एमएमआर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली जावी यासाठी एक नव्या मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहेत. या मार्गाच्या उभारणीनंतर एमएमआर क्षेत्रातील शहरांतर्गत वाहतुकीला एका नवा आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. नवी मुंबई एनएच – ३ व्हाया कल्याण बदलापूर प्रवेश नियंत्रित (ॲक्सेस कंट्रोल) असा हा मार्ग असणार आहे.
नव्या मार्गाचे महत्त्व काय?
मुंबई आणि नवी मुंबई ही शहरे ठाणे तसेच ठाणेपल्याड शहरांना वाहतूक कोंडी टाळून जोडता यावीत यासाठी गेल्या काही वर्षात एमएमआरडीएच्या माध्यमातून अनेक नव्या रस्त्यांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो – १४, कल्याण – तळोजा मेट्रो – १२, ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो – ५ यांसारख्या मेट्रो मार्गांची देखील उभारणी करण्यात येत आहे. यामुळे एमएमआर क्षेत्रातील शहरे अधिक जवळ येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर एमएमआर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी जोडण्यासाठी नवी मुंबई एनएच – ३ व्हाया कल्याण बदलापूर प्रवेश नियंत्रित (ॲक्सेस कंट्रोल) मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या उभारणी बाबत नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी ‘टाटा कन्सलटिंग इंजिनियर’ कंपनीने सुचविलेल्या अनेक पर्यायांवर यावेळी त्यांच्या तज्ज्ञांशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संवाद साधला. तर टाटा मार्फत यावेळी बदलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ( तुर्भे – तळोजा – उसाटने आणि खारघर – तुर्भे लिंक रोड ) हा रूट ॲक्सेस कंट्रोल मार्गासाठी चांगला पर्याय असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
कसा असेल हा ॲक्सेस कंट्रोल मार्ग?
बदलापूर येथून जात असलेल्या मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाच्या येथून या रस्त्याची सुरुवात होणार आहे.
– यामार्गावरून पुढे जात पालेगाव येथे मार्गाला पहिला इंटरचेंज असणार आहे. याद्वारे नागरिकांना अंबरनाथ शहरात तसेच काटई बदलापूर मार्गावर जाता येणार आहे.
– यापुढे हा मार्ग कल्याण पूर्वेतून जात असून मार्गावर हेदुटणे येथे मार्गाला दुसरा इंटरचेंज देण्यात आला आहे. या मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा हा इंटरचेंज असून येथून वाहनचालकांना मेट्रो – १२ च्या हेदुटणे स्थानकात जाता येणार आहे. तसेच येथून कल्याण रिंग रोडची कनेक्टिव्हिटी या मार्गावरून असणार आहे. कल्याण – शिळफाटा मार्गावरदेखील येथून जाता येणार आहे.
– या पुढे शिरढोण येथे या रस्त्यावरून मल्टी मोड कॉरिडोअर मार्गाला जाता येणार आहे. या मल्टिमोड कॉरिडोर रस्ता उभारणीचे कामदेखील जलदगतीने सुरू आहे. या या मल्टिमोड कॉरिडोर रस्त्यामुळे थेट पुढे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे येथे जाणार आहे. तर हाच मल्टिमोड कॉरिडोर सीटीएस कोस्टल रोडलाही जोडला जाणार असून याद्वारे थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठणे सोपे होणार आहे.
– शिरढोण येथे तिसरा इंटरचेंज असल्याने कल्याण येथील २७ गावे याठिकाणी जोडली जाणार आहेत. तर उसाटणे येथून जाणाऱ्या राज्य महामार्गाला याची कनेक्टिव्हिटी असणार आहे. उसाटणे येथील रस्त्याचे कामदेखील प्रगतीपथावर आहे. तर पुढे मुंबई – पनवेल हायवेला या मार्गाची जोडणी करण्यात येणार असून नागरिकांना पनवेल येथे जाणे सोपे होणार आहे.
– पुढे हा मार्ग खारघर तुर्भे लिंक रोडला थेट जोडण्यात येणार आहे. या लिंक रोडची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष उभारणीचे काम देखील लवकरच सुरु होणार आहे. या लिंक रोड द्वारे थेट नवी मुंबई शहरात जाता येणार आहे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाता येणार आहे.
या प्रकल्पाचे नेमके फायदे काय?
हा संपूर्ण मार्ग ॲक्सेस कंट्रोल असून ग्रीन फिल्ड मार्ग असणार आहे.
– या मार्गामुळे शहरांतर्गत होणारी वाहतूक थांबणार असून शहराच्या बाहेरून वाहने प्रवास करणार. यामुळे शहरातील वाहतूक जलदगतीने होईल आणि इतर शहरांमध्ये जाण्यासाठी एक जलद पर्याय उपलब्ध होईल.
– या मार्गाच्या उभारणीनंतर बदलापूर ते डोंबिवली येथील वाहनचालकांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय थेट मुंबई आणि नवी मुंबई गाठता येणार आहे. तसेच इतर जिल्ह्यात जाणाऱ्या महामार्गांवर देखील सहजतेने जाणार आहे.
समृद्धी महामार्गाशी कशी असेल जोडणी?
बदलापूर येथून मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असून याद्वारे नागरिकांना समृद्धी महामार्गाला जाता येणार आहे.
– तर समृद्धी महामार्गाद्वारे पुढे मुंबई – आग्रा हायवे येथे थेट जाता येणार आहे. यामुळे नाशिकच्या दिशेने प्रवास करता येणार आहे.