सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. या तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक कामे चुटकीसरशी हातावेगळी करता येतात. सर्व काही ऑनलाइन उपलब्ध असल्यामुळे आपली सगळी कामे सोपी झाली आहेत. मात्र, याच इंटरनेट, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांची ऑनलाइन फसवणूकही केली जाते. अशा प्रकारच्या सायबर क्राइमचे प्रमाण आजकाल चांगलेच वाढले आहे. सध्या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून लोकांची खासगी माहिती मिळवून फसवणूक केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमधील एका महिलेसोबत नेमके काय घडले? महिलेसोबत घडलेला प्रसंग तुमच्यासोबतही घडल्यावर काय काळजी घ्यावी? अशा प्रकारची फसवणूक नेमकी कशी केली जाते? हे जाणून घेऊ.
महिलेसोबत नेमके काय घडले?
मुंबईतील किंजल शाह नावाच्या महिलेची ऑनलाइन व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महिलेला अचानक एक ऑटोमेटेड कॉल आला. या कॉलच्या माध्यमातून या महिलेला तुमचा मोबाईल क्रमांक दोन तासांत बंद होणार आहे, असे सांगण्यात आले. तुमच्या दुसऱ्या एका मोबाईल क्रमांकावरून कोणी तरी बेकायदा संदेश पाठवीत आहे. त्यामुळे तुमच्याविरोधात तक्रार दाखल झालेली आहे, असे या महिलेला सांगण्यात आले. तसेच सांगितलेली सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या महिलेला व्हिडीओ कॉल करा, असे सांगण्यात आले. या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तुमच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत जबाब द्या, असे निर्देश या महिलेला दिले गेले. या घटनेनंतर पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून मला फसवले जात आहे, असे या महिलेच्या लक्षात आले आणि अनर्थ टळला.
गुन्हा दाखल झाल्याचे सांगून फसवणूक
मात्र, अशा प्रकारच्या फसवणुकीचे हे पहिलेच उदाहरण नाही. याआधीही अनेकांशी अशा घटना घडल्या आहेत. मी एक पोलीस अधिकारी किंवा शासकीय संस्थेचा अधिकारी आहे, असे सांगून तुमच्याविरोधात तक्रार दाखल झालेली आहे, असे पीडित व्यक्तीला सांगितले जाते. तुमच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे तुम्ही अडचणीत आहात, असे भासवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर संबंधित पीडित व्यक्तीची फसवणूक केली जाते.
तत्काळ जबाब देण्यासाठी आग्रह
किंजल यांची फसवणूक करण्यासाठी संबंधित व्यक्ती किंजल यांच्याशी साधारण दोन तास बोलत होती. प्रत्यक्ष पाहायचे झाल्यास एखादा पोलीस अधिकारी एखाद्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी ऑनलाइन व्हिडीओ कॉलवर दोन तास घालवत नाही. संशय आल्यानंतर किंजल यांनी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कथित गुन्ह्याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी जवळच्या पोलीस ठाण्यात जाण्याचे ठरवले. मात्र, व्हिडीओ कॉलवरील आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊ नका, असे सांगितले. उलट व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तत्काळ जबाब द्या, असे म्हणत दटावण्याचा प्रयत्न केला.
चौकशीदरम्यान महिला पोलीस अधिकारी नव्हती
या आरोपीकडून किंजल यांना व्हिडीओ कॉल चालूच ठेवण्याचा आग्रह केला जात होता. तसेच कबुलीजबाबादरम्यान आजूबाजूला कोणी आहे का? याची खात्री करून घेण्यासाठी संबंधित व्यक्ती मोबाईलचा कॅमेरा संपूर्ण खोलीत फिरवण्यास सांगत होती. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारादम्यान किंजल यांची एका कथित पुरुष पोलीस अधिकाऱ्याकडून चौकशी केली जात होती. त्या पोलिसाच्या आजूबाजूला महिला पोलीस अधिकारी नव्हती. अशा सर्व परिस्थितीमुळे किंजल यांना संशय आला.
स्क्रीन रेकॉर्डिंग केली सुरू
त्या संपूर्ण संभाषणाबाबत संशय आल्यानंतर किंजल यांनी संपूर्ण संभाषण रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. पोलीस असल्याची बतावणी करणारी समोरची व्यक्ती किंजल यांना अटक करण्याची धमकी देत होती. समोरच्या व्यक्तीने ‘आधार’ आणि ‘पॅन’ क्रमांक विचारल्यावर किंजल यांनी व्हिडीओ कॉल कट केला.
फसवणुकीपासून दूर कसे राहायचे?
अशा पद्धतीने केली जाणारी फसवणूक ही प्रामुख्याने दोन पद्धतींनी केली जाते. सर्वप्रथम समोरची व्यक्ती कुरिअर सर्व्हिसचे प्रतिनिधी असल्याचे भासवते. आमच्याकडे एक पॅकेट आले असून, त्यात बेकायदा वस्तू आहेत. या ‘कृत्यात’ तुमचा सहभाग आहे, असे सांगितले जाते. तर, दुसऱ्या प्रकारच्या पद्धतीत समोरची व्यक्ती मी पोलीस अधिकारी आहे, असे सांगते. पीडित व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत, असे भासवण्याचा या व्हिडीओमध्ये प्रयत्न केला जातो.
फसवणूक होऊ नये म्हणून काय करावे?
अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून नेहमी सजग राहिले पाहिजे. समोरची व्यक्ती पोलीस असल्याचे सांगत असेल, तर पोलीस खात्याने काढलेली नोटीस दाखवा, अशी मागणी करावी. अशा प्रकारची नोटीस दाखविल्यानंतरच समोरची व्यक्ती पोलीस असल्याचे समजावे. मुळात कोणाचीही चौकशी करायची असेल, तर पोलीस शक्यता व्हिडीओ कॉल करीत नाहीत. अशा प्रकारची बतावणी कोणी करीत असेल, तर कॉल न स्वीकारणे हा योग्य पर्याय आहे.
… तर कॉल स्वीकारू नका
एखाद्या महिलेला अशा प्रकारचा कॉल आल्यास समोर चौकशी करण्यास महिला पोलीस अधिकारी असायला हवी. समोरची व्यक्ती पुरुष असेल आणि पोलीस असल्याची बतावणी करीत असेल, तर शक्यतो कॉल स्वीकारणे टाळावे.
जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन अधिक चौकशी करा
व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून अशा प्रकारची फसवणूक होत असल्यास आपली खासगी माहिती कोणालाही देऊ नये. त्यामध्ये पासवर्ड, आर्थिक माहिती, गुपित माहिती किंवा कोणतेही पैसे कोणालाही देऊ नयेत. संशयास्पद व्हिडीओ कॉल आल्यास मोबाईलवर स्क्रीनशॉट काढून घ्यावा किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करावी. याच स्क्रीन रेकॉर्डिंग, स्क्रीनशॉटचा पुढे पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो. अशा प्रकारची घटना तुमच्यासोबत घडल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात जावे आणि अधिक चौकशी करावी.