‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानच्या महत्त्वाकांक्षी सौदी मेगासिटी प्रकल्प ‘निओम’वर एक अत्यंत टीकात्मक अहवाल प्रकाशित केला. “सौदी अरेबियाचा निओम प्रकल्प भ्रष्टाचार, कामगार मृत्यू, वर्णद्वेष यांत गुंतलेला आहे,” असे अहवालात सांगण्यात आले आहे. वाळवंटात शहर वसविण्याच्या कामाला २०१७ पासून सुरुवात झाली आहे. जगातील सर्वांत मोठा बांधकाम प्रकल्प ‘निओम’ नक्की काय आहे? हा प्रकल्प वादाच्या भोवर्‍यात अडकण्याचे कारण काय? या प्रकल्पाचे उद्दिष्ट काय? त्याविषयी जाणून घेऊ.

निओम प्रकल्प काय आहे?

‘निओम’ सौदी अरेबियाच्या महत्त्वाकांक्षी ‘व्हिजन २०३०’ प्रकल्पाचा एक भाग आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत विविधता आणण्याचे आणि देशाचे तेलावरील अवलंबित्व कमी करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिमेकडील ताबुक प्रांतामध्ये २६,५०० चौरस किलोमीटर क्षेत्रात ‘निओम’ हा शहर प्रकल्प वसविण्यात येत आहे. २०१७ मध्ये क्राउन प्रिन्स यांनी पहिल्यांदा शहराच्या नावाची घोषणा केली. त्याचे नाव ग्रीक शब्द ‘नियो’ म्हणजे ‘नवीन’ आणि अरबी शब्द ‘मुस्तकबाल’ म्हणजे ‘भविष्य’ यांना मिळून तयार करण्यात आले आहे. सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च ५०० अब्ज डॉलर्स असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार एप्रिल २०२४ पर्यंत या प्रकल्पावर १.५ ट्रिलियन डॉलर्सचा खर्च झाला आहे. हा प्रकल्प २०३९ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. निओममध्ये पाच प्रदेशांचा समावेश असेल. प्रत्येक घराची डिझाइनदेखील वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे.

‘निओम’ सौदी अरेबियाच्या महत्त्वाकांक्षी ‘व्हिजन २०३०’ प्रकल्पाचा एक भाग आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : उत्तर कोरियाच्या विष्ठा आणि कचरायुक्त फुग्यांच्या कुरापतींमुळे दक्षिण कोरियातील विमान वाहतूक विस्कळित; कारण काय?

द लाइन – प्रकल्पातील द लाइन हा टप्पा सर्वांत महत्त्वाचा आहे. द लाइन हा कारमुक्त म्हणजेच एकही चारचाकी वाहन नसलेला भाग असेल. त्याला ‘मिरर्ड सिटी लाईन’ असे नाव देण्यात आले आहे. या भागाची रुंदी ३४ चौरस किलोमीटर आणि लांबी १७० किलोमीटर असेल. शहराच्या मूळ योजनांमध्ये ५०० मीटर उंच आणि २०० मीटर रुंद इमारती असतील. हा प्रदेश ९५ टक्के अक्षय्य ऊर्जेवर चालेल.

ऑक्सॅगॉन – ऑक्सॅगॉन हे एक अष्टकोनी आकाराचे औद्योगिक शहर आहे; ज्यामध्ये औद्योगिक बंदर आणि निवासी अपार्टमेंट्स असतील. ऑक्सॅगॉनदेखील पूर्णपणे अक्षय्य ऊर्जेद्वारे चालेल.

ट्रोजेना – ट्रोजेना २०२९ मध्ये आशियाई हिवाळी खेळांचे आयोजन करणार आहे. या पर्वतरांगा सौदी अरेबियातील सर्वांत उंच पर्वतरांगा आहेत. या प्रदेशात स्की रिसॉर्ट असेल. निओम वेबसाइटनुसार, ट्रोजेनामध्ये हिवाळ्यातील तापमान शून्य सेल्सियस असते आणि वर्षभर या भागात मध्यम हवामान असते, जे उर्वरित प्रदेशापेक्षा थंड असते.

ट्रोजेना २०२९ मध्ये आशियाई हिवाळी खेळांचे आयोजन करणार आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

मॅग्ना – मॅग्ना हा प्रदेश लक्झरी जीवनशैली हव्या असणार्‍या लोकांसाठी तयार केला जात आहे. १२० किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या प्रदेशात १२ लक्झरी स्थळे असतील. पर्यटकांमध्येही या स्थळाविषयी आकर्षण निर्माण होईल. आपण निसर्गाच्या सान्निध्यात आहोत, अशीही अनुभूती लोकांना होईल. त्या दृष्टिकोनातून तसा परिसर या भागात तयार केला जाणार आहे.

सिंदलाह – सिंदलाह हे लाल समुद्रातील एक लक्झरी बेट आहे. हे कॅरेबियन समुद्रातील ग्रीक बेट आणि भूमध्य सागरी किनारपट्टीच्या बेटांना टक्कर देईल आणि यॉट व बोटमालकांच्या पसंतीचे ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या वर्षीच हे बेट सुरू होणार असल्याची माहिती आहे.

निओम प्रकल्प वादाच्या भोवर्‍यात

निओमच्या विकासात अनेक अडथळे आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक रहिवाशांचे विस्थापन : २०२० मध्ये ‘बीबीसी’ने वृत्त दिले होते की, सौदी सुरक्षा दले निओम प्रकल्पासाठी ताबुक प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या हुवैत जमातीने तेथून बाहेर पडावे यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करीत आहेत. सौदीचे माजी गुप्तचर अधिकारी कर्नल रबीह अलेनेझी यांनी मे २०२४ मध्ये ‘बीबीसी’ला सांगितले की, त्यांना ‘द लाइन’च्या दक्षिणेस ४.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अल-खुरायबाह येथून हुवैत गावकऱ्यांना हुसकावून लावण्याचे आदेश देण्यात आले होते. सौदी अधिकाऱ्यांनी त्यासाठी प्राणघातक शक्तीचा वापर करण्यास मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. २०२३ मध्ये सौदी सरकार दहशतवादी असल्याचा आरोप ‘यूएन’कडून करण्यात आला. सक्तीच्या निष्कासनाचा निषेध केल्याबद्दल सौदी सरकार हुवैतींना फाशी देत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर अनेक ठिकाणांहून सौदी सरकारवर टीका झाली.

२०१७ मध्ये क्राउन प्रिन्स यांनी पहिल्यांदा शहराच्या नावाची घोषणा केली. (छायाचित्र-रॉयटर्स)

प्रकल्पांची मंदावलेली प्रगती : ‘ब्लूमबर्ग’ने एप्रिल २०२४ मध्ये मत नोंदवले की, निओम प्रकल्प मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे. २०३० पर्यंत ‘द लाइन’मधील नऊ दशलक्ष रहिवाशांना सामावून घेण्याचे उद्दिष्ट असताना, अधिकाऱ्यांचा सध्या असा अंदाज आहे की, या प्रदेशात जास्तीत जास्त तीन लाख रहिवासी असतील. याव्यतिरिक्त, २०३० पर्यंत केवळ १.४ किलोमीटरचा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे ट्रोजेना येथे २०२९ मध्ये आशियाई हिवाळी खेळ आयोजित करण्याच्या ‘निओम’च्या तयारीविषयी चिंता वाढली आहे.

निओम येथील कर्मचार्‍यांची उदासीनता : सुरुवातीपासूनच मोहम्मद बिन सलमानने प्रकल्पाच्या मुख्य जबाबदार्‍या अशा अधिकाऱ्यांवर सोपवल्या आहेत, जे कोणत्याही प्रकारे काम करू शकतील. कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याचा विषय येतो, तेव्हा कामाच्या ठिकाणी मूलभूत नैतिकता उरत नाही. प्रकल्पात काम करणार्‍या काही कामगारांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे, ज्यांना काही काळासाठी नोकरीवर ठेवण्यात आले होते, त्यांना कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या गैरवर्तणूक किंवा गुन्ह्यांमुळे त्यांची पूर्वीची नोकरी सोडावी लागली आहे.

हेही वाचा : चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?

पाळत ठेवण्याबद्दल चिंता : २०२० च्या निओम प्रेस रिलीजमध्ये संज्ञानात्मक शहरे तयार करण्याचा हेतू जाहीर करण्यात आला होता. तेथील रीअल-टाइम माहितीचा अंदाज घेणे आणि तेथील रहिवाशांचे जीवन सोईस्कर करणे हा या प्रकल्पाचा हेतू असणार आहे, असे त्यात सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात याचा अर्थ इंटरनेट वापरावर सतत देखरेख ठेवणे, असा आहे. त्यामुळे एखाद्यावर पाळत ठेवणे सहज शक्य होईल, अशी भीती टीकाकारांनी व्यक्त केली आहे.