Nestle Cerelac Controversy बाळ गुटगुटीत व्हावे, त्याची भूक वाढावी म्हणून बाळाला देण्यात येणार्या पौष्टिक आहारात सेरेलॅकचा समावेश केला जातो. सेरेलॅक म्हणजे पोषक आहार, असा वर्षो न वर्षांपासून अनेकांचा समज आहे. परंतु, नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीने पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. लहान मुलांसाठी प्रोसेस्ड फूड तयार करणारी जगातील सर्वांत मोठी कंपनी नेस्ले ही बेबी फूड असणार्या सेरेलॅकमध्ये साखर मिसळत असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. अहवालानुसार, असे आढळून आलेय की, स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध कंपनी नेस्ले भारतासह इतर विकसनशील राष्ट्रांमध्ये विकल्या जाणार्या उत्पादनांमध्ये साखर मिसळत आहे. विकसित देशांमध्ये विकल्या जाणार्या उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण आढळून आलेले नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेत इतर राष्ट्रांच्या बाबतील कसा भेदभाव करतात, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
‘पब्लिक आय’ या स्वयंसेवी संस्थेने तपास करून आंतरराष्ट्रीय बेबी फूड ॲक्शन नेटवर्क (IBFAN) च्या सहकार्याने एक अहवाल प्रकाशित केला. हा अहवाल नेस्ले उत्पादनांवरील चाचण्यांवर आधारित होता. या चाचण्या बेल्जियमच्या प्रयोगशाळेत करण्यात आल्या. नेस्ले इंडियाच्या प्रवक्त्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, गेल्या पाच वर्षांत, कंपनीने भारतात बालकांसाठीच्या पूरक आहारातून साखरेचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.” अतिरिक्त साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे, नेस्ले इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. या अहवालात नक्की काय? अतिरिक्त साखरेचा लहान मुलांवर काय परिणाम होऊ शकतो? याबद्दल जाणून घेऊ या.
हेही वाचा : जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
अहवालात काय?
विकसनशील देशांमध्ये नेस्ले साखर असलेल्या उत्पादनांची विक्री करीत आहे. विशेष म्हणजे नेस्लेने उत्पादनांच्या पॅकेजिंगवरदेखील साखरेचे प्रमाण स्पष्ट केलेले नाही, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. “नेस्ले हा आघाडीचा बेबी फूड ब्रॅण्ड विकसनशील देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या सेरेलॅकसह इतर बेबी फूडमध्ये साखर मिसळत आहे. मात्र, नेस्लेचे मुख्यालय असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये आणि इतर विकसित देशांत अशी उत्पादने साखरेशिवाय विकली जातात,” असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
नेस्ले कंपनीद्वारे तयार करण्यात येणारी उत्पादने पालकांना वाटतात तितकी पौष्टिक नाहीत. या उत्पादनांचा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. ‘पब्लिक आय’च्या म्हणण्यानुसार, सध्या बेबी फूड मार्केटमधील २० टक्के भागावर नेस्लेचे नियंत्रण आहे; ज्याचे मूल्य जवळपास ७० अब्ज डॉलर इतके आहे. भारतात २०२२ मध्ये नेस्लेने उत्पादनांच्या विक्रीचा २५ कोटी डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. भारतात या उत्पादनांची मागणी जास्त आहे.
नेस्लेचा दुटप्पीपणा
नेस्ले आपल्या उत्पादन विक्रीमध्ये दुटप्पीपणा करताना दिसत आहे. “उदाहरणार्थ- स्वित्झर्लंडमध्ये नेस्ले सहा महिने वय असलेल्या मुलांपासून अगदी मोठ्या मुलांपर्यंत साखरविरहित बिस्किटांची विक्री करते; मात्र सेनेगल आणि दक्षिण आफ्रिकेत विकल्या जाणार्या त्याच बिस्किटांची जेव्हा चाचणी करण्यात आली, तेव्हा त्यात सहा ग्रॅम साखर असल्याचे आढळून आले,” असे अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे सहा महिन्यांच्या बाळांसाठी असणार्या ‘सेरेलॅक’मध्ये जर्मनी आणि युनायटेड किंग्डममध्ये साखरेचे प्रमाण शून्य आहे; परंतु इथिओपियामध्ये सेरेलॅकची चाचणी करण्यात आली असता, त्यात साखरेचे पाच ग्रॅम आणि थायलंडमध्ये सहा ग्रॅम इतके प्रमाण असल्याचे आढळून आले.
उत्पादनांमध्ये मिसळली जाणारी साखर घातक का?
काही खाद्यपदार्थांमध्ये नैसर्गिकरीत्या साखर असते. अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए)च्या मते, दुधात लॅक्टोज आणि फळांमध्ये फ्रुक्टोज स्वरूपात नैसर्गिकरीत्या साखर असते. दुधापासून तयार होणारे पदार्थ (जसे की, दही, दूध किंवा मलई) आणि फळांपासून तयार होणार्या पदार्थांमध्ये काही प्रमाणात नैसर्गिक साखर असते. मात्र, उत्पादनांमध्ये मिसळली जाणारी साखर ते पदार्थ तयार करताना किंवा त्यावर प्रक्रिया करताना टाकली जाते. त्यात “पांढरी साखर, तपकिरी साखर, मध तसेच रासायनिक पद्धतीने तयार करण्यात येणार्या इतर गोड पदार्थांचा समावेश असू शकतो. ‘पब्लिक आय’ने अहवाल दिला आहे की, नेस्ले कंपनी बेबी फूड उत्पादनांमध्ये साखर मिसळत असून, ती बाब जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात जात आहे.
साखरेमुळे होऊ शकतात गंभीर आजार?
निरोगी आरोग्यासाठी साखरेचे सेवन मर्यादित असणे आवश्यक आहे. बिस्कीट, चॉकलेट, प्रोसेस्ड फूडमध्ये साखर आढळून येते. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात साखरेच्या चवीशी संपर्क आल्यास त्याची सवय लागू शकते. साखरेच्या जास्त सेवनाने मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयाशी संबंधित रोग होण्याचा धोका वाढतो. ब्राझीलमधील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ पॅराबाच्या पोषण विभागातील प्रोफेसर रॉड्रिगो व्हियाना यांनी ‘पब्लिक आय’ला सांगितले, “बाळांना आणि लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये साखर घालू नये. कारण- त्यांना याची सवय लागू शकते. मुलांना गोड चवीची सवय होते आणि ते अधिक साखरयुक्त पदार्थांचे सेवन करू लागतात. त्याचा दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊन, त्यांना अनेक विकार होऊ शकतात, त्यांचे दात किडू शकतात.”
चिंतेमध्ये भर घालणारी गोष्ट म्हणजे विकसनशील देशांमध्ये सेरेलॅकसारख्या उत्पादनांची मागणी जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ च्या अहवालात असे म्हटले आहे, “साखर हा तुलनेने स्वस्त आणि मुबलक घटक आहे. परंतु, साखर प्रत्येक उत्पादनात वापरणे आवश्यक नाही.” अन्नपदार्थामध्ये साखर वापरल्यास ते अधिक चविष्ट होतात. त्यामुळे असे पदार्थ ग्राहकांद्वारे वारंवार खरेदी केले जातात.
हेही वाचा : दुबईतील पूरस्थितीला कृत्रिम पाऊसच ठरला का कारणीभूत?
डिसेंबर २०२३ च्या युनिसेफच्या अभ्यासात असे आढळून आले की, आग्नेय आशियात लहान मुलांसाठी विकल्या जाणाऱ्या १६०० स्नॅक्स आणि प्रोसेस्ड फूडपैकी जवळपास अर्ध्या उत्पादनांमध्ये अतिरिक्त साखरेचा समावेश आहे. २०१९ मध्ये बेबी फूड्स संबंधित जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासातही आढळून आले आहे की, अनेक उत्पादनांमध्ये अतिरिक्त साखर असते. रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अॅण्ड चाइल्ड हेल्थच्या प्रोफेसर मेरी फ्युट्रेल यांनी बीबीसीला सांगितले, “गोड चव बालकांना आवडते; परंतु त्याची सवय लागणे योग्य नाही. त्यांना इतर प्रकारच्या चवी आणि खाद्यपदार्थांची ओळख करून देणेही महत्त्वाचे असते.”