मंगळवारी (४ जून) एका बाजूला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच देशातील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या ‘नीट’ (NEET) या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकालही जाहीर झाला. मात्र, हा निकाल जाहीर होताच देशभरात वाद निर्माण झाला आहे. २०२३ मध्ये फक्त दोन विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळालेले होते. असे असताना यंदा त्यात अभूतपूर्व अशी भर पडून तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्यामुळे, ‘पात्रता गुणां’मध्ये (कट ऑफ) प्रचंड वाढ झाली आहे. ७०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला थेट दोन हजारांच्या जवळपास ‘रँक’ मिळणार आहे.

हेही वाचा : अग्रलेख: ‘नीट’ नेटके नाही…!

eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
all 1676 polling stations in Nashik and Malegaon have CCTV and live webcast
नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
Thane district, 578 children came under education stream, Survey of out of school children
ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात

तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणे ही बाब अशक्यप्राय वाटते. याहून अशक्यप्राय गोष्ट म्हणजे काही विद्यार्थ्यांना ७१८ अथवा ७१९ असे गुण मिळाले आहेत. मात्र, नीट परीक्षेतील गुणांची योजना पाहता अशा प्रकारचे गुण मिळणे हे निव्वळ अशक्य आहे. या गुणांमध्ये दिसत असलेली तफावत पाहता विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा घेणाऱ्या ‘एनटीए’वर शंका उपस्थित केली जात आहे. आतापर्यंत या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. पहिली याचिका या परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच म्हणजेच १ जून रोजी दाखल करण्यात आली होती. या परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच फुटली असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात याच प्रकारच्या एका याचिकेवर सुनावणी करताना निकाल जाहीर करण्यास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. जवळपास २.४ दशलक्ष विद्यार्थ्यांनी ५ मे रोजी देशभरातील ५७१ शहरांमध्ये ही प्रवेश परीक्षा दिली आहे. यातील १४ शहरे भारताबाहेरील होती. ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार, देशभरातील ७०० हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या एकूण १,०८,९४० जागा आहेत. NEET UG 2024 ची ही परीक्षा इतकी वादग्रस्त का ठरली आहे? परीक्षा घेणाऱ्या ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (एनटीए) गुरुवारी (५ जून) एक पत्रक जाहीर करून आपली भूमिका मांडली आहे.

तब्बल ६७ जणांना पैकीच्या पैकी

या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमधील ६७ जणांनी ७२० पैकी ७२० गुण प्राप्त केले आहेत. त्यामुळे त्यांना संपूर्ण भारतात पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. मात्र, याआधी असे कधीच घडले नव्हते. यापूर्वी २०१९ मध्ये एक, २०२० मध्ये एक, २०२१ मध्ये तीन, २०२२ मध्ये एक; तर गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये दोन विद्यार्थ्यांना पहिला क्रमांक मिळाला होता. सर्वाधिक गुण प्राप्त करून पहिला क्रमांक मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कधीही दहाच्या पुढे गेलेली नसताना ती यावर्षी अचानक ६७ वर जाणे शंकास्पद मानले जात आहे. ६ जून रोजी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, ६७ पैकी ४४ जणांचे भौतिकशास्त्रातील प्रश्नाचे उत्तर चुकीचे आले होते; तरीही NCERT च्या १२वीच्या पाठ्यपुस्तकाच्या जुन्या आवृत्तीत चूक झाली असल्यामुळे त्यांना वाढीव (ग्रेस) गुण देण्यात आले. मात्र, इथे पुन्हा एक गोंधळ निर्माण झाला आहे. एटीएने २९ मे रोजी तात्पुरती उत्तरपत्रिका (Provisional Answer Key) जाहीर केली होती; त्यामध्ये उपलब्ध चार पर्यायांपैकी एक बरोबर उत्तर निवडले होते. मात्र, पुस्तकामध्ये वेगळे उत्तर असल्याचे निदर्शनास आणून १३ हजारांहून अधिक उमेदवारांनी एनटीएने जाहीर केलेल्या उत्तर पत्रिकेलाही आव्हान दिले आहे.

एनटीएच्या एका अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये अशी एनटीएची इच्छा आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या नीट परीक्षेच्या तयारीसाठी फक्त ‘एनसीईआरटी’ पाठ्यपुस्तकांचाच वापर केला पाहिजे, अशी शिफारस आम्ही करतो. एनटीएने आपल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, २०२४ साली नीट परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची संख्या २०२३ च्या संख्येपेक्षा जवळपास तीन लाखांनी अधिक होती. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याच वाढल्यामुळे सहाजिकच परीक्षेमध्ये अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. तसेच एनटीएने असेही म्हटले आहे की, २०२४ ची नीटची परीक्षा ही याआधीच्या परीक्षेंच्या तुलनेत सोपी होती. त्यामुळे अशा प्रकारचे निकाल आपल्याला दिसत आहेत.

७१८ वा ७१९ गुण कसे काय पडले?

नीटची परीक्षा एकूण ७२० गुणांची असते. या परीक्षेला गुण मिळवण्याची योजना ही ‘नकारात्मक गुणवत्ता पद्धती’ची (Negative Marking Scheme) असते. म्हणजेच प्रत्येक बरोबर उत्तराला चार गुण मिळतात, तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी होतो. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने सगळे प्रश्न बरोबर सोडवले तर त्याला ७२० पैकी ७२० गुण पडू शकतात; मात्र, एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले असेल तर जास्तीतजास्त ७१६ गुण प्राप्त होऊ शकतात. पण, एखाद्याला ७१८ अथवा ७१९ गुण मिळणे निव्वळ अशक्य आहे. यावरही एनटीएने खुलासा केला आहे. आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये एनटीएने म्हटले आहे की, ‘एनसीईआरटी’ पाठ्यपुस्तकांमध्ये झालेले बदल आणि परीक्षा केंद्रांमध्ये गमावलेला वेळ यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले वाढीव (ग्रेस) गुण यामुळे विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले आहेत. थोडक्यात, परीक्षा घेणाऱ्या ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (एनटीए) परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार झाल्याचे नाकारले आहे.

बहादूरगढ (हरियाणा), दिल्ली आणि छत्तीसगडमधील काही केंद्रांमधील विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे की, त्यांना परीक्षेसाठीचा पूर्ण वेळ देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी पंजाब आणि हरियाणा, दिल्ली आणि छत्तीसगडच्या उच्च न्यायालयांमध्ये रिट याचिका दाखल केल्या आहेत. यावर एनटीएने असा खुलासा केला आहे की, विद्यार्थ्यांनी वेळेच्या अभावाबद्दल दाखल केलेल्या या तक्रारींमध्ये किती तथ्य आहे, हे तपासण्याचे काम तक्रार निवारण समिती करेल. त्यासाठी संबंधित परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेजचाही वापर केला जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांची तक्रार बरोबर असल्याचे आढळून आल्यास सर्वोच्च न्यायालयाने १३ जून २०१८ रोजी दिलेल्या निकालामध्ये घालून दिलेल्या सूत्रानुसार त्यांना गमावलेल्या वेळेच्या प्रमाणात योग्य गुण दिले जातील. या प्रसिद्धीपत्रकानुसार, “१,५६३ विद्यार्थ्यांना भरपाई देण्यात आली आहे. यापैकी दोन उमेदवारांचे गुणदेखील नुकसानभरपाईतून दिलेल्या गुणांमुळेच अनुक्रमे ७१८ आणि ७१९ असे पडले आहेत”, असा खुलासा एनटीएने केला आहे.

हेही वाचा : ‘नीट’ परीक्षा तात्काळ रद्द करा; विरोधकांच्या सुरात वैद्याकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सूर

पेपरफुटी आणि चुकीची प्रश्नपत्रिका

बिहारमधील पाटणामध्ये नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्याही तक्रारी करण्यात आल्या आहेत. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने सांगितले की, त्यांनी या प्रकरणामध्ये अटक केलेल्या संघटित टोळीच्या सदस्यांकडून परीक्षेची प्रवेशपत्रे, नंतरची तारीख असलेले धनादेश आणि काही प्रमाणपत्रे जप्त केली आहेत. मात्र, हे जमा केलेले पुरावे पेपरफुटीच्या आरोपांना प्रस्थापित करण्यासाठी पुरेसे नाहीत. मात्र, एनटीएने अशा प्रकारे कुठेही पेपरफुटीचे प्रकरण घडले नसल्याचे म्हटले आहे. मात्र, राजस्थानमधील सवाई मधोपूर परीक्षा केंद्रावर काही हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चुकून इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या, हे एनटीएने मान्य केले आहे. पुढे एनटीएने असेही म्हटले आहे की, सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास परीक्षेची प्रश्नपत्रिका इंटरनेटवर पोस्ट करण्यात आली होती. मात्र, सगळ्याच परीक्षा केंद्रांवर २ वाजता सुरू झालेली परीक्षा तोपर्यंत संपत आली होती.

वेळेपूर्वीच निकालाची घोषणा

या परीक्षेचा निकाल १४ जून रोजी लागणार असल्याचे कळवण्यात आले होते. मात्र, नियोजित दिवसाच्या दहा दिवस आधीच म्हणजेच ४ जून रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. याच दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकालही जाहीर झाला. संपूर्ण देशाचे लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे असताना नीट परीक्षेतील गोंधळाकडे कुणाचेही लक्ष जाणार नाही, असा उद्देश ठेवूनच या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांकडून केला जात आहे. मात्र, याबाबत एनटीएने असा खुलासा केला आहे की, उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर निकाल जाहीर केले जातात. नीट परीक्षेच्या प्रक्रियेनुसारच या परीक्षेचेही निकाल घोषित करण्यात आले आहेत.