रेश्मा राईकवार
करोना काळातील परिस्थितीचा फायदा घेऊन घराघरात शिरलेल्या ओटीटी (ओव्हर द टॉप) नवमाध्यमांनी आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत फार मोठी आघाडी घेतली आहे. सध्या वैश्विक स्तरावर लोकप्रिय असलेल्या तीन ते चार प्रमुख ओटीटी कंपन्यांमध्ये या बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच अधिकच जोरदार झाली आहे. नेटफ्लिक्स हे या प्रमुख ओटीटी कंपन्यांमधील कायम महागडे नाव. नेटफ्लिक्सवरचा आशय पाहण्यासाठी आजही सगळ्यात अधिक पैसे मोजावे लागतात, त्यामुळे बाजारपेठेतील स्पर्धेत आशयाच्या बाबतीत सर्वगुणसंपन्न असलेली ही ओटीटी वाहिनी अजूनही प्रेक्षकसंख्या आणि उत्पन्नाच्या गुणाकारासाठी धडपडते आहे. या पार्श्वभूमीवर नुकताच नेटफ्लिक्सने आपला यावर्षीच्या पहिल्या तिमाहीचा आर्थिक अहवाल जाहीर केला आहे. पहिल्या तिमाहीत नेटफ्लिक्सच्या सशुल्क वापरकर्त्यांमध्ये विक्रमी वाढ झाल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. २०२४ च्या सुरुवातीलाच नेटफ्लिक्सच्या सशुल्क वापरकर्त्यांच्या संख्येने २५ कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा ९० लाख लोक नव्याने नेटफ्लिक्सशी जोडले गेले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सशुल्क वापरकर्त्यांवर मदार

ओटीटी वाहिन्यांचे उत्पन्न हे प्रामुख्याने सशुल्क वापरकर्त्यांवर अवलंबून आहे. नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम या दोन्ही ओटीटी कंपन्यांचा भर सशुल्क वापरकर्त्यांवर अधिक आहे. वेबमालिका वा चित्रपट पाहताना मध्येच खड्यासारख्या येणाऱ्या जाहिरातींची अडचण नेटफ्लिक्सवर नाही. मात्र नेटफ्लिक्सचे शुल्क अधिक असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक त्यांच्याकडे येत नव्हते. करोनानंतर नेटफ्लिक्सने फक्त मोबाइलवर पाहण्यासाठी, मोबाइल आणि टीव्ही असे एकाच वेळी दोन ठिकाणी पाहण्यासाठी वेगळे दर अशी वर्गवारी करत मासिक-वार्षिक शुल्कात सवलत देऊ केली. त्यामुळे हळूहळू त्यांच्या प्रेक्षकसंख्येत वाढ होत गेली. गेल्या वर्षी जगभरातील नेटफ्लिक्सच्या सशुल्क वापरकर्त्यांची संख्या २३ कोटी २० लाखांच्या आसपास होती. आता या संख्येत विक्रमी वाढ झाली असून हा आकडा २६ कोटी ९६ लाखांच्या आसपास पोहोचला असल्याचे नेटफ्लिक्सच्या आर्थिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिका आणि कॅनडा या दोन देशात सशुल्क वापरकर्त्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे. अमेरिका आणि युरोपीय महासंघात नेटफ्लिक्सच्या वापरासाठीचे शुल्क वाढवण्यात आले आहे, तरीही येथील वापरकर्त्यांची संख्या वाढली हे समीकरण नेटफ्लिक्ससाठी सुखावह ठरले आहे. अमेरिका, कॅनडा पाठोपाठ युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतही सशुल्क वापरकर्त्यांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा १६ टक्क्याने वाढ झाली आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: इराणी रॅपर तुमाज सालेहीला फाशीची शिक्षा का झाली? त्याचा नेमका गुन्हा काय?

धोरण चतुराईचा परिणाम

मासिक-वार्षिक शुल्क योजनेत केलेल्या बदलाबरोबरच एकच खाते दुसऱ्या कोणाबरोबर शेअर करता येऊ नये यासाठी नेटफ्लिक्सने राबवलेल्या योजनाही परिणामकारक ठरल्याने ही वाढ दिसून आली असल्याचे सांगण्यात येते आहे. आत्तापर्यंत जे प्रेक्षक एकाच अकाऊंटवरील पासवर्ड शेअर करून नेटफ्लिक्स पाहात होते, त्यांना चाप बसला. हा प्रेक्षकवर्ग स्वतंत्रपणे शुल्क भरून नेटफ्लिक्स पाहू लागल्याने सशुल्क वापरकर्त्यांच्या संख्येत ही विक्रमी वाढ झाली आहे, असा अंदाज वर्तवला जातो आहे. मात्र ही योजना यापुढेही तितकीच परिणामकारक राहील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नेटफ्लिक्सला आपल्या मूळ आशयनिर्मितीत वैविध्य देण्यावरच अधिक भर द्यावा लागणार आहे. आफ्रिकेत नेटफ्लिक्सला तेथील स्थानिक शोमॅक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून तगडी स्पर्धा आहे. शोमॅक्सवर इतरही वाहिन्यांचे पर्याय उपलब्ध असल्याने नेटफ्लिक्सच्या तुलनेत त्याला अधिक पसंती मिळते आहे. त्यामुळे आफ्रिकेत डब्ल्यूडब्ल्यूई सारख्या कुस्ती स्पर्धेच्या सामन्यांचे लाईव्ह प्रसारण हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत, जेणेकरून तेथील प्रेक्षकवर्ग वाढवता येईल. आफ्रिकेप्रमाणेच भारतातही नेटफ्लिक्सला स्थानिक आणि प्राईम, डिस्ने हॉटस्टारसारख्या प्रस्थापित वाहिन्यांच्या लोकप्रियतेचा सामना करावा लागतो आहे.

हेही वाचा >>>‘आयपीएल’मध्ये दररोज २०० धावांच्या राशी! खेळपट्ट्या, इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का?

भारतातील चित्र

नेटफ्लिक्स इंडियाच्या नफ्यात ७५ टक्के वाढ

नेटफ्लिक्स इंडियाची गेल्या वर्षीची आर्थिक उलाढाल २,२१४ कोटी रुपये इतकी होती. २०२२ मध्ये हीच उलाढाल १,८३७ कोटी रुपये होती. वर्षभरात या उत्पन्नात २४.१ टक्के इतकी वाढ झाली. तर २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये नेटफ्लिक्स इंडियाच्या नफ्यात ७५ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी नेटफ्लिक्स इंडियाचा नफा ३५.३ कोटी रुपये इतका होता. अर्थात, भारतीय बाजारपेठेत पाय रोवण्याच्या उद्देशाने नेटफ्लिक्सने इथे आपल्या मासिक, वार्षिक शुल्कात मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे. त्याचाच परिणाम सशुल्क वापरकर्त्यांच्या वाढत्या संख्येत दिसून आला. इतर देशांप्रमाणेच भारतातही एका अकाऊंटवर एकालाच नेटफ्लिक्स पाहता येईल, अशा पद्धतीने पासवर्ड शेअर यंत्रणेला रोख लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे एकीकडे नेटफ्लिक्सच्या भारतातील वापरकर्त्यांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय, नेटफ्लिक्स इंडियाच्या उत्पन्नातही वाढ झालेली पाहायला मिळाली असली तरी भारतात ॲमेझॉन प्राईम आणि डिस्ने हॉटस्टार या मोठ्या ओटीटी कंपन्यांबरोबरच यूट्यूब आणि इंटरनेट आधारित वाहिन्यांशीही नेटफ्लिक्सला स्पर्धा करावी लागते आहे.

भारतीय बाजारपेठेत तिसऱ्या क्रमांकावर

भारतीय ओटीटी बाजारपेठेत नेटफ्लिक्स अजूनही तिसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट, वेबमालिका याचबरोबर हिंदीसह अन्य भाषेतील आशय, आयपीएलसारख्या मोठमोठ्या क्रीडा सामन्यांचे प्रसारण यामुळे डिस्ने हॉटस्टारचा भारतातील एकूण ओटीटी उत्पन्नातील वाटा सर्वाधिक आहे. डिस्ने हॉटस्टारचा एकूण उत्पन्नातील वाटा २५.६५ टक्के आहे. त्याखालोखाल आंतरराष्ट्रीय आशयाबरोबरच हिंदीसह विविध भारतीय भाषांमधील चित्रपट आणि वेबमालिकांवर भर देणाऱ्या ॲमेझॉन प्राईमचा वाटा २१.२७ टक्के इतका आहे. त्या तुलनेत नेटफ्लिक्स इंडियाचा वाटा १२.५९ टक्के इतकाच आहे. नेटफ्लिक्सला भारतीय बाजारपेठेत कमाईची मोठी संधी आहे आणि त्यादृष्टीने प्रयत्न करत भारतीय आशय देण्याची धडपड म्हणून गेल्या काही महिन्यांत हिंदीतील मोठे व्यावसायिक चित्रपट, ‘हिरामंडी’ सारख्या बिग बजेट वेबमालिका असा आशय नेटफ्लिक्सवर उपलब्ध होतो आहे. सध्या नेटफ्लिक्सच्या भारतातील सशुल्क वापरकर्त्यांची संख्या ६५ लाख आहे. त्यामुळे आता हा आकडा कोटीपार पोहोचवण्याच्या दिशेने नेटफ्लिक्स इंडियाचे पुढचे प्रयत्न असणार आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netflix target of crores in the indian market print exp amy