नुकताच निवडणुकांचा निकाल लागला. त्यानंतर देशभरात अनेक घडामोडी घडल्याचे आपण पाहिले. त्यातीलच एक महत्त्वाची घटना म्हणजे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू यांचे झालेले पुनरागमन, त्यानंतर आंध्रप्रदेशातील अमरावती हे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले. या अमरावतीला सध्या राजकीय वलय असले तरी या ठिकाणाला हजारो वर्षांचा इतिहास आहे, त्याच इतिहासाचा घेतलेला हा आढावा.
अमरावती- प्राचीन बौद्ध वारसा लाभलेले शहर
१७ व्या शतकात एक महत्त्वाची घटना घडली. राजा वेसारेड्डी नायडू नावाच्या जमिनदाराने आंध्रच्या धान्यकटकम (धरणीकोटा) गावात नवीन घर बांधण्याचे काम हाती घेतले होते. यासाठी तो बांधकाम सामानाची जुळवाजुळव करत होता. या प्रक्रियेत त्याचे लक्ष चुनखडीचे अनेक खांब आणि फरशी असलेल्या ढिगाऱ्यावर पडले. या ढिगाऱ्यातील अवशेषांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात न आल्याने, या स्थानिक जमिनदाराने गावातील आपले नवीन निवासस्थान बांधण्यासाठी या प्राचीन महत्त्व असलेल्या दगडांचा/ स्तंभांचा वापर करण्यास सुरुवात केली आणि लवकरच इतरांनीही त्याचेच अनुकरण केले. इतर स्थानिकांनीही या ढिगाऱ्यातील स्तंभ, दगडांचा वापर आपल्या वैयक्तिक बांधकामासाठी केला. अशा प्रकारे प्राचीन वास्तूच्या अवशेषांचा पद्धशीर नाश १८१६ पर्यंत चालूच राहिला. १७९८ साली भारतीय पुरातत्त्व खात्याचे पहिले सर्वेक्षक जनरल कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी या स्थळाला भेट दिली होती. परंतु, त्यावेळी त्यांनी या स्थळाची केवळ नोंद केली होती. कालांतराने जमिनदाराच्या मृत्यूनंतर मॅकेन्झी यांनी पुन्हा एकदा या स्थळाला भेट देऊन सखोल सर्वेक्षणाला सुरुवात केली. त्यांच्या या सर्वेक्षणातून नायडू यांनी शोधलेल्या प्राचीन ढिगाऱ्याबरोबरीने या प्रदेशातील बौद्ध इतिहासाचे दरवाजे उघडले गेले.
अधिक वाचा: भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची निवडलेली नवी राजधानी अमरावती
२०१५ साली, आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विजयवाडा – गुंटूर प्रदेशात नवीन राजधानी तयार करण्याची घोषणा केली. त्यांनी प्राचीन वारसा असलेल्या अमरावथीच्या नावावर आपल्या नव्या राजधानीचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला. परंतु अंकशास्त्रीय कारणास्तव Amaravathichya-अमरावथीच्या नावातील ‘h-एच’ हे अक्षर काढून टाकण्यात आले. या वर्षी नायडू हे मुख्यमंत्रिपदावर परतल्यानंतर पुन्हा एकदा नवीन राजधानी अमरावती येथे तयार होत आहे, ही नव्याने तयार होणारी राजधानी प्राचीन शहरापासून सुमारे २० किमी अंतरावर आहे. या ठिकाणी सिंगापूरच्या धर्तीवर एक आधुनिक शहर निर्माण करण्याचा त्यांचा मानस असला तरी; दक्षिण आशियातील बौद्ध धम्माच्या सर्वात भव्य आणि महत्त्वाच्या ठिकाणांचा वारसा या राजधानीला असल्याने आधुनिक आणि प्राचीन संस्कृतीचा संगम म्हणून या राजधानीकडे पाहिले जात आहे.
अमरावती आणि आंध्र प्रदेशातील बौद्ध धम्माचा उदय
इसवी सनपूर्व पाचव्या शतकात बिहारमधील प्राचीन मगध राज्यात बौद्ध धम्माचा उदय झाला. कृष्ण नदीच्या खोऱ्यातील आंध्रप्रदेशात हा धम्म व्यापारामार्फत पोहचला. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने इतिहासकार अनिरुद्ध कनिसेट्टी यांच्याशी त्या संदर्भात संवाद साधला, अनिरुद्ध कनिसेट्टी सांगतात, आंध्रप्रदेशातील बौद्ध भिक्षू हे पहिल्या बौद्ध संगितीच्या वेळेस राजगीरमध्ये उपस्थित होते. सम्राट अशोकाने या भागात बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला खरी चालना दिली. त्याने या भागात शिलालेखही कोरवून घेतला. त्यानंतर सुमारे सहा शतकं या परिसरात बौद्ध धम्माची भरभराट होत राहिली.
आंध्रमधील पहिले नागरिकरण
अमरावती, नागार्जुनकोंडा, जग्गयापेटा, सलीहुंडम आणि संकरम यांसारख्या प्राचीन वारसा असलेल्या स्थळांवर १४ व्या शतकापर्यंत बौद्ध धम्म अस्तित्त्वात होता. प्रसिद्ध इतिहासकार श्री पद्मा नमूद करतात की, आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या बौद्ध धम्माचा इतिहास आणि विकास हा आंध्रच्या पहिल्या नागरीकरण प्रक्रियेशी संबंधित आहे. व्यापार, सागरी व्यापार हे शहरीकरण संस्कृतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य होते. आणि याच व्यापाराने बौद्ध धम्माच्या प्रसाराला चालना दिली (श्री पद्मजा या ‘बुद्धिझम इन द कृष्णा रिव्हर व्हॅली ऑफ आंध्र’ (२००८) या पुस्तकाच्या प्राध्यापक ए.डब्ल्यू. बार्बर यांच्यासमवेत सह-लेखिका आहेत).
राजा नाही तर, व्यापारी कारणीभूत
“खरे तर व्यापारी हे अमरावती स्तूपाचे महत्त्वाचे संरक्षक होते,” असे कनिसेट्टी सांगतात. आंध्रमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारामध्ये व्यापाराने महत्त्वाची भूमिका बजावली. ते पुढे सांगतात, उत्तर भारतातील बौद्ध धर्माकडे गौतम बुद्ध हे राजा बिंबिसार किंवा अजातशत्रू यांच्याशी संवाद साधत असल्याच्या अनेक दंतकथा आहेत, त्यानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी सक्रियपणे समर्थन दिले होते. याउलट, आंध्रमध्ये बौद्ध धम्माला मिळणाऱ्या राजश्रयाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. अमरावती येथील बौद्ध धम्म हा व्यापारी, कारागीर यांनी दिलेल्या आश्रयातून वाढीस लागल्याचे दिसते. श्री पद्मा यांनी म्हटल्याप्रमाणे, आंध्रमधील बौद्ध धम्म हा तत्कालीन राजेशाहीवर अवलंबून नव्हता, शिलालेखीय पुरावे याबद्दल स्पष्टपणे नमूद करतात.
अधिक वाचा: २५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?
श्री पद्मा लिहितात, या प्रदेशात बौद्ध धम्माच्या प्रसाराचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे बौद्ध धम्माने स्थानिक परंपरांना सहजच आत्मसात केले होते. या प्रदेशातील महाश्मयुगीन संस्कृती महत्त्वाची होती. या संस्कृतीत मृतांना पुरल्यानंतर, त्यांच्या दफनांवर मोठे दगड उभारले जात होते. या अशाप्रकारच्या स्मारकांना बौद्ध स्तूपांचे पूर्ववर्ती मानले जाते. याशिवाय स्थानिकांच्या देवी, सर्पपूजाही बौद्ध धम्माचा भाग झाल्या. आंध्र बौद्ध धम्माच्या इतिहासात अमरावतीचे एक विशेष स्थान होते. हे स्थळ महायान बौद्ध धर्माचे जन्मस्थान होते. “दलाई लामा म्हणतात की अमरावती हे त्यांच्यासाठी सर्वात पवित्र स्थळ आहे,” असे प्रोफेसर अमरेश्वर गल्ला यांनी सांगितले. गल्ला हे ‘शाश्वत वारसा विकास’ या विषयाचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि अमरावती हेरिटेज टाऊनचे माजी मुख्य क्युरेटर आहेत.
महायान बौद्ध धम्म हाच सर्वात मोठा धर्म
गल्ला सांगतात की, महायान बौद्ध धम्माचा आधार असलेल्या माध्यमिक तत्त्वज्ञानाचा पाया घालणारे आचार्य नागार्जुन दीर्घकाळ अमरावतीमध्ये राहिले होते आणि त्यांच्याच शिकवणीमुळे बौद्ध धम्माच्या आचरणात लक्षणीय बदल घडून आला. “अमरावतीमधूनच, महायान बौद्ध धम्म दक्षिण आशिया, चीन, जपान, कोरिया आणि आग्नेय आशियामध्ये पसरला. चीनमधील सांस्कृतिक क्रांतीपूर्वी, महायान बौद्ध धम्म हा सर्वात अधिक संख्येने अनुचरण केला जाणारा धर्म होता” असे गल्ला सांगतात.