Covid-19 करोनाच्या नवीन प्रकारांमुळे पुन्हा एकदा लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पुन्हा करोना विषाणूने डोके वर काढले आहे. करोना विषाणूच्या उत्परिवर्तनातूनच करोना विषाणूचे नवनवीन अवतार समोर येत आहेत. यातील काही प्रकार अति घातक आहेत, तर काही तुलनेने कमी घातक आहेत. यातीलच दोन प्रकार म्हणजे फ्लर्ट आणि एल बी – १. या विषाणूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. फ्लर्ट हा ओमिक्रोनचा उपप्रकार असून जानेवारी २०२२ मध्ये भारतात करोनाच्या तिसर्‍या लाटेत ओमिक्रोनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘फ्लर्ट’ला केपी म्हणूनही ओळखले जाते. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या आकडेवारीनुसार, जूनच्या सुरुवातीपर्यंत केवळ फ्लर्ट विषाणूचे ३३.१ टक्के संक्रमित रुग्ण आढळून आले होते. करोनाचे हे दोन अवतार किती घातक आहेत? जगासाठी हे संकट किती मोठे आहे? भारतातील सद्यपरिस्थिती काय? कोणती खबरदारी घ्यायला हवी? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

हेही वाचा : Covid-19 : ‘FLiRT’मुळे करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; हा नवा अवतार किती घातक?

करोनाचे नवे अवतार – फ्लर्ट आणि एल बी-१

फ्लर्ट हा विषाणू करोना प्रकारांच्या उपसंचातील आहे, ज्यात केपी २, जेएन १. ७ आणि केपी व जेएनच्या इतर प्रकारांचा समावेश आहे. हे विषाणू जेएन १ विषाणूचे उपप्रकार आहेत. २०२३ च्या उत्तरार्धात आणि २०२४ च्या सुरुवातीला अनेकांना जेएन १ ची लागण झाली होती. या प्रकारांमध्ये ताप, खोकला, थकवा आणि संक्रमणाचा प्रभाव वाढल्यास पाचन समस्यांसारखी लक्षणे आढळून येतात. चिंतेची बाब म्हणजे याची लागण झाल्यास लस आणि पूर्वीच्या संसर्गातून मिळालेली प्रतिकारशक्ती कमी होण्याचीदेखील शक्यता असते.

एल बी – १ हा विषाणू फ्लर्ट गटातील आहे. अमेरिकेतील कोविड-१९ प्रकरणांपैकी १७.५ टक्के प्रकरणे एल बी – १ ची आहेत. फ्लर्ट आणि एल बी – १ हे दोन्ही विषाणू वेगाने प्रसारित होतात. इन्फेकशीयस डिसीज सोसायटी ऑफ अमेरिकामधील प्राथमिक संशोधन डेटा दर्शवितो की, फ्लर्ट हा विषाणू लसीकरण झालेल्या लोकांना संक्रमित करत आहे. फ्लर्ट हा प्रकार जेएन १ पेक्षा अधिक वेगाने प्रसारित होणारा आहे, तर एल बी – १ देखील त्याच्या पूर्ववर्तींपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे.

हे संकट किती मोठे?

अमेरिका, ब्रिटन आणि सिंगापूरमध्ये करोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे आणि रुग्णालयात भरती होणार्‍यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. १६ ते २२ जूनच्या सीडीसी डेटावरून असे दिसून आले आहे की, आपत्कालीन कक्षात २३ टक्के संक्रमितांना दाखल करण्यात आले आहे, तर करोनामुळे होणारे मृत्यूही अलीकडच्या आठवड्यात १४.३ टक्क्यांनी वाढले आहेत. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने नोंदवले की, कोविड -१९ प्रकरणांची संख्या ५ ते ११ मे दरम्यान १३,७०० होती, मात्र मागील आठवड्यात ही संख्या २५,९०० झाली आहे; तर त्याच कालावधीत रुग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या १८१ वरून २५० पर्यंत वाढली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने मे महिन्यात नोंदवले होते की, केपी – २ प्रकारातील २९० प्रकरणे आणि केपी – १ प्रकारातील ३४ प्रकरणे भारतात आढळून आली आहेत.

कोविडचा प्रसार वाढतोय का?

२०१९ च्या उत्तरार्धात कोविड-१९ ने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. हा विषाणू आजही अस्तित्वात आहे. अमेरिकेने २०२२ च्या सुरुवातीस मास्क वापराचे आदेश मागे घेतले होते, तर सीडीसीने मे २०२३ पर्यंत दैनंदिन रुग्णांची नोंद करणे थांबवले होते. त्यामुळे आता चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले आहे, परिणामी रुग्णसंख्या कमी नोंदवली जात आहे. परंतु, कोविड-१९ च्या स्ट्रेनमध्ये सतत उत्परिवर्तन होत आहेत. मुख्य म्हणजे कालांतराने, संक्रमण आणि लसींद्वारे विकसित झालेली विषाणूविरुद्धची प्रतिकारशक्तीदेखील कमी होत जाते. त्यामुळे संक्रमितांची संख्या अधिक वाढू शकते.

ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एंग्लिया येथील वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक पॉल हंटर यांनी सांगितले, “संक्रमण किंवा लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती सरासरी चार ते सहा महिने टिकते, त्यामुळे हिवाळ्यात किंवा शरद ऋतूत ज्यांनी लस घेतली, त्यातील बहुतेकांची प्रतिकारशक्ती कमी झाली असेल.” अशा परिस्थितीत लसीच्या बूस्टर डोसची गरज आहे. यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने औषध उत्पादकांना नवीन प्रकाराला लक्ष्य करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः वृद्ध आणि अन्य आजार असलेल्यांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे.

हेही वाचा : हृदयविकार रुग्णांसाठी भारताची मार्गदर्शक तत्त्वे कोणती?

संसर्ग कसा टाळता येईल?

२०२० मध्ये साथीच्या रोगाच्या सुरुवातीला विहित केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार सुरक्षित अंतर राखणे, सर्व प्रकारांपासून संरक्षण करण्यासाठी घरामध्ये एन ९५ किंवा केएन ९५ सारखे मास्क वापरणे आदींचा समावेश आहे. तसेच ज्या भागात संसर्ग पसरला आहे, अशा लोकांना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. याशिवाय संसर्ग होण्याची शक्यता अधिक असलेल्यांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New covid variant flirt and nb 1 surge rac
Show comments