अनिकेत साठे
भारतीय नौदलाने हिंद महासागर क्षेत्रात एकाच वेळी ११ पाणबुड्या तैनात करून चीनला स्पष्ट संदेश दिला आहे. अशा प्रकारे सामर्थ्याचे दर्शन घडविण्याची तीन दशकांतील ही पहिलीच वेळ आहे. हिंद महासागरात चीनच्या हालचालींमध्ये वाढ झाली आहे. कुठल्याही वेळी चीनच्या पाच ते नऊ युद्धनौका या क्षेत्रात असतात. पाणबुडीसारख्या छुप्या आयुधाने कुठलेही आव्हान मोडून काढण्याची सज्जता आणि वेळप्रसंगी व्यापारी मार्गांवर प्रभाव पाडण्याची क्षमता भारतीय नौदलाने अधोरेखित केली.
नाविक शक्तीचे दर्शन कसे घडले?
नौदलाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात नुकत्याच झालेल्या सरावात आठ पाणबुड्या सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या एकत्रित प्रात्यक्षिकातून कुठल्याही क्षणी युद्धसिद्धता दाखवली गेली. पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल संजय सिंग यांनी सरावाचा आढावा घेतला. याच दरम्यान नौदलाच्या अन्य तीन पाणबुड्या वेगवेगळ्या क्षेत्रात मार्गस्थ झाल्या होत्या. यातील कलवरी वर्गातील पाणबुडी कॅम्पबेल बंदरापर्यंत पोहचली. पूर्व हिंद महासागर क्षेत्रातील भारताच्या शेवटच्या आयएनएस बाझ तळास पाणबुडीने भेट दिली. हिंद महासागरात विविध ठिकाणी एवढी मोठी तैनाती प्रदीर्घ काळानंतर केली गेली. ‘संकल्प’ मोहिमेने लहान आणि जलद मोहिमेच्या भ्रामक कल्पना मोडीत निघाल्या, महासागरात सुरक्षितता व स्थिरता राखण्यासाठी सातत्यपूर्ण मोहिमांची आवश्यकता समोर आली. त्यावर नौदलाने भर दिल्याचे नौदलप्रमुख ॲडमिरल हरी कुमार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी का होत नाही?
स्थान महत्त्वाचे कसे?
अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, तांबडा समुद्र, पर्शियाचे आखात आणि बब-एल मंडप, होमुझ, मल्लाका, सुंदा व लँबॉक यासारख्या सामुद्रधुनींना सामावणाऱ्या हिंद महासागरातील मध्यवर्ती भूभाग म्हणून भारतीय द्वीपकल्पाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. जगातील ५० टक्के माल वाहतूक आणि खनिज तेल वाहून नेणाऱ्या दोन तृतीयांंश जहाजांची वाहतूक येथून होते. या क्षेत्रातील चिनी आव्हानांना शह देण्यासाठी भारतीय नौदलाने पाणबुडी तैनातीचा पवित्रा घेतला. निकोबार बेट समूहातील कॅम्पबेलपर्यंत एका पाणबुडीने मार्गक्रमण केले. हिंद महासागराला दक्षिण चीन समुद्राशी जोडणारी मल्लाकाची अरुंद पट्टी चीनसाठी आर्थिक व सामरिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. इंडोनेशियाच्या उत्तरेस केवळ १४५ किलोमीटर अंतरावर हे बेट आहे. ग्रेट निकोबार व इंडोनेशियन बेट सुमात्रा दरम्यानच्या व्यापारी मार्गांना ते प्रभावित करू शकते. भारताच्या मूख्य भूमीपासून दीड हजार किलोमीटर अंतरावर विकसित केलेल्या ‘आयएनएस बाझ’ तळाने सभोवतालच्या क्षेत्रावर देखरेखीसाठी भारतीय नौदलास ताकद मिळाली आहे.
चिनी नौदलाचे आव्हान कसे आहे?
जवळपास ३५० जहाज सामावणारे चीन हे जगातील आकारमानाने सर्वांत मोठे नौदल झाले आहे. त्याच्या सुदूर सागरातील हालचाली वेगाने वाढत असून कुठल्याही वेळी पाच ते नऊ चिनी युद्धनौका, पाणबुड्या हिंद महासागर क्षेत्रात कार्यरत असतात. संशोधनाच्या नावाखाली चिनी जहाज संचार करतात. नोव्हेंबर २०२३ मध्ये चिनी नौदलाच्या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडीने पश्चिम हिंद महासागरात पाकिस्तानी नौदलासोबत संयुक्त सागरी गस्तीत सहभाग घेतला होता. चीनकडील पाणबुड्यांचा ताफा विस्तारत आहे. पाकिस्तानी नौदल सक्षम करण्यासाठी तो तांत्रिक मदत पुरवतो. हिंद महासागर क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीनची धडपड सुरू आहे. चिनी नौदलाकडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता राखणाऱ्या सहा पाणबुड्या आहेत. डिझेलवर आधारित ४६ पाणबुड्यांचे तो संचलन करतो. चिनी नौदलाच्या आराखड्यानुसार ६५ ते ७० पाणबुड्यांच्या देखभाल दुरुस्तीचे नियोजन आहे. सभोवतालची बदलती परिस्थिती आणि चीनच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी भारतीय नौदलाची जहाजे, युद्धनौका, पाणबुडी व विमाने अशा सर्व स्तरावर समतोल बांंधणीची गरज संसदेच्या संरक्षणविषयक स्थायी समितीने मांडली आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?
भारतीय नौदलाची तयारी कशी?
भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या सुमारे १३१ युद्धनौका असून चीनच्या तुलनेत पाणबुड्यांची संख्या अतिशय कमी आहे. यामध्ये १६ पारंपरिक (डिझेल व विजेवर चालणाऱ्या) पाणबुड्या आणि एक अणुशक्तीवर आधारित आयएनएस अरिहंतचा समावेश आहे. स्वदेशी बनावटीच्या अरिहंतने नौदलास पाण्यातून देखील अण्वस्त्र डागण्याची क्षमता प्राप्त झाली. या वर्गातील दुसऱ्या अरिघाट पाणबुडीच्या सागरी चाचण्या सुरू असल्याचे सांगितले जाते. पारंपरिक पाणबुडीच्या ताफ्यात कलवरी वर्गीय पाच (फ्रान्स), शिशुमार वर्गातील चार (जर्मन) आणि सिंधुघोष वर्गातील सात (रशियन) यांचा अंतर्भाव आहे. नव्याने आणखी काही पाणबुड्या दाखल होण्याच्या मार्गावर आहेत. रशियाकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या अकुला श्रेणीच्या पाणबुडीची प्रतीक्षा आहे. २०२७पर्यंत नौदलास २०० जहाजांनी सुसज्ज करण्याची योजना आहे. मात्र, ती अतिशय संथपणे पुढे जात आहे. निर्धारित काळात कितपत लक्ष्य गाठता येईल याबद्दल साशंकता व्यक्त होते. देशात ४३ जहाजे आणि पाणबुड्यांची बांधणी प्रगतीपथावर आहे. या व्यतिरिक्त स्वदेशी बनावटीची ५१ जहाजे, सहा पाणबुड्यांच्या बांधणीला प्राथमिक मान्यता मिळाली आहे.