पाकिस्तानचे तीन वेळा पंतप्रधानपद भूषविलेले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे शनिवारी (दि. २१ ऑक्टोबर) मायदेशी परतले. पाकिस्तानातून हद्दपारी झाल्यानंतर त्यांनी चार वर्ष लंडनमध्ये काढली. पाकिस्तान मुस्लीम लीग – नवाझ या पक्षाचे प्रमुख ७३ वर्षीय नवाझ शरीफ शनिवारी इस्लामाबाद विमानतळावर उतरल्यानंतर सरळ लाहोरच्या दिशेने गेले आणि तिथे त्यांनी आपल्या समर्थकांची मोठी जाहीर सभा घेतली. २०१९ साली भ्रष्टाचार प्रकरणात सात वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर नवाझ शरीफ लंडनमध्ये वैद्यकीय उपचारासाठी रवाना झाले. वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मायदेशी परतणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी पाकिस्तानात पाऊल ठेवले नाही.
पंतप्रधान पदावर असताना एका भ्रष्टाचार प्रकरणात नाव आल्यानंतर नवाझ शरीफ यांनी लष्काराचा विश्वास गमावला आणि त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. नवाझ शरीफ यांचे पाकिस्तानात परतण्यासाठीही आता लष्करच कारणीभूत असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. पाकिस्तानात सध्या नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे आणि निवडणुका झाल्यास इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी लष्कर नवाझ शरीफ यांना पुन्हा पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हे वाचा >> “भारत चंद्रावर पोहोचला आणि पाकिस्तान जगाकडे पैशांची भीक मागतोय”, नवाझ शरीफ यांचं विधान
शरीफ यांच्यावरील भ्रष्टाचाराची प्रकरणे
२०१३ साली नवाझ शरीफ यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या कार्यकाळात त्यांनी पाकिस्तानला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याचे प्रयत्न केले. शरीफ यांनी या काळात पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प पूर्ण केले, तसेच वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण कमी केले. तीन वर्षांनंतर पनामा पेपर्स बाहेर आल्यानंतर एकच गदारोळ माजला. शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाने परदेशात संपत्ती आणि लंडनमध्ये घर खरेदी केल्याचे या पेपर्समधून समोर आले. माजी पंतप्रधान शरीफ यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. जून २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अप्रामाणिक ठरवून पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरवले, ज्यामुळे त्यांना खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले.
पंतप्रधानपदावरून बाजूला होण्याची नामुष्की शरीफ यांच्यावर आली होतीच, पण इथवरच हे संकट थांबले नाही. एका वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांच्यावर राजकारणात सक्रिय होण्याबाबत आजन्म बंदी घातली. तसेच राजकारणासह सरकारच्या कोणत्याही निर्णायक पदावर आरूढ होण्यास रोखण्यात आले. डिसेंबर २०१८ साली आणखी एका न्यायालयाने शरीफ यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवत सात वर्ष कारावास आणि २५ दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला. यामुळे शरीफ यांचा पाय आणखी गाळात रुतला. विशेष म्हणजे सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही महिन्यातच न्यायालयाने सदर निर्णय जाहीर केला होता. या निवडणुकीत शरीफ यांच्या पक्षाचा सपशेल पराभव होऊन त्यांचे विरोधक असलेल्या इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) हा पक्ष सत्तेत आला.
नोव्हेंबर २०१९ रोजी शरीफ यांनी वैद्यकीय उपचारासाठी परवानगी घेतली आणि लंडनमध्ये गेले. त्यानंतर आता चार वर्षांनंतर ते पाकिस्तानात आले आहेत.
पाकिस्तानी लष्कराशीही बिनसले
नवाझ शरीफ यांच्या राजकीय पडझडीला फक्त भ्रष्टाचाराचे प्रकरण कारणीभूत ठरले असे नाही. पंतप्रधान असताना शरीफ यांचे पाकिस्तानी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही खटके उडाले होते, त्यामुळे लष्कराची खप्पामर्जी त्यांनी ओढवून घेतली. पाकिस्तानातील माध्यमांच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय धोरणाच्या पेचप्रसंगात लष्कर आणि पाकिस्तानी सरकार यांच्या भूमिकांमध्ये विसंगती आढळून येत होती. खास करून भारताशी संबंधाबाबत हे दिसून आले. भारताशी चांगले संबंध असावेत, असा प्रयत्न शरीफ यांच्याकडून केला जात होता. पठाणकोट आणि उरी येथे जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्यबाने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि शरीफ यांच्यात मतभेद होते. पाकिस्तानचे सरकार चालवत असतानाच शरीफ यांनी उच्च लष्करी अधिकाऱ्यांविरोधात अनेकदा नाराजी व्यक्त केली होती.
हे वाचा >> पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर इम्रान खान यांच्या समर्थकाचा हल्ला
या सर्वांचा परिणाम असा की, लष्कराने शरीफ यांना दिलेला आपला पाठिंबा काढून घेतला आणि त्यांची हकालपट्टी केली. पाकिस्तानच्या राजकीय परिस्थितीचे जाणकार सांगतात त्यानुसार शरीफ यांच्या विरोधात परिस्थिती निर्माण झाल्यामुळेच २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाला लाभ उचलता आला.
शरीफ यांची घरवापसी
शरीफ यांच्या नंतर सत्तेत आलेल्या इम्रान खान यांचेही लष्काराशी जुळलेले सुत फार काळ टिकू शकले नाही. मागच्या वर्षी लष्काराशी मतभेद झाल्यानंतर इम्रान खान यांच्याविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आणि त्यात इम्रान खान यांचा पराभव होऊन त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. माजी क्रिकेटपटू असलेल्या आणि नंतर राजकारणी झालेल्या इम्रान खान यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि दहशतवादाची शेकडो प्रकरणे दाखल करण्यात आली. खान यांच्या पीटीआय पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले, काहींना अटक झाली तर काही जण अज्ञातवासात गेले. स्वतः इम्रान खान यांना ५ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.
इम्रान खान यांच्यावर अनेक अडचणी असल्या तरी पाकिस्तानातील जनमानसात त्यांची चांगली लोकप्रियता आहे. गॅलप पाकिस्तान पोलने यावर्षी जून महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार इतर कोणत्याही राजकारण्यापेक्षा इम्रान खान यांना ६० टक्के पाकिस्तानी जनतेने आपला नेता मानले होते, अशी बातमी न्यूयॉर्क टाइम्सने दिली होती.
त्यामुळेच आगामी सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने शरीफ यांचा पाकिस्तानात परतण्याचा मार्ग मोकळा करून दिला, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. मागील आठवड्याच्या सुरुवातीला इस्लामाबाद उच्च न्यायालयाने शरीफ यांना अटकेपासून संरक्षण देणारा जामीन मंजूर केला. याचाच अर्थ तात्पुरता जामीन मिळविण्यासाठी शरीफ जेव्हा न्यायाधीशांसमोर हजर होतील तेव्हा त्यांना अटक केली जाणार नाही.
नवाझ शरीफ यांचा अनुभव आणि राजकीय करिष्म्याचा वापर करून आगामी निवडणुकीत पीटीआय पक्षाचा पराभव करण्याचे मनसुबे लष्कराने आखले असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाची धुरा त्यांचा भाऊ शेहबाज सांभाळत आहे. सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचली असून महागाई आणि चलनवाढ गगनाला भिडली आहे, त्यामुळे वर्तमान राज्यकर्त्यांना सामान्य जनतेकडून फारसा पाठिंबा मिळत नाही आहे.
“नवाझ शरीफ पाकिस्तानात परतल्यामुळे ते चौथ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळू शकतील, अशी शक्यता आहे. ते अजूनही त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान त्यांचा भाऊ पंतप्रधान पदावर असताना त्यांनी लंडनमधून निर्णय प्रक्रिया राबविली होती, अशी माहिती ब्रुकिंग्ज संस्थेच्या संशोधक मदिहा अफजल यांनी डीडब्लू वृत्तसंकेतस्थळाशी बोलताना सांगितली.
मदिहा पुढे म्हणाल्या की, इम्रान खान यांच्यापेक्षा जास्त शरीफ यांची लोकप्रियता आहे आणि त्यांच्या राजकीय पक्षाचे भविष्य उज्ज्वल करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. पण, यासाठी त्यांना भ्रष्टाचार प्रकरणातून मुक्त व्हावे लागेल. २०१९ मध्ये त्यांनी देश सोडल्यानंतर त्यांच्यावरची भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित आहेत.