नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २९२ जागा मिळाल्या. विरोधकांच्या इंडिया आघाडीला २३४ जागा जिंकता आल्या. काँग्रेस पक्ष या आघाडीत केंद्रस्थानी आहे. त्यामुळे लोकसभेच्या एकूण ५४३ पैकी ५२६जागा या दोन आघाड्यांमध्ये विभागल्या गेल्या. केवळ १७ जागा इतरांना मिळाल्या. त्यातही सात अपक्ष आहेत. इतरांना फक्त दहा जागी यश मिळाले. त्यात जगनमोहन यांच्या पक्षाचे चौघे आहेत.

पश्चिम बंगालचा अपवाद

देशात दोन आघाड्यांभोवती राजकारण केंद्रित झाले. भाजप व काँग्रेस हे दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष या आघाड्यांचे केंद्रस्थान आहेत. या दोन आघाड्यांव्यतिरिक्त लढणाऱ्या पक्षांचा दारुण पराभव झाला. अर्थात पश्चिम बंगालचा यात थोडा अपवाद करावा लागेल. तेथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवत राज्यातील ४२ पैकी २९ जागी यश मिळवले. काँग्रेस तसेच डावे पक्ष यांची तेथे आघाडी होते. त्यात बरोबर ममतांचा पक्ष इंडिया आघाडीचा घटकही आहे. या निवडणुकीत ममतांचा व्यक्तिगत करिश्मा बंगालमध्ये दिसून आला. हे राज्य वगळता या लोकसभा निवडणुकीनंतर स्वतंत्रपणे लढणाऱ्या पक्षांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एका निवडणुकीने जरी कोणताही पक्ष संपत नसला, तरी निकालाने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची होते. यातून पक्ष उभारणीला वेळ लागतो. 

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
2024 lok sabha speaker
लोकसभेच्या अध्यक्षपदावरून ‘एनडीए’त मतभेद? कोण होणार लोकसभेचे नवीन अध्यक्ष?
loksatta editorial on ekanth shinde and ajit camps disappointment over the allocation of cabinet berths
अग्रलेख : उपयोगशून्यांची उपेक्षा!
sanjay raut on obc maratha reservation issue
राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणावरून संघर्ष, संजय राऊतांनी स्पष्ट केली ठाकरे गटाची भूमिका; म्हणाले…
financial crisis in maharashtra mega projects shifted to gujarat from Maharashtra
महाराष्ट्राचा मिंधेपणा आता तरी मावळेल?

हेही वाचा >>>पंतप्रधान मोदींनी काश्मीरला योग आणि ध्यानाची प्राचीन भूमी असे का म्हटले आहे? काश्मीरचा आणि योग तत्त्वज्ञानाचा नेमका संबंध काय?

थेट सामना

मतदारांमध्ये मोदी सरकारच्या बाजूने किंवा विरोधात अशा दोन गट पडले. यावेळी त्यात तिसऱ्या पर्यायाचा फारसा विचार झाला नाही. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष, तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक, ओडिशात बिजू जनता दल, पंजाबमध्ये अकाली दल, आंध्र प्रदेशात जगनमोहन यांचा वायएसआरसीपी पक्ष तसेच तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट समिती अशा दोन्ही आघाड्यांपासून अंतर ठेऊन लढणाऱ्या पक्षांना मतदारांनी नाकारले. एके काळी उत्तर प्रदेशात राज्य केलेल्या बहुजन समाज पक्षाला तेथे जेमतेम दोन आकडी मतांची टक्केवारी गाठता आली. तसेच राज्यातील ८० पैकी एकाही ठिकाणी त्यांना दुसरा क्रमांक मिळवता आला नाही. त्यांची पारंपरिक मतपेढी काँग्रेस-समाजवादी पक्षाच्या आघाडीकडे वळाली. स्वतंत्रपणे लढणाऱ्या बसपच्या हाती फारसे काही लागले नाही. गेल्या वेळी त्यांचे दहा खासदार होते. यंदा बसपला उत्तर प्रदेशसह देशभरात एकही जागा जिंकला आली नाही.

जुन्या प्रादेशिक पक्षांची कोंडी

देशात भाजप तसेच काँग्रेसला पर्याय म्हणून तिसरा आघाडीचा प्रयोग अनेक वेळा झाला. केंद्रातही त्यांची अल्पकालीन सरकार होते. मात्र यंदा जुन्या प्रादेशिक पक्षांना स्वतंत्रपणे निवडणुकीत जाणे कठीण झाले. तमिळनाडूचा विचार केला तर, अण्णा द्रमुक भाजपच्या आघाडीतून बाहेर पडत स्वतंत्र लढला. मात्र या पक्षाकडे जयललिता यांच्या पश्चात वलयांकित नेतृत्वाचा अभाव तसेच गटबाजीमुळे  राज्यात एकही जागा जिंकता आली नाही. इतकेच नव्हे राज्यातील ३९ पैकी ७ ठिकाणी अनामत रक्कम गमवावी लागली. या निकालाचा परिणाम असा झाला की, पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीवर या पक्षाला बहिष्कार टाकावा लागला. कारण आणखी एक पराभव होणे हे कार्यकर्त्यांना पचवणे कठीण आहे. राज्यात दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ द्रमुकला तोंड द्यायचे असेल तर वेगळी रणनीती आखावी लागेल. त्यामुळे आता त्यांची पुन्हा भाजपशी आघाडी होणार काय, हा मुद्दा आहे.

हेही वाचा >>>नेट परीक्षा नेमकी असते कशासाठी? काय विचारलं जातं आणि या परीक्षेला एवढी मागणी का? जाणून घ्या…

अकाली दल, बीआरएसला फटका

पंजाबमधील सर्वात जुन्या अशा अकाली दलाला हरसिमरत कौर यांची एकमेव जागा जिंकता आली. राज्यातील लोकसभेच्या १३ पैकी १० ठिकाणी त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. भाजप-अकाली दल यांची आघाडी असती तर चार ते पाच जागा जिंकणे शक्य होते असे लोकसभा निकालातील आकडेवारीवरून दिसते. या दोन पक्षांची पंचवीस वर्षे युती होती. मात्र तीन कृषी कायद्यांवरून वितुष्ट निर्माण होऊन दोन्ही पक्षांचे मार्ग वेगळे झाले. त्याचे अकाली दलाबरोबरच भाजपलाही नुकसान सहन करावे लागले. तेलंगणातही दहा वर्षे सत्तेत राहिलेल्या भारत राष्ट्र समितीला यंदा लोकसभेला भोपळाही फोडता आला नाही. राष्ट्रीय राजकारणात स्थान निर्माण करण्यासाठी पक्षाने तेलंगण राष्ट्र समितीवरून भारत राष्ट्र समिती असे नामकरण केले खरे. पण काँग्रेस-भाजपच्या थेट लढतीत राज्यातील लोकसभेच्या १७ जागांपैकी केवळ एका ठिकाणी त्यांचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. गेल्या वेळच्या ९ जागा भारत राष्ट्र समितीला गमवाव्या लागल्या. राज्यातील सत्ता गेल्या वर्षी गेल्यानंतर ९ पैकी ८ खासदारांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतरही केले होते. थोडक्यात कोणत्याही मोठ्या आघाडीशिवाय लढणे त्या पक्षाला कठीण गेले.

दोन पक्ष सत्तेतून पायउतार

राष्ट्रीय पातळीवर भाजप तसेच काँग्रेसपासून समान अंतरावर असलेला आंध्रमधील वायएसआर काँग्रेस हा जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष तसेच ओडिशातील बिजू जनता दलाला राज्यातील सत्ता गमवावी लागली. ओडिशामध्ये राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे १९९९ पासून २४ वर्षे नवीन पटनाईक यांच्याकडे मुख्यमंत्रीपद होते.  यंदा भाजपची ओडिशात स्वबळावर पहिल्यांदाच सत्ता आली. निवडणुकीपूर्वी भाजप तसेच बिजू जनता दल यांच्या आघाडीची चर्चा होती. मात्र भाजप स्वतंत्रपणे लढला. सत्ताविरोधी लाटेचा फटका बिजु जनता दलाला लोकसभेलाही बसला. राज्यातील २१ पैकी एकही जागा जिंकता आली नाही. आंध्र प्रदेशातही जगनमोहन रेड्डी हे तेलुगु देशम-जनसेना-भाजप यांच्या आघाडीकडून पराभूत झाले. निवडणुकीपूर्वी जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांच्या पुढाकाराने तेलुगु देशमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश झाला. राज्यातील सत्ताविरोधी नाराजीतून वायएसआर काँग्रेसचा पराभव झाला. अर्थात जगनमोहन यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत राज्यातील २५ पैकी चार जागा जिंकता आल्या हीच त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

मोठ्या पक्षांभोवती राजकारण केंद्रित?

देशातील दोन आघाड्यांचा विचार करता काँग्रेसच्या तुलनेत भाजप त्यांच्या गटात अधिक मजबूत स्थितीत आहे. भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत वीस ते बावीस पक्ष आहेत. त्यातील काही पक्षांचे खासदारही नाहीत. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीत तीसहून अधिक पक्ष आहेत. त्यामुळे यापुढील काळात एखाद्या पक्षाला या दोन आघाड्यांपासून स्वतंत्रपणे वाट चोखाळायची असेल तर संबंधित आपल्या राज्यात किमान तीस टक्क्यांवर मते घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जनमानसावर पकड असलेला नेता पक्षात हवा. बहुसंख्य प्रादेशिक पक्ष हे एक तर घराणेशाहीतील म्हणजे एका कुटुंबावर किंवा एका व्यक्तीवर अवलंबून असलेले दिसतात. प्रादेशिक पक्षांत पर्यायी नेतृत्व तयार झाले नाही किंवा होऊन दिले नाही. यातून निवडणुकीत फटका बसल्यावर मग अशा पक्षांना लवकर उभारी घेणे कठीण जाते. मग कुंपणावरील नेते-कार्यकर्ते संधी मिळेल त्या पक्षात जातात. त्यामुळे लोकसभेचे निकाल पाहता देशव्यापी तिसऱ्या आघाडीच्या पर्याय तूर्तास तरी कठीण दिसतो. नरेंद्र मोदींना पाठिंबा किंवा विरोध याच भोवती  राजकारण फिरत आहे. पुढील पाच वर्षांसाठी विरोधाचा आवाज वाढला असला, तरी मोदींना सत्तेत येण्यापासून त्यांना रोखता आले नाही. आता या दोन आघाड्यांपासून अंतर ठेवून राजकारण करणाऱ्यांना तर पुढील काळात टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे लोकसभा निकालावरून दिसते.

hrishikesh.deshpande@expressindia.com