जयेश सामंत
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याप्रमाणेच ठाण्यातील शिवसेना दुभंगली. ठाण्यात शिंदे आणि ठाकरे असा राजकीय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत असला तरी गेल्या काही दिवसांपासून त्यास शिंदे-ठाकरे आणि आव्हाड असे तिहेरी स्वरूप येताना दिसत आहे. शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यात उद्धव सेनेचा चेहरा कोण, या प्रश्नाचे उत्तर खासदार राजन विचारे यांच्या रूपाने काही प्रमाणात ‘मातोश्री’ला गवसले असले तरी ठाकरे-शिंदे लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावत उडी घेतल्याने राजकीय वातावरण भलतेच तापले आहे.
शिंदे-आव्हाड समन्वयाच्या राजकारणाला तडा कोणामुळे?
ठाणे शहर हे राजकीय समन्वयाच्या आणि त्यातून केल्या जाणाऱ्या हातमिळवणीच्या राजकारणासाठी प्रसिद्ध होते. या शहरात सत्ता कुणाचाही असो, बिल्डर, ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी आणि ठराविक नेत्यांची राजकीय युती नेहमीच चर्चेत राहिली आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्येही समन्वयाचे राजकारण अनेकदा पाहायला मिळाले. ठाण्यातील तीन विधानसभा मतदारसंघांवर नेहमीच शिवसेना आणि भाजपचा वरचष्मा पाहायला मिळाला. मात्र, कळवा-मुंब्रा मतदारसंघ आव्हाडांच्या रूपाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला. आव्हाडांचा वरचष्मा केवळ मुंब्य्रापुरता मर्यादित राहिलेला नाही.
हिंदूबहुल आणि त्यातही आगरी समाजाचा मोठा भरणा असलेल्या कळव्यातही आव्हाडांनी मोठे मताधिक्य घेतल्याचे पाहायला मिळते. शिवसेनेची मोठी ताकद असूनही आव्हाडांनी कळव्यात निर्माण केलेला दबदबा अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला. एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील समन्वयाच्या राजकारणाचा हा परिणाम नाही ना, अशीही चर्चा दबक्या आवाजात होत असे. मात्र, जसजसा खासदार श्रीकांत शिंदे यांचा राजकीय पटलावर प्रभाव वाढत गेला, तसतसा आव्हाड-शिंदेंच्या समन्वयाच्या राजकारणाला तडा गेल्याचे दिसते. आव्हाड आणि खासदार शिंदे यांच्यात तर विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. त्यातून हा संघर्ष वाढताना दिसतो.
विश्लेषण: कल्याण ते नवी मुंबई १५ मिनिटांत? ऐरोली-काटई मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा कसा?
आधी अलिप्त राहिलेले आव्हाड ठाकरेंबरोबर कसे?
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. सुरुवातीच्या काळात शिंदे आणि ठाकरे यांच्यात मोठा संघर्ष होत असताना ठाणे महापालिका क्षेत्रात प्रभाव राखणारे जितेंद्र आव्हाड मात्र काहीसे अलिप्तपणे वावरताना दिसत होते. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे जवळपास ४२ प्रभाग आहेत. त्यातील बहुतांश आव्हाड यांना मानणाऱ्या नगरसेवकांचे आहेत. सुरुवातीला शिंदे-ठाकरे संघर्षापासून आव्हाड आणि त्यांचे समर्थक दूर राहिले. मात्र, आव्हाड यांनी एका चित्रपटाचा खेळ बंद पाडला, पुढे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि शिंदे-आव्हाड यांचे संबंध बिघडले.
मुंब्य्रातील एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने आव्हाड यांच्यावर थेट विनयभंगाची तक्रार दाखल गेली. ही तक्रार दाखल करण्यापूर्वी ही महिला शिंदे यांच्या निकटवर्तीयांबरोबर मुंब्य्रात एका कार्यक्रमात वावरताना दिसली. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील एका दबंग अधिकाऱ्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याची कुणकुण आव्हाडांना लागली. या प्रकरणी आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच ठाण्याच्या राजकारणातील शिंदे-आव्हाड हे मैत्रीपर्व पूर्णपणे संपु्ष्टात आल्याचे मानले जाते. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांना मुख्यमंत्र्यांविरोधात एकत्र करण्यात आणि त्यांच्यावर भूखंड घोटाळ्यांचे आरोप करण्यात आव्हाड अग्रभागी राहिले. त्यामुळे सुरुवातीला अलिप्त राहणारे आव्हाड आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मानसपुत्र अशी ओळख मिरवणारे आव्हाड ‘मातोश्री’चे ठाण्यातील रणनीतीकार म्हणून अगदी उघडपणे वावरताना दिसत आहेत.
मुख्यमंत्र्यांची ‘कळवा-मुंब्रा मोहीम’ कशासाठी?
गेल्या तीन-चार महिन्यांतील या घडामोडींमुळे राज्यभर दौऱ्यांचा सपाटा लावणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी ठाण्यात आणि विशेषत: कळवा-मुंब्य्रात आव्हाडांना नामोहरम करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुंब्य्राच्या मैदानात गेल्या १५ वर्षांत विरोधकांना आव्हाडांसाठी पर्याय सापडलेला नाही. हिंदूबहुल कळव्यातही आव्हाडांची ताकद वाढते आहे. हे लक्षात घेऊन खासदार शिंदे आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी थेट मुंब्य्रातच आव्हाडांना शह देण्याची रणनीती आखली आहे.
विश्लेषण : विधान परिषदेच्या जागा किती काळ रिक्त राहणार?
या भागातील आव्हाडांचे एकेकाळचे कट्टर विरोधक राजन किणे यांना हाताशी धरत राष्ट्रवादीत मोठी फूट पाडण्याचे डावपेच आखले जात आहेत. ठाण्यातील लोकमान्यनगरातील हणमंत जगदाळे यांच्यासारखा पवारनिष्ठ मोहरा यापूर्वीच शिंदे यांच्या गळाला लागला आहे. राबोडीतील नजीब मुल्ला यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागले असून, मुख्यमंत्र्यांच्या शब्दाबाहेर जाण्याची त्यांचीही टाप नाही. जगदाळे, मुल्ला, किणे अशी मोट बांधत आव्हाडांना धक्का देण्याची संपूर्ण तयारी केली जात आहे. या हालचाली ओळखून मग आव्हाडांनीही कळव्यात फुटू पाहणाऱ्या नगरसेवकांविरोधात आतापासून ‘खोके-बोके’ असा प्रचार सुरु केला आहे. शिंदे गटाने पडद्याआडून या प्रचाराला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.