पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीमध्ये नीरज चोप्राला अनपेक्षितरीत्या रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटरवर भाला फेकून दिमाखात सुवर्णपदक जिंकले. नीरजसकट इतर कोणालाही अंतिम फेरीत ९० मीटरच्या पलीकडे भाला फेकता आला नाही. विशेष म्हणजे अर्शदने आणखी एकदा त्याच फेरीत ९० मीटरचा पल्ला गाठून निर्विवाद वर्चस्व गाजवले. नीरजला क्वचितच ९० मीटरचा पल्ला गाठता येतो. त्यामुळे भविष्यात या दोघांमध्ये द्वंद्व होईल, तेव्हा नीरज चोप्रासमोर नेहमीच अर्शदचे खडतर आव्हान राहील.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अर्शदची बाजी

पाकिस्तानच्या अर्शद नदीमची दुसरी फेक ९२.९७ मीटरपर्यंत गेली आणि त्या क्षणापासून नीरज काहीसा विचलित झाल्यासारखा दिसला. जांंघेच्या दुखापतीतून तो पुरेसा सावरलेला नव्हता आणि अर्शदकडून अचानक मोठे आव्हान उभे ठाकले. नीरजने ८९.४५ मीटरवर भाला फेकला. यापेक्षाही अधिक चांगल्या कामगिरीची नीरजला अपेक्षा होती, पण ती होऊ शकली नाही. त्याचे इतर पाच प्रयत्न अवैध (फाऊल) ठरले. याउलट अर्शदने सहाव्या प्रयत्नातही ९१.७९ मीटरवर भाला फेकून दाखवला. नीरजची एकमेव फेक त्याच्या कारकीर्दीतली दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. दुर्दैवाने त्या रात्रीही ही त्या स्पर्धेतली दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आणि अर्शद सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

हे ही वाचा… मायक्रोवेव्ह म्हणजे बॅक्टेरियाचे घर? रक्तप्रवाहात शिरल्यास गंभीर आजारांचा धोका? आरोग्यासाठी किती घातक?

भालाफेकीत द. आशियाई वर्चस्व…

काही काळापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांचे द्वंद्व रंगलेला एकमेव ऑलिम्पिक खेळ हॉकीच असायचा. १९६०च्या दशकात भारताचे महान धावपटू मिल्खासिंग आणि पाकिस्तानचे धावपटू अब्दुल खलिक यांच्यातील ४०० मीटर शर्यतीचे द्वंद्व गाजले. पण ते कधी ऑलिम्पिकमध्ये आमने-सामने आले नाहीत. भालाफेकीत या दोन देशांच्या खेळाडूंमध्ये सुवर्णपदकासाठी चुरस होईल असे काही वर्षांपूर्वी कोणासही वाटले नसेल. या खेळात पूर्वी चेक प्रजासत्ताक, नॉर्वे, फिनलंड आणि जर्मनीसारख्या युरोपिय देशांचे वर्चस्व असे. २०२०मधील टोक्यो ऑलिम्पिकपासून हे चित्र बदलू लागले. त्या स्पर्धेत नीरज सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. अर्शद तेव्हा पाचवा आला होता. पण २०२३मध्ये झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज आणि अर्शद अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिले. टोक्यो २०२०मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकांवर चेक प्रजासत्तकाचे भालफेकपटू होते. पण या सगळ्यांसाठी नीरज आणि अर्शद यांना मागे टाकण्याचे आव्हान असेल. तशात या दोहोंमध्ये आता वारंवार द्वंद्व होणार असल्यामुळे त्या स्पर्धेत इतरांना टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागेल.

पॅरिसपूर्वी अर्शदपेक्षा नीरजच सरस

पॅरिस ऑलिम्पिकच्या निमित्ताने अर्शद नदीमने नीरज चोप्राला पहिल्यांदाच हरवले. यापूर्वी दोघांमध्ये झालेल्या द्वंद्वामध्ये नीरजच सरस ठरला होता. दोघे पॅरिसपूर्वी नऊ वेळा आमने-सामने आले आणि प्रत्येक वेळी नीरज जिंकला. यांतील आठ स्पर्धा सीनियर स्तरावर तर एक ज्युनियर स्तरावरील होती. गुवाहाटीमध्ये २०१६मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सर्वप्रथम दोघे आमने-सामने आले. त्यावेळी नीरज सुवर्णपदकाचा, तर अर्शद कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज पहिला आला, त्यावेळी अर्शद पाचव्या क्रमांकावर राहिला. पॅरिसपूर्वी दोघे बुडापेस्ट येथे जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत आमने-सामने आले, त्यावेळी नीरज पहिल्या आणि अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मात्र पॅरिसमध्ये प्रथमचअर्शद नीरजपेक्षा सरस राहिला.

हे ही वाचा… ४० वर्षे चालला एका आंब्याच्या मालकीवरून झालेला खून खटला; भारतीयांना आंब्याचे एवढे आकर्षण का?

मात्र ९० मीटरचा पल्ला अर्शदसाठी निर्णायक?

दोघांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास जाणवणारी बाब म्हणजे, नीरजने सुरुवातीपासूनच सातत्याने ८० ते ८५ मीटरचा पल्ला गाठला आणि यश मिळवले. याउलट अर्शदला ८० मीटरच्या पलीकडे फारसे जाताच येत नव्हते. ही परिस्थिती जाकार्ता आशियाई स्पर्धा २०१८ पासून बदलली. त्यावेळी प्रथमच अर्शदने ८० मीटरपल्याड भाला फेकून दाखवला. यानंतर मात्र अर्शदने आपला पल्ला वाढवत नेला, ज्याची फारशी गरज नीरजला पडली नाही. ८५ ते ९० मीटरमध्ये भाला फेकूनही नीरज अनेक स्पर्धा जिंकत होता. पॅरिसमध्ये सुरुवातीसच ९० मीटरपलीकडे भाला फेकून अर्शदने मोठीच मजल मारली. नीरजला त्याच्या कारकीर्दीत आजवर कधीही ९० मीटरपलीकडे भाला फेकता आलेला नाही. त्याची ८९.९४ मीटरची फेक भालाफेकीतील सर्वोत्तम फेकींमध्ये २५वी ठरते. याउलट अर्शदची ९२.९७ ही फेक ६व्या क्रमांकाची सर्वोत्तम फेक ठरते. त्याने आणखी एकदा त्याच स्पर्धेत ९० मीटरपलीकडे भाला फेकून दाखवला होता. अर्शद नदीम तंत्रापेक्षा ताकदीला प्राधान्य देतो, तर नीरजचा भर तंत्रावर अधिक असतो. नीरजच्याच म्हणण्यानुसार, ९० मीटरपलीकडे जाण्याविषयी त्याने गांभीर्याने विचार केला नाही. कारण तशी वेळच आली नाही. पण आता ही परिस्थिती बदलली आहे. कारण येथून पुढे आता नीरजला ९० मीटरपलीकडे भाला फेकण्यासाठी सराव आणि ताकद प्रशिक्षण करावे लागेल.