एके काळी नक्षलवादी चळवळीचा केंद्रबिंदू असलेल्या तेलंगणामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या आक्रमक धोरणामुळे नक्षलवाद संपुष्टात आला होता. मात्र, दीड दशकानंतर पुन्हा तेलंगणात नक्षल्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.
तेलंगणातील नक्षल चळवळीची पार्श्वभूमी काय?
१९७० च्या दशकात पश्चिम बंगालमधून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध कथित क्रांतीची हाक देत हिंसक नक्षलवादी चळवळीची सुरुवात झाली. पण या चळवळीला खरी धार १९८० च्या सुमारास तेलंगणातून (तत्कालीन आंध्र प्रदेश) आली. कोंडापल्ली सीतारामय्यासारख्या कडव्या डाव्या नेत्यांनी पीपल्स वॉर ग्रुपची स्थापना करून या चळवळीला अधिक बळ दिले. दरम्यानच्या काळात नक्षल्यांच्या हिंसक कारवाया मोठ्या प्रमाणात वाढत गेल्या. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने नक्षलविरोधी धोरण राबवून शेकडो नेते आणि नक्षलवादी मारले. २०१० नंतर तेलंगणातील नक्षलवाद हळूहळू संपुष्टात आला. नक्षलवाद्यांच्या ‘पीडब्लूजी’चे (पीपल्स वॉर ग्रुप) संस्थापक कोंडापल्ली सीतारामय्या, लक्ष्मण राव, केशव राव, कटकम सुदर्शन, कोटेश्वर राव, नर्मदा अक्का आदी नेते तेलंगणातूनच आले होते.
हेही वाचा >>> Women in Defence Forces : केंद्रीय सुरक्षा यंत्रणांमध्ये महिलांचं प्रमाण का कमी आहे?
दशकभरानंतर अचानक हालचाली का वाढल्या?
या वर्षी तेलंगणातील भंडारी कोत्तागुडम जिल्ह्यात आणि २ डिसेंबरला मुलुगू जिल्ह्यात झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. काही महिन्यांच्या अंतराने घडलेल्या या घटनांमुळे दशकभरानंतर तेलंगणात पुन्हा नक्षलवादी सक्रिय झाल्याची पुष्टी मिळाली. यामुळे सुरक्षा यंत्रणांनी राज्य सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेजारच्या छत्तीसगड आणि गडचिरोलीत मागील पाच वर्षांपासून सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेल्या आक्रमक नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलवादी चळवळीचे कंबरडे मोडले होते. चालू वर्षात झालेल्या विविध चकमकीत ३०० पेक्षा अधिक नक्षलवादी मारले गेले. ८०० नक्षल्यांना अटक करण्यात आली, तर तेवढ्याच नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये मोठे नेते असल्याने ही चळवळ नेतृत्वहीन झाली. परिणामी उर्वरित नेत्यांनी भूमिगत होऊन आपला मुक्काम अबुजमाडमध्ये हलवला. परंतु गेल्या काही महिन्यांपासून छत्तीसगड आणि गडचिरोली पोलिसांनी अबुजमाड परिसरात केलेल्या कारवायांमुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले आहे. भविष्यातील व्यूहरचनेसाठी त्यांनी जुने प्रभावक्षेत्र तेलंगणात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.
भूमिगत नक्षल समर्थक पुन्हा सक्रिय?
वर्षभरातील घटनांकडे बघितल्यास तेलंगणात नक्षलवादी पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आले आहे. गेल्यास दोन वर्षांत तेलंगणा पोलिसांनी ९८ नक्षल्यांना अटक केली आहे. यातील बहुतांश मोठे नेते असून ते अनेक वर्षांपासून भूमिगत होते. परंतु पुन्हा सक्रिय झाल्याने ते सुरक्षा यंत्रणांच्या ‘रडार’वर आले. दरम्यान, त्यांच्याकडून शस्त्र व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्यदेखील जप्त करण्यात आले. मधल्या काळात उस्मानिया विद्यापीठातील काही प्राध्यापकांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेलंगणातील आदिलाबाद, भंडारी कोत्तागुडम, भूपलपल्ली, कुमराम भीम, खंमम, पेदापल्ली आदी जिल्हे आजही नक्षल प्रभावित आहेत. याच बळावर नक्षलवाद्यांनी तेलंगणात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : बँक खातेदारांना आता चार नॉमिनेशन्सची मुभा… नवीन बँकिंग कायद्यात आणखी काय बदल?
नक्षलवादी चळवळीची सद्या:स्थिती काय?
ओदिशा, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र राज्यातील सीमाभाग नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे कायम दहशतीत असतो. परंतु पोलिसांच्या आक्रमक कारवाईमुळे ही चळवळ महाराष्ट्रातील गडचिरोली आणि छत्तीसगडमधील बस्तरमधील काही जिल्ह्यांत मर्यादित झाल्याचे चित्र आहे. मात्र, पोलिसांच्या आक्रमक अभियानामुळे नक्षल्यांची कोंडी झाली आहे. काही महत्त्वाचे नेते ठार झाले आहेत. तर उर्वरित नक्षल्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाडमध्ये लपून बसले आहे. त्यामुळे प्रभावित भागातील नागरिकांमधून मिळणारे समर्थनही कमी झाले आहे. परिणामी नक्षल नेते तेलंगणाकडे वळल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारची भूमिका काय?
सत्तापरिवर्तनानंतर छत्तीसगडसह गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे. नक्षलप्रभावित क्षेत्रात केंद्राने तैनात केलेल्या विविध सुरक्षा दलांत वाढ करण्यात आली आहे. स्थानिक आदिवासी युवकांना पोलीस दलात सामील करून त्यांच्या संपर्काचा वापर केला जात आहे. अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील भागात पोलीस मदत केंद्रांची संख्या वाढविण्यात येत आहे. आधुनिक शस्त्रास्त्र, तंत्रज्ञानाचा वापर यामुळे नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आलेले आहे. केंद्राची कडक भूमिका याला कारणीभूत आहे. ‘सोशल पोलिसिंग’च्या माध्यमातून जनतेमध्ये पोलिसांबद्दल विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न होतो आहे. यासाठी राज्यासह केंद्राने अतिरिक्त निधीची तरतूद केली आहे. २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करू, या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या घोषणेमुळे नक्षलवाद्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
sumit.pakalwar@expressindia.com