व्हेज म्हणू वा नॉनव्हेज, अर्थात शाकाहारी किंवा मांसाहारी… भारतीय खाद्यसंस्कृती मसाल्यांच्या वापराशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. भारत हा जगातील मसाल्यांच्या सर्वोच्च निर्यातदारांपैकी एक आहे. भारतात दरवर्षी २० दशलक्ष टनांहून अधिक मसाल्यांचे उत्पादन होते. जागतिक मसाल्यांच्या व्यापारात भारताचा ४०% पेक्षा जास्त वाटा आहे. स्पायसेस बोर्ड इंडियाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार २०२२-२०२३ या आर्थिक वर्षांत १४ लाख ४ हजार ३५७ टन मसाल्यांच्या उत्पादनांची निर्यात झाली. या उत्पादनांचे मूल्य रु.३१ हजार ७६१ कोटी होते. अलीकडेच भारतीय मसाल्याच्या काही ब्रॅण्डस् वर सिंगापूर फूड एजन्सी (SFA) ने आक्षेप घेतला होता. या मसाल्यात इथिलीन ऑक्साईड हे एक कीटकनाशक आढळून आल्याने या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली. तर भारत सरकारने या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सलंग्न अधिकाऱ्यांना या मसाल्यांचे नमुने गोळा करण्यास सांगितले होते. याशिवाय हल्लीच सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर, नेपाळने देखील कथित गुणवत्तेच्या चिंतेमुळे भारतीय ब्रँडद्वारे उत्पादित केलेल्या विशिष्ट मसाले-मिश्र उत्पादनांच्या विक्री आणि आयातीवर बंदी घातली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय उपखंडाला गेले हजारो वर्षांचा मसाले व्यापाराचा इतिहास आहे. किंबहुना आजच्याच दिवशी म्हणजे २० मे रोजी १४९८ साली वास्को द गामा व्यापाराच्या निमित्ताने भारतात आला. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय इतिहासातील मसाल्यांच्या व्यापाराविषयी जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.

अधिक वाचा: स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?

गरम मसाल्यांचा प्राचीन वापर

इतिहासात मानवाने उत्क्रांतीबरोबरच आपल्या खाद्य संस्कृतीत वेगवेगळ्या सुगंधी वनस्पतींचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे पुरातत्त्वीय अभ्यासक मान्य करतात. इतकेच नाही तर उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यात उपास्य देवतेला सुगंधी वनस्पती अर्पण करण्यात आल्या होत्या. आजारपणात याच वनस्पतींनी औषधांप्रमाणे काम केले. सुमारे इसवी सन पूर्व २००० वर्षांपूर्वी संपूर्ण मध्य पूर्व प्रांतात मसाल्याचा व्यापार विकसित झाला होता.

भारत आणि मसाल्यांचा व्यापार

भारतीय मसाल्यांच्या व्यापाराला हजारो वर्षांचा इतिहास आहे. वैदिक वाङ्मयात मसाल्यांचा प्राचीन संदर्भ सापडतो. यजुर्वेदात काळ्या मिरीचा स्पष्ट उल्लेख आला आहे. अगदी प्राचीन काळापासून भारतातून इतर देशांमध्ये मसाल्यांची निर्यात केली जात होती. भारत, चीन, इंडोनेशिया आणि श्रीलंका येथील मसाले पूर्वी गाढव आणि उंटांच्या मदतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जात होते. ग्रीस आणि रोम या व्यापारात उतरण्यापूर्वी अनेक शतके आधी भारतीय मसाले, सुगंधी तेले आणि कापड मेसोपोटेमिया, अरेबिया आणि इजिप्तमध्ये समुद्रमार्गे पोहचवले जात होते. त्याच आमिषाने अनेक खलाशांना भारताच्या किनाऱ्यावर आणले.

अधिक वाचा: कल्याणसुंदर: शिल्पांकनातील शिव-पार्वतीच्या विवाहाचा नेमका अन्वयार्थ काय?

प्राचीन काळातील भारतीय मसाला व्यापाराची कथा

भारतीय मसाल्यांच्या इतिहासाची पाळेमुळे अगदी इतिहासपूर्व कालखंडापर्यंत मागे जातात. जगाच्या इतिहासातील चार प्राचीन संस्कृतींपैकी एक संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती. मेसोपोटेमिया, इजिप्त या सिंधू संस्कृतीला समकालीन संस्कृती होत्या. भारतीय मसाल्यांचा प्राचीन वापर सुमारे ४००० हजार वर्षे जुन्या असणाऱ्या सिंधू संस्कृतीतही झाला होता. तसेच भारताने इजिप्त आणि मेसोपोटेमिया या प्राचीन संस्कृतींसोबत मसाल्यांचा व्यापारही केला होता. ऐतिहासिक कालखंडाच्या पूर्वार्धात ग्रीक-रोमबरोबर भारताचे व्यापारी संबंध भरभराटीस आले होते. हा व्यापार समुद्रामार्गे होत असे. ग्रीक- रोम जहाजे भारतीय बंदरांवर येत असल्याचे पुरातत्त्वीय तसेच ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. याच व्यापारामुळे अनेक नवीन व्यापारी मार्ग उघडकीस आले.

गरम मसाले आणि अरब व्यापारी

भारत आणि युरोपादरम्यान चालणाऱ्या मसाल्यांच्या व्यापारावर अरब व्यापाऱ्यांची मक्तेदारी होती. हा व्यापार आपल्याकडेच राहावा या हेतूने अरबांनी युरोपियांची दिशाभूल केली होती. भारतात गरम मसाले कोठून येतात हे सांगण्यासाठी अनेक रंजक कथांचा त्यांनी आधार घेतला. याच कथांचे संदर्भ रोमन साहित्यात सापडतात. त्यातीलच एक रंजक कथा दालचिनी नावाच्या पक्षाशी संबंधित आहे. या कथेनुसार दालचिनी नावाचा मोठा पक्षी होता. या पक्षाचे घरटे नाजूक दालचिनीच्या काड्यांपासून तयार केलेले होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हे व्यापारी या पक्षांना मांसाचे आमिष दाखवत आणि हे पक्षी हे मांसाचे तुकडे घेऊन आपल्या घरट्यात परतले की मांसाच्या तुकड्याच्या वजनामुळे घरटे कोसळत असे आणि व्यापाऱ्यांना दालचिनी मिळत असे. मूलतः अशा स्वरूपाचे पक्षी कधीच अस्तित्त्वात नव्हते. आपल्या स्पर्धकांना मसाल्यांच्या व्यापारापासून दूर ठेवण्यासाठी अशा रंजक कथा रचल्या गेल्याचे अभ्यासक मानतात. परंतु वास्को द गामा याच्या भारतातील आगमनाने अरब व्यापाऱ्यांची मसाल्यांच्या व्यापारावर असलेली मक्तेदारी संपुष्टात आणली.

वास्को द गामा

मध्ययुगीन कालखंडात मसाले हे युरोपातील अतिश्रीमंत उत्पादनांपैकी एक होते. काळी मिरी, दालचिनी, जिरे, जायफळ, आले आणि लवंगा इत्यादी अनेक मसाले आशिया आणि आफ्रिकेतून युरोपात निर्यात केले जात होते. युरोपियन लोकांनी भारताकडे येणारा सागरी मार्ग शोधून काढेपर्यंत या मसाल्यांच्या व्यापारावर अरबांचे वर्चस्व होते. फर्डिनांड मॅगेलन, वास्को दा गामा आणि ख्रिस्तोफर कोलंबस यांसारख्या दर्यावर्दींनी भारताचा शोध या मसाल्यांच्या व्यापारामुळे घेतला होता. १४९८ मध्ये पोर्तुगीज वास्को द गामा भारताच्या कोझिकोड येथे उतरला. आणि परतीच्या प्रवासात त्याने जायफळ, लवंगा, दालचिनी, आले, मिरपूड घेऊन गेला.

अधिक वाचा: विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?

युरोपमध्ये अधिक मागणी

मसाल्यांच्या पदार्थांना युरोपमध्ये अधिक मागणी होती. त्यामुळेच युरोपियन देशही या व्यापारात सक्रिय झाले. वास्को द गामाने भारताकडे जाणारा समुद्र मार्ग शोधून काढल्यानंतर पुढे शतकभर त्यांची या व्यापारावर सत्ता होती. नंतर इंग्रज आणि डचही या व्यापारात उतरले. सोळाव्या शतकाच्या अखेरीस मिरीच्या व्यापाराची मक्तेदारी डच लोकांकडे होती. अनेक युरोपियन देशांनी याच मसाल्याच्या व्यापारावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपन्या स्थापन केल्याचा इतिहास प्रसिद्ध आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepal outlaws the sale of indian spice blends due to worries about their quality history of indian spices and vasco da gama svs
Show comments