सध्या भारताच्या अर्थकारणात तसेच राजकारणात दोन हजारांची नोट चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाची तुलना इतिहासातील मोहम्मद तुघलक याच्याशी केली. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर पुढील ट्विट नमूद केले आहे. ”टॅक्स आणि चलनी नोटांचे प्रयोग यथेच्छ झाले आहेत. साहेबांनी दिल्लीतली राजधानी दौलताबादला हलवून टाकावी, म्हणजे इतिहासाची कम्प्लिट पुनरावृत्ती होवून जाईल …#मोहंमद _तुघलक.” याच पार्श्वभूमीवर मोहम्मद तुघलक नक्की कोण होता ? त्याने कोणत्या प्रकारचे प्रयोग चलनी नाण्यांवर केले आणि राजधानी दौलताबादला का स्थलांतरित केली हे जाणून घेणे रंजक ठरावे.
मध्ययुगीन भारताचा इतिहास हा इस्लामिक काळ म्हणून ओळखला जातो. १२ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून मुस्लिम साम्राज्यांनी भारतीय उपखंडावर वर्चस्व गाजवले. यात प्रामुख्याने दिल्ली सुलतान आणि मुघल साम्राज्य यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. बहुतांश दक्षिण आशियावर इसवी सनाच्या १४ व्या शतकापासून ते १८ व्या शतकापर्यंत बहामनी, बंगाल, गुजरात, माळवा, म्हैसूर, कर्नाटक आणि दख्खन सुलतानांनी राज्य केले होते. मोहम्मद बिन तुघलक हा मध्ययुगीन भारतातील दिल्ली सुलतानांपैकी एक होता. मोहम्मद बिन तुघलकाने भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील भागांवर तसेच दख्खनवर इसवी सन १३२४ ते १३५१ या कालावधीत राज्य केले. मोहम्मद बिन तुघलक हा भारताच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त शासकांपैकी एक मानला जातो. सर्वसमावेशक वाङ् मय, तत्त्वज्ञान, विविध धार्मिक ज्ञान यांचे शिक्षण घेतलेला तो प्रारंभिक कालातील दिल्लीचा एकमेव सुलतान होता. परंतु तितकाच तो क्रूर असल्याचेही काही अभ्यासक नोंदवितात. त्याच्या कारकिर्दीत त्याने काही प्रशासकीय सुधारणा केल्या, परंतु बहुतांश योजना निर्णयक्षमतेच्या अभावामुळे अयशस्वी झाल्याचेच चित्र आहे. म्हणूनच त्याची भारतीय इतिहासात ‘शहाणा मूर्ख’ अशी ख्याती होती.
आणखी वाचा : विश्लेषण: चीनच्या कावेबाजपणाला भारतीय मुत्सद्देगिरीचे उत्तर !
मोहम्मद तुघलकाला का म्हटले जाते ‘शहाणा मूर्ख’ किंवा ‘लहरी’ ?
प्रजेवर लादलेला कर
मोहम्मद बिन तुघलक हा राज्यावर येताच त्याला राज्यविस्तार करावयाचा होता. त्याच काळात दिल्लीवर होणाऱ्या मुघलांच्या स्वाऱ्यांनाही त्याला तोंड दयावे लागत होते. यामुळेच त्याने आपल्या पदरी प्रचंड सैन्य ठेवले होते. दिल्लीवर झालेल्या मुघलांच्या चढाईत मुघलांशी वाटाघाटी करून त्यांना खंडणी देवून त्याने परत पाठविले. आणि खुसरौ मलिकच्या नेतृत्वाखाली चीनवर स्वारीकरिता त्याने सैन्य पाठविले. भौगोलिक ज्ञान नसलेले सैनिक हिमालयाच्या खिंडीत नाहीसे झाले. या मोहिमांसाठी झालेला अमाप खर्च भरून काढण्यासाठी त्याने प्रजेवर कर बसविले. अत्याधिक कराच्या ओझ्यामुळे प्रजा बेजार झाली होती. शेतकऱ्यांनी कर भरण्यासाठी इतर ठिकाणी नोकऱ्या करण्यास सुरवात केली. त्यामुळे शेतीचे उत्पादन घटले. अन्नटंचाई निर्माण झाली . शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी बंड केल्याचे दाखले उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर अपयश आणि आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी गंगा आणि यमुनेच्या गाळाच्या जमिनींवरील कर त्याने वाढविले होते. करांच्या जास्त ओझ्यामुळे, लोकांनी आपला शेतीचा व्यवसाय सोडला आणि दरोडे आणि चोरीच्या प्रकरणांमध्ये गुंतले. याच काळात दुष्काळलादेखील सामोरे जावे लागले. त्याने त्यासाठी दुष्काळी परिस्थिती सुधारण्यासाठी अमाप खर्च केला परंतु, वेळ निघून गेली होती. त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे प्रजेत ‘वेडा मोहम्मद’ ही त्याची प्रतिमा अधिकच दृढ झाली होती.
राजधानी दिल्लीवरून दौलताबाद
संपूर्ण भारतीय उपखंडावर राज्य करण्याच्या इच्छेने मोहम्मद बिन तुघलक याने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे स्थलांतरीत केली. त्याकरिता त्याने आपल्या राज्यातील विद्वान, कवी, संगीतकारांसह राजघराण्याला तसेच दिल्लीतील संपूर्ण लोकसंख्येला नवीन राजधानीत म्हणजेच दौलताबाद येथेच स्थलांतर करण्याचा आदेश दिला. या स्थलांतरादरम्यान, अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्याच्या प्रजेचा सर्व लवाजमा दौलताबादला पोहोचेपर्यंत मोहम्मद बिन तुघलक याने आपला विचार बदलला आणि नवीन राजधानी सोडून आपल्या जुन्या राजधानीत दिल्लीत परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकांचे अतोनात हाल झाले. मंगोल आक्रमणापासून बचावाचा उपाय म्हणून राजधानी स्थलांतरित करण्याचा निर्णय त्याने घेतला होता, असेही काही अभ्यासक मानतात.
आणखी वाचा : विश्लेषण : ‘हनी ट्रॅप’ का ठरत आहे भारतीय संरक्षण यंत्रणेसाठी डोकेदुखी ?
मोहम्मद तुघलकाने सुरु केलेले टोकन चलन
कराचे उत्पन्न पुरेसे नव्हते म्हणून मोहम्मद तुघलक याने टोकन चलन पद्धत सुरू केली. १४ व्या शतकात जगभरात चांदीची कमतरता होती. टोकन चलन पद्धतीत तांब्या-पितळेची बनावट नाणी, चांदी-सोन्याच्या भावाने वापरात काढली व सरकारी खजिन्यात त्याच भावाने परत घेतली जातील, असे फर्मान काढले. त्यानंतर त्याने तांब्या-पितळेची नाणी काढून घेतली आणि शाही खजिन्यातून तांब्या-पितळेच्या नाण्यांची सोन्या-चांदीच्या नाण्यांशी अदलाबदल करण्याचा आदेश दिला. यामुळे त्याच्या राज्याच्या आर्थिक रचनेचा पाया ढासळला. लवकरच लोकांना तांब्या-पितळेची नाणी आणि चांदीची नाणी यात फरक जाणवू लागला. सुलतानाचा संपूर्ण चांदी आपल्या खजिन्यात ठेवण्याचा हेतू आहे, हा संशय येवून लोकांनी सोन्या-चांदीच्या नाण्यांचा साठा करून ठेवला आणि त्यामुळे बाजारात केवळ तांब्या-पितळेचीच नाणी शिल्लक राहिली. बनावट नाण्यांची संख्या शाही टांकसाळीतून जारी करण्यात आलेल्या मूळ नाण्यांपेक्षाही जास्त होती.
सुलतान मोहम्मद-बिन-तुघलकने त्याच्या राज्यारोहणाच्या तारखेपासूनच बक्षिसे, अनुदान, दान आणि भेटवस्तू देण्यासाठी भरपूर पैसा खर्च केला. याशिवाय, त्याने काही महत्त्वपूर्ण योजना आखल्या आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी मोठी रक्कम खर्च केली. बंडखोरांना दडपण्यासाठी, लष्करी मोहिमा चालवण्यात आणि दुष्काळ आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी त्याने आपली तिजोरी रिकामी केली. यामुळे चलनाचे अवमूल्यन झाले आणि त्याचा व्यापारावर विपरीत परिणाम झाला. म्हणूनच ‘टोकन चलना’ सारख्या योजना राबवणे त्याला भाग पडले असे अभ्यासक मानतात.