लठ्ठपणा ठरविण्यासाठी बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआयचा निकष वापरू नये, असा आग्रह जागतिक पातळीवरील तज्ज्ञ धरत आहेत. यापुढे केवळ बीएमआयपेक्षा, कंबरेचा घेर आणि लठ्ठपणाशी निगडित शारीरिक व्याधी यांचाही विचार केला जाईल…
नेमका हेतू काय?
लठ्ठपणा ठरविण्यासाठी नवीन निकषांबाबतचे संशोधन निबंध ‘लॅन्सेट’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. लठ्ठपणाची अधिक अचूक व्याख्या करून वैद्याकीय मदत आवश्यक असलेल्या व्यक्तींना ती प्रभावीपणे मिळवून देण्याचा यामागे उद्देश आहे, असे या संशोधन निबंधाचे लेखक आणि वॉशिंग्टन विद्यापीठातील लठ्ठपणा- तज्ज्ञ डॉ. डेव्हिड कमिंग्ज यांनी म्हटले आहे. लठ्ठपणा ठरविण्यासाठी दोन नवीन निदान प्रकार त्यांनी सुचविले आहेत. त्यात वैद्याकीय लठ्ठपणा आणि पूर्ववैद्याकीय लठ्ठपणा यांचा समावेश आहे. ‘वैद्याकीय लठ्ठपणा’मध्ये बीएमआयसह संबंधित व्यक्तीचे अवयव, ऊतींसह एकूणच शरीरावर होणारे लठ्ठपणाचे परिणाम दिसून येतात. त्यात हृदयविकार, उच्च रक्तदाब, यकृत अथवा मूत्रपिंडविकार, तीव्र गुडघेदुखी अथवा कंबरदुखी यांचा समावेश आहे. या रुग्णांना आहार, व्यायामसोबत वैद्याकीय उपचार आवश्यक असतात. ‘पूर्ववैद्याकीय लठ्ठपणा’ असलेल्या व्यक्तींमध्ये या विकारांचा धोका असतो; मात्र त्यांची बाधा अद्याप झालेली नसते.
हेही वाचा : महाकुंभ मेळ्यातील आयआयटी बाबा अभय सिंहची जुना आखाड्यातून हकालपट्टी; कारण काय?
नवीन निकष काय?
लठ्ठपणा ठरविताना व्यक्तीच्या शरीरातील स्नायूंचे वजन, वय, लिंग आणि सहव्याधी यांचा विचार करावा, असे नवीन निकष आहेत. त्यात कंबरेचा घेर मोजण्यावर भर देण्यात आला आहे. कारण पोटावर असलेली चरबी ही अनेक आरोग्य समस्यांशी निगडित असते. पोटावर जास्त चरबी असलेल्या व्यक्तींना हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका असतो. याचबरोबर शरीरात चरबीचे मूल्यमापन स्कॅन चाचण्यांच्या माध्यमातून डॉक्टरांनी अचूकपणे करावे, असेही सुचविण्यात आले आहे.
बीएमआय का पुरेसा नाही?
लठ्ठपणा ठरविण्यासाठी बीएमआय ही खूप जुनी पद्धत असली तरी त्यात त्रुटी आहेत. त्यातून प्रत्येकवेळी लठ्ठपणाचे योग्य निदान होईलच असे नाही. बीएमआय हा व्यक्तीचे वजन (किलो) भागिले उंचीचा वर्ग (मीटर) या सूत्राने ठरविला जातो. सध्या ३० व त्यापेक्षा जास्त बीएमआय असलेल्या व्यक्ती लठ्ठ मानल्या जातात, परंतु शरीरात अतिरिक्त चरबी असलेल्या व्यक्ती या नेहमी ३० पेक्षा जास्त बीएमआय असलेल्या असतीलच असे नाही. याचवेळी फुटबॉल खेळाडू अथवा इतर खेळाडू हे जास्त स्नायू वजन आणि कमी चरबी असलेले असतात. तरीही बीएमआयनुसार ते लठ्ठ ठरविले जातात. केवळ जास्त वजन म्हणजे लठ्ठ हा निकष कालबाह्य ठरवावा, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा : बांगलादेशच्या संविधानातून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटणार? नेमका हा वाद काय?
बदल काय घडेल?
नवीन निकषांनुसार, सध्या लठ्ठ ठरविण्यात येत असलेले २० टक्के जण हे लठ्ठ ठरणार नाहीत. मात्र कमी बीएमआय असलेले आणि गंभीर आरोग्य समस्या असलेल्या व्यक्ती लठ्ठ ठरतील. नवीन निकषांमुळे लठ्ठ व्यक्तींच्या संख्येत मोठे फेरबदल होतील. लठ्ठपणाची ही नवीन व्याख्या जगभरातील ७५ हून अधिक वैद्याकीय संस्थांनी स्वीकारली आहे.
आव्हाने कोणती?
या नवीन निकषांची अंमलबजावणी करणे आव्हानात्मक ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लठ्ठपणा ठरविण्यासाठी कंबरेचा घेर मोजण्याची पद्धत सोपी वाटत असली तरी त्यातील क्लिष्टतेकडे अनेकांनी लक्ष वेधले आहे. अनेक डॉक्टर कंबरेचा घेर अचूकपणे मोजण्यासाठी प्रशिक्षित नसतात. सध्याच्या वैद्याकीय मोजफिती (टेप) अनेक व्यक्तींच्या कंबर मोजण्याएवढे मोठे नाहीत. नवीन पद्धती ही सगळीकडे स्वीकारली जाणे आवश्यक आहे. याचबरोबर ती जलद, कमी खर्चीक आणि विश्वासार्ह असावी, हे मुद्देही तज्ज्ञांनी उपस्थित केले आहेत.
हेही वाचा : जमिनीचे कायदेशीर अधिकार देणारी स्वामित्व योजना आहे तरी काय? याचा फायदा कोणाला होणार?
समस्या किती गंभीर?
जगभरात १ अब्जाहून अधिक जणांना लठ्ठपणाची समस्या असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेत ४० टक्के प्रौढ व्यक्ती लठ्ठ असल्याचे यूएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे म्हणणे आहे. जगभरात २०१९ मध्ये जास्त बीएमआय असलेल्या ५० लाख व्यक्तींचा असंसर्गजन्य रोगांमुळे मृत्यू झाला. जगात १९९० ते २०२२ या कालावधीत ५ ते १९ वयोगटातील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण २ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर पोहोचले. याचवेळी प्रौढांमध्ये हे प्रमाण ७ वरून १६ टक्क्यांवर पोहोचल्याचे डब्ल्यूएचओचा अहवाल सांगतो.