प्रतिजैविकांचा (अँटी-बायोटिक्स) वापर मागील काही काळात वाढल्याने त्यांना प्रतिरोध (रेझिस्टन्स) निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक प्रतिजैविके रुग्णांवर निष्प्रभ ठरतात. रुग्णाला गंभीर प्रकारचा जीवाणूसंसर्ग झाला असेल, तर त्यावर उपचार कसे करावयाचे, असा प्रश्न त्यामुळे डॉक्टरांसमोर उभा राहतो. अशा गुंतागुंतीच्या स्थितीत रुग्णाला वाचविण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करावे लागणे आणि उपचार खर्चात वाढ होणे, अशी समस्या निर्माण होते. आता या प्रतिरोधावर मात करणारे पहिले स्वदेशी बनावटीचे प्रतिजैविक तयार करण्यात आले आहे. यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह ही प्रतिजैविक प्रतिरोधाची समस्या असलेल्या रुग्णांसाठी ही आनंदाची बाब ठरणार आहे.
प्रतिरोध म्हणजे काय?
एखाद्या रोगाचा संसर्ग झाल्यानंतर सध्या उपलब्ध असलेल्या औषधाला या रोगाचे जीवाणू, विषाणू अथवा घटक दाद देत नाहीत, या स्थितीला प्रतिरोध किंवा रेझिस्टन्स म्हणतात. डॉक्टरांकडून रुग्णाला औषधे दिली जातात. त्या औषधाला रुग्णात प्रतिरोध निर्माण झालेला असेल तर हे उपचार कुचकामी ठरतात. त्यातून आजाराचा कालावधी आणि तीव्रता वाढते. यातून रुग्ण दगावण्याचा धोका निर्माण होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, प्रतिरोध हा जगातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला निर्माण झालेला धोका आहे. हा प्रतिरोध जगभरात २०१९ मध्ये प्रत्यक्षपणे १२.७ लाख जणांच्या मृत्यूस तर अप्रत्यक्षपणे ४९.५ लाख जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. प्रतिजैविक प्रतिरोधाचा मोठा आर्थिक भार जगावर पडत आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, प्रतिरोधामुळे २०५० पर्यंत आरोग्य खर्चात अतिरिक्त १ लाख कोटी डॉलरची भर पडेल. याचबरोबर २०३० पर्यंत जागतिक जीडीपीला दरवर्षी १ ते ३.४ लाख कोटी डॉलरचा फटका बसेल.
हेही वाचा : विश्लेषण : भारताचा दोम्माराजू गुकेश बुद्धिबळ जगज्जेता कसा बनला? पाच निर्णायक मुद्दे…
नवे औषध कोणते?
मुंबईस्थित एका कंपनीने नॅफिथ्रोमायसिन हे विविध औषधांच्या प्रतिरोधावरील औषध तयार केले आहे. यासाठी केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिलने (बीआयआरएसी) पाठबळ दिले आहे. हे औषध मिकनाफ या नावाने उपलब्ध होणार आहे. केंद्रीय औषधे मानके व नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) या नियामकाने औषधाच्या उत्पादन व विपणनास मंजुरी दिली आहे. आता भारतीय औषध महानियंत्रकांनी हिरवा कंदील दिल्यानंतर हे औषध बाजारात दाखल होईल.
विकसित कसे केले?
नॅफिथ्रोमायसिन हे औषध विकसित करण्यास सुमारे १४ वर्षांचा कालावधी लागला. भारतात या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण होण्याआधी अमेरिका आणि युरोपमध्ये अनेक टप्प्यांतील चाचण्या पूर्ण झाल्या होत्या. नॉव्हेल लॅक्टोन केटोलाईड अथवा सेमिसिथेंटिक मॅक्रोलाइड प्रतिजैविक वर्गातील नॅफिथ्रोमायसिन आहे. या औषधाची रचना दिवसातून एकदा आणि तीन दिवसांच्या कालावधीसाठी अशा पद्धतीने केली आहे. त्यामुळे ते दीर्घ काळ फुप्फुसात राहते. अझीथ्रोमायसिनपेक्षा हे औषध दहापट प्रभावी आहे. हे औषध प्रभावी असण्यासोबतच ते अधिक सुरक्षितही आहे. याचबरोबर त्याचे दुष्परिणामही कमी आहेत.
हेही वाचा : विश्लेषण : रब्बी हंगामात डीएपी खताची टंचाई?
चाचण्यांचे निष्कर्ष काय?
कम्युनिटी ॲक्वायर्ड न्यूमोनिया (निरोगी व्यक्तींमध्ये आढळून येणारा) हा श्वसनमार्गाच्या खालच्या भागाला होणारा संसर्ग आहे. तो प्रामुख्याने लहान मुले आणि वृद्धांमध्ये आढळतो. मधुमेह आणि कर्करोगासारखे विकार असलेल्या व्यक्तींना हा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात अशा न्यूमोनियावरील उपाचारात है औषध ९७ टक्के प्रभावी आढळून आले. संबंधित कंपनी आणि सरकारने दिलेल्या तपशिलानुसार, या औषधामुळे तीन दिवसांत अशा न्यूमोनियावर मात करता येते. जगभरात या न्यूमोनियामुळे दर वर्षी २४ लाख मृत्यू होतात.
समस्या किती गंभीर?
जगातील एकूण कम्युनिटी न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येपैकी २३ टक्के रुग्ण भारतात आढळतात. देशात दर वर्षी या न्यूमोनियाचे ४० लाख रुग्ण आढळून येतात. त्यात मृत्यूदर १४ ते ३० टक्के आहे. अशा प्रकारच्या संसर्गावर प्रामुख्याने अझिथ्रोमायसिन हे प्रतिजैविक वापरले जाते. या औषधाच्या अतिवापरामुळे त्याचा प्रतिरोध वाढला आहे. यामुळे कम्युनिटी न्यूमोनियाच्या रुग्णांपैकी २० ते ३० टक्के रुग्णांना तोंडावाटे दिलेली प्रतिजैविके परिणामकारक ठरत नाहीत. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आणि त्यांच्या शरीरात लशीवाटे औषधे देण्याचा पर्याय स्वीकारावा लागतो. आता या नवीन औषधामुळे प्रतिजैविक प्रतिरोध असलेल्या रुग्णांसाठी सहजपणे आणि रुग्णालयात दाखल न होता उपचार घेण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
sanjay.jadhav@expressindia.com