रशिया-युक्रेन युद्धात जवळपास ५० हजार रशियन सैनिक मारले गेले असल्याची माहिती युद्धात मरण पावलेल्या पहिल्याच स्वतंत्र सांख्यिकीय विश्लेषणाच्या माध्यमातून समोर आली आहे. मीडियाझोन (Mediazona) आणि मेडुझा (Meduza) रशियातील या दोन स्वतंत्र माध्यमांनी जर्मनीच्या ट्यूबिंगन विद्यापीठातील डेटा शास्त्रज्ञ यांच्यासोबत एकत्र येऊन रशियन सरकारच्या डेटावर प्रकाश टाकला. युक्रेनवर आक्रमण करून रशियाने केवढी मानवी किंमत मोजली, ही माहिती या डेटामध्ये आहे.
सध्या मॉस्को किंवा किव्ह यांनी लष्करी नुकसानाची माहिती सार्वजनिक केलेली नाही. पलीकडच्या बाजूचे अधिक नुकसान झाले असल्याची बतावणी
दोन्ही बाजूंकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने त्यांच्या सहा हजार सैनिकांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले होते. रशिया-युक्रेन युद्धाची सुरुवात होऊन दीड वर्षांचा कालावधी झालेला आहे. अद्याप युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. युद्धामुळे दोन्ही देशांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये एवढा विध्वंस दिसलेला नाही.
अतिरिक्त मृत्यूची गणना
वरील संस्थांनी मिळून अहवालात जी आकडेवारी दिली आहे, ती मृत्यूच्या आकडेवारीवरून अंदाजित केलेली आहे. कोरोना महामारीनंतर मृत्यूचा आकडा काढण्यासाठी ही पद्धत लोकप्रिय झाली होती. दरवर्षी सरकारी यंत्रणेकडे अधिकृत वारसा नोंदी आणि मृत्यूच्या नोंदी केल्या जातात. संशोधकांनी या नोदींमधून फेब्रुवारी २०२२ आणि मे २०२३ या काळात ५० वर्षांहून कमी वय असलेल्या किती लोकांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी मिळवली.
हे वाचा >> विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्धाचे एक वर्ष! आतापर्यंतचा संघर्ष कसा होता? जाणून घ्या प्रत्येक माहिती
मीडियाझोन आणि मेडुझाच्या पत्रकारांनी रशियन यंत्रणेकडे दाखल झालेल्या वारसा प्रकरणांच्या नोंदी मिळवल्या. नॅशनल प्रोबेट रजिस्ट्रीमधून मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१४ ते २०२३ दरम्यान ११ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर लक्षात आले की, २०२२ मध्ये पुरुषांच्या १५ ते ४९ या वयोगटातील २५ हजार वारसा प्रकरणांची नोंदणी केलेली होती, तर २७ मे २०२३ पर्यंतची आकडेवारी पाहिली असता हीच प्रकरणे ४७ हजार असल्याचे लक्षात आले. म्हणजेच २०२२ पेक्षा २०२३ मधील आकडा वाढलेला दिसून आला.
जर्मनीच्या ट्यूबिंगन विद्यापीठातील डेटा शास्त्रज्ञ दिमित्री कोबाक यांनी समांतर आणि स्वतंत्र पद्धतीने याच विषयावर काम केले आहे. दिमित्री यांनी कोरोना महामारीत रशियात झालेल्या अतिरिक्त (अधिकृत जाहीर न केलेली आकडेवारी) मृत्यूच्या आकडेवारीचा अहवाल प्रकाशित केला होता. रशियाची अधिकृत सांख्यिकी यंत्रणा ‘रोसस्टॅट’ यांच्याकडून वर्ष २०२२ मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे वय आणि लिंगानुसारची आकडेवारी दिमित्री यांच्याकडे होती. वारसा नोंदणीशी या आकडेवारीचे विश्लेषण केले असता दिमित्री यांच्या लक्षात आले की, २०२२ मध्ये ५० हून कमी वय असलेल्या २४ हजार जणांचे मृत्यू अतिरिक्त दाखवत आहेत.
याशिवाय, स्वयंसेवकांची साखळी करून देशभरातील सोशल मीडियावर पोस्ट होणाऱ्या श्रद्धांजलीच्या पोस्ट, स्मशानभूमीत होणारे अंत्यसंस्कार यांची माहिती मिळवून युद्धात मरण पावलेल्यांचा आकडा निश्चित करण्यात आला. ७ जुलै रोजी निदर्शनास आले की, एकूण २७ हजार ४२३ रशियन सैनिकांचा या युद्धात मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा >> नेपाळी गोरखा वॅग्नर ग्रुपच्या खासगी सैन्यदलात भरती का होतायत? भारताच्या अग्निपथ योजनेशी त्याचा संबंध काय?
या आकडेवारीमध्ये समाविष्ट केलेल्या सैनिकांना नावानिशी ओळखले गेले आहे. तसेच त्यांच्या मृत्यूची विविध यंत्रणेच्या माध्यमातून पुष्टी करण्यात आली आहे, अशी माहिती मीडियाझोनचे संपादक दिमित्र यांनी दिली. मेडुझा यांच्यासोबत एकत्र येऊन आम्ही लपविल्या गेलेल्या मृत्यूची अंदाजित आकडेवारी समोर आणली आहे. रशियन सरकारला मृत्यूंचा काहीही फरक पडत नाही, त्यामुळेच त्यांनी हे लपविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
मृत्यूची आकडेवारी मिळवण्यास अडचण
युद्धामुळे अनेक विषयांवर संशयाचे धुके साचले असून मृत्यूचा आकडा हे त्यापैकीच एक कारण नाही. नेमक्या किती सैनिकांचा मृत्यू झाला ही माहिती लष्कराकडून मिळवणे कठीण आहे. त्यातच रोसग्वार्डिया (Rosgvardia), अखमत बटालियन अशा अनेक खासगी सैन्य तुकड्याही आहेत. आपल्या सर्वांना वॅग्नर खासगी सैन्य कंपनी माहीत आहे. मात्र, ती एकमात्र नाही अशी माहिती संपादक दिमित्री यांनी एपी या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. “तसेच वॅग्नर ग्रुपमध्ये भरती केलेल्या कैद्यांच्या मृत्यूची आकडेवारी मिळवणेही दुरापास्त आहे. हे सैनिक आता रशियन सैन्याचे भाग असणार आहेत. त्यांच्या मृत्यूची माहिती देत असताना बरेच फेरफार होण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा सांख्यिकीच्या माध्यमातून योग्य परिणाम मिळण्याची शक्यता आहे” असेही ते म्हणाले.
रशियातून बेपत्ता झालेले, मात्र अधिकृतरित्या मृत्यू झाला असे जाहीर न केलेले, तसेच डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या स्वयंघोषित देशाकडून लढणारे युक्रेनचे नागरिक यांच्याही मृत्यूच्या संख्येचा यात समावेश नाही. खरेतर मृत्यू झाल्यापेक्षा किती रशियन सैनिक बेपत्ता आहेत हे शोधणे जास्त कठीण आहे. “ही अनिश्चितता हजारोंच्या संख्येत आहे”, अशी प्रतिक्रिया सर्गेव शेरबोव्ह यांनी दिली. सांख्यिकीच्या माध्यमातून समोर आलेले आकडे नक्कीच प्रशंसनीय आहेत. सर्गेव शेरबोव्ह ऑस्ट्रियामधील ॲपालइड सिस्टिम्स ॲनालिसिस या संस्थेतील अभ्यासक आहेत.
सत्य बाहेर आणणे राष्ट्राविरोधातील अवहेलना
रशियामधील कार्यकर्ते आणि मुक्त पत्रकार म्हणतात की, रशियन माध्यमांनी लष्करी नुकसान किती झाले, याची माहिती बाहेर येऊ दिलेली नाही. मृतांच्या आकडेवारी प्रकाशित करण्याला अवहेलना मानण्यात येते आणि जे लोक असा प्रयत्न करतात, त्यांना छळवणूक आणि संभाव्य गुन्हेगारी आरोपांना सामोरे जावे लागते.
एप्रिल २०२१ मध्ये रशियन यंत्रणांनी मेडुझा माध्यम संस्थेला परदेशी हस्तक असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून त्यांच्या जाहिरातीच्या उत्पन्नावर गदा आणण्याचा प्रयत्न झाला. तसेच जानेवारी २०२३ मध्ये क्रेमलिनने मेडुझाला अनिष्ट संस्था असल्याचे सांगून त्यांच्यावर बंदी घातली. मॉस्कोने मीडियाझोन या माध्यम संस्थेलादेखील परदेशी हस्तक असल्याचे म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर मीडिया झोनच्या संकेतस्थळावर बंदी घालण्यात आली.
आणखी वाचा >> पुतिन यांना आव्हान देणाऱ्या येवजेनी प्रिगोझिन आणि वॅग्नरच्या योद्ध्यांचे पुढे काय होणार?
तथापि, काही विश्लेषकांचे मत आहे की, हे युद्ध जसे जसे पुढे सरकेल तसे तसे मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची आकडेवारी मिळवणे दुरापास्त होत जाणार आहे. “परंतु, एवढी प्रचंड हानी लपवणे कठीण होणार आहे. जखमी आणि जायबंदी झालेले सैनिक आपापल्या घरी परत येऊन जे युद्धात मृत्युमुखी पडले, त्यांच्या बद्दलची माहिती कुटुंबीयांना देत आहेत. तसेच युद्धाची दाहकता सर्वांसमोर आणत आहेत, अशी प्रतिक्रिया प्राध्यापक टिमोथी फ्रेय यांनी दिली. टिमोथी यांनी कोलंबिया विद्यापीठासाठी सोव्हिएत नंतरचे परराष्ट्र धोरण या विषयावर लिखाण केले आहे. “जेव्हा लोकांना कळेल की, युद्धामुळे कैक लोकांचा मृत्यू झाला, तसे युद्धाबद्दलचे समर्थन कमी कमी होत जाईल”, असेही ते म्हणाले.