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून २०२६ पर्यंत आंध्र प्रदेशात युद्धनौकांसाठी नवीन तळ बांधण्याची योजना आखली जात आहे. त्याबरोबरच नौदलात तिसरी आण्विक पाणबुडीदेखील सामील करण्यासाठी भारताने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने ९,८०० टन क्षमतेच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या दोन पाणबुड्यांना मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नौदल तळ कसा असणार? काय आहे ‘आयएनएस अरिधमन’? त्यामुळे भारतीय नौदलाचे सामर्थ्य कसे वाढेल? त्याविषयी जाणून घेऊ…
युद्धनौकांसाठी नवीन तळ
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर लवकरच एक नवीन नौदल तळ सुरू करणार आहे. हा नवीन तळ रामबिल्ली गावाजवळ सुरू केला जाईल, अशी माहिती आहे. हा तळ आण्विक पाणबुड्यांसह इतर युद्धनौकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. विशाखापट्टणममधील पूर्व नौदल कमांडपासून या तळाचे अंतर सुमारे ५० किलोमीटर आहे. या नौदल तळातील भूमिगत बोगद्यांमध्ये पाणबुड्या ठेवता येतील. मुख्य म्हणजे गुप्तचर उपग्रहांना न सापडता जहाजे बंगालच्या उपसागरात गस्त घालू शकतील, तसेच जहाजांना मलक्का सामुद्रधुनी आणि त्यापलीकडे असणाऱ्या प्रतिबंधक गस्त्यांवर जाणेदेखील शक्य होईल.
ही मोहीम प्रोजेक्ट वर्षाच्या अंतर्गत सुरू आहे. याविषयी सूत्रांनी माहिती देताना सांगितले की, प्रोजेक्ट वर्षाच्या अंतर्गत रामबिल्ली तळाचा पहिला टप्पा जवळजवळ पूर्ण झाला आहे. २०२६ मध्ये हा तळ कार्यान्वित होईल. जसे प्रोजेक्ट सीबर्ड अंतर्गत कारवार तळ सुरू करण्यात आले होते आणि त्यानंतर त्याचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला, तसेच या तळाच्या बाबतीतही केले जाईल. प्रोजेक्ट सीबर्डचा पहिला टप्पा १० जहाजांना सामावून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आला. २०११ मध्ये हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला. प्रोजेक्ट सीबर्डमधील तळावर असणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये १० जहाजे बसविण्यास सक्षम असलेली जागा, १०,००० टन वजनाची मर्यादा असणारे जहाज लिफ्ट आणि ड्राय बर्थ, नौदल जहाजाच्या दुरुस्तीची जागा, शस्त्रास्त्रे साठवण्याची सुविधा, १,००० कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था, यांसारख्या सर्व सुविधा त्यावर आहेत.
या नौदल तळाचे काम पूर्ण करण्यासाठी भारताला एक दशकाहून अधिक कालावधी लागला. त्याच्या बांधकामादरम्यान अनेक तांत्रिक, पर्यावरणीय आणि इतर आव्हानांना तोंड द्यावे लागले. भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या कारवार तळातही भारत सुधारणा करत आहे. हा तळ कर्नाटकमध्ये आहे. फेज २-अ चे काम पूर्ण झाल्यानंतर कारवारमध्ये ३२ युद्धनौका असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्य म्हणजे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील शनिवारी भारतीय नौदलाच्या नवीन मोहीम ‘आयओएस सागर’ला हिरवा झेंडा दाखवला, तसेच कारवार नौदल तळावर तब्बल २,००० कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचेदेखील उद्घाटन केले आहे.
‘आयओएस सागर’ हा एक उपक्रम आहे. भारताच्या म्युच्युअल अँड होलिस्टिक अॅडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अॅक्रॉस द रिजन (MAHASAGAR)च्या अनुषंगाने आयओआर राष्ट्रांबरोबर वाटाघाटी करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला जात आहे. “हे पाऊल केवळ आपल्या सुरक्षेशी आणि राष्ट्रीय हितांशी संबंधित नाही, तर ते या प्रदेशातील आपल्या मित्र राष्ट्रांमधील हक्क आणि कर्तव्यांशीदेखील संबंधित आहे. आपले नौदल हे सुनिश्चित करते की, हिंद महासागरात कोणताही देश आपल्या अर्थव्यवस्था आणि लष्करी सामर्थ्याच्या बळावर दुसऱ्या राष्ट्राला दडपणार नाही,” असे राजनाथ सिंह म्हणाले.
भारतात सामील होणार तिसरी आण्विक पाणबुडी
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, भारत अणुऊर्जेवर चालणारी तिसरी पाणबुडीदेखील भारतीय नौदलात सामील करण्याच्या तयारीत आहे. ही पाणबुडी न्यूक्लियर-टिप्ड बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असणार आहे. या पाणबुडीचे नाव आहे ‘आयएनएस अरिधमन’. या पाणबुडीचे विस्थापन तब्बल ७,००० टन आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’नुसार, भारतीय नौदलाकडे सध्या न्यूक्लियर-टिप्ड बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असणाऱ्या दोन आण्विक पाणबुड्या आहेत. एक आहे आयएनएस अरिहंत, तर दुसरी आहे आयएनएस अरिघात.

२०२४ मध्ये आयएनएस अरिघात नौदल ताफ्यात सामील करण्यात आली होती; तर आयएनएस अरिहंत ऑगस्ट २०१६ पासून कार्यान्वित आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, आयएनएस ‘आयएनएस अरिधमन’ ही आयएनएस अरिहंत आणि अरिघातपेक्षा मोठी पाणबुडी असणार आहे. त्यामुळे ही पाणबुडी अधिक लांब पल्ल्याची अणुऊर्जेवर चालणारी क्षेपणास्त्रे सज्ज करण्यास सक्षम असेल. ‘आयएनएस अरिधमन’मध्ये विमाने, जमिनीवर आधारित बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि पाणबुडीद्वारे सोडली जाणारी क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता असेल.
भारताला चौथे न्यूक्लियर-टिप्ड बॅलिस्टिक क्षेपणास्त्र मिळणार असण्याचीदेखील माहिती आहे. त्याचे सांकेतिक नाव एस-४ असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिका, रशिया, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, चीन व भारत या फक्त सहा देशांकडे आण्विक पाणबुड्या आहेत. भारत विशेष म्हणजे भारत १९० मेगावॉट क्षमतेच्या, अधिक शक्तिशाली रिअॅक्टर असणाऱ्या १३,५०० टन क्षमतेची न्यूक्लियर-टिप्ड बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे तयार करण्याची योजना आखत आहे, असे वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे. ऑक्टोबरमध्ये सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने क्षेपणास्त्रांनी सज्ज दोन आण्विक पाणबुड्या बांधण्यास मंजुरी दिली आहे. सूत्रांनी माहिती दिली आहे की, विशाखापट्टणम येथील जहाज बांधणी केंद्रात ४०,००० कोटी रुपये खर्चून ९,८०० टन क्षमतेच्या दोन आण्विक पाणबुड्या विकसित केल्या जातील. परंतु, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एक दशकाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.