लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोक पर्यटनाकरिता जात आहेत. विमानतळ खचाखच भरले आहेत. परंतु, आता विमान प्रवास करण्याअगोदर बदललेले नियम काय ते समजून घेणे आवश्यक आहे. ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने बुधवारी सुरक्षा प्रणाली सुव्यवस्थित करण्यासाठी हॅण्ड बॅगसंबंधीचे नवीन नियम सादर केले. विमानतळ अधिक व्यग्र होत असल्याने आणि प्रवाशांची वाढती संख्येचे व्यवस्थापन आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जात आहेत. ती मार्गदर्शक तत्वे काय आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.
नवीन हॅण्ड बॅगेज नियम
नवीन नियमांनुसार, प्रवाशांना प्रत्येक विमानामध्ये सामान स्वरूपात फक्त एक वस्तू नेण्याची परवानगी आहे. ही बाब देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लागू आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त बॅग घेऊन जात असल्यास तुम्हाला अतिरिक्त पैसे भरावे लागतील. तुमच्या प्रवासाच्या वर्गाच्या आधारावर हॅण्ड बॅगेजसाठी वजनाचे निर्बंध वेगवेगळे असतात. इकॉनॉमी आणि प्रीमियम इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांसाठी सात किलोपर्यंतची एक हॅण्ड बॅग आणि फर्स्ट क्लास व बिझनेस क्लासमधील प्रवाशांसाठी १० किलोपर्यंतच्या वजनाची परवानगी आहे.
याव्यतिरिक्त हॅण्ड बॅगेजच्या आकारावरही कठोर निर्बंध आहेत. ५५ सेंटिमीटर (२१.६ इंच) उंची, ४० सेंटिमीटर (१५.७ इंच) लांबी व २० सेंटिमीटर (७.८ इंच) रुंदी, अशी बॅगेसाठी कमाल परिमाणे आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही समस्या टाळण्यासाठी बॅग या मर्यादेत बसते का याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. विमान प्रवासाच्या वाढीमुळे विशेषत: भारतात, विमानतळावरील गर्दीमुळे सुरक्षा तपासणीस विलंब झाला आहे.
कोणत्या प्रवाशांना नियमातून सूट?
ज्या प्रवाशांनी २ मे २०२४ पूर्वी तिकीट बुक केले होते, त्यांना हॅण्डबॅग वजनाच्या सुधारित नियमांतून सूट देण्यात आली आहे. या प्रवाशांना काही सवलती लागू होतात. या सवलतींनुसार इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांना आठ किलोग्रामपर्यंत, प्रीमियम इकॉनॉमीमध्ये १० किलोग्रामपर्यंत आणि प्रथम व बिझनेस क्लासमध्ये १२ किलोग्रामपर्यंत वजन नेण्याची परवानगी आहे. सामानासंबंधीचे सुधारित नियम २ मे २०२४ नंतर खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू होतील. प्रवासी वर्ग कोणताही असो, त्यांना नवीन निर्बंध लागू होतील. नवीन नियमांचे पालन करण्यासाठी इंडिगो आणि एअर इंडियासारख्या विमान कंपन्यांनीही त्यांच्या बॅगेज धोरणात सुधारणा केली आहे.
देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी नवीन वाय-फाय नियम
भारत सरकारने गेल्या महिन्यात नवीन नियम जारी केले, जे देशांतर्गत विमान प्रवासासाठी इंटरनेट सेवा वापरण्याबाबत नियमन करतात. नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार विमान जमिनीपासून ३,००० मीटर किंवा सुमारे ९,८४३ फूट उंचीपर्यंत पोहोचेपर्यंतच प्रवाशांना वाय-फाय आणि इतर इंटरनेट सेवा वापरण्याची परवानगी असेल. प्रवाशांच्या सोई आणि हवाई ऑपरेशनची सुरक्षितता यांच्यात समतोल राखणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे. या नियमांमुळे विमानातील इंटरनेट सेवांचा वापर वाढत आहे.
विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ
काही महिन्यांपासून विमान कंपन्यांच्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हवाई प्रवासाच्या वाढत्या मागणीमुळे, भारतीय विमान कंपन्यांनी नोव्हेंबरमध्ये देशांतर्गत मार्गांवर १.४२ कोटी प्रवाशांची वाहतूक केली, जी मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत सुमारे १२ टक्के अधिक आहे. “जानेवारी-नोव्हेंबर २०२४ या कालावधीत देशांतर्गत विमान सेवेद्वारे १,४६४.०२ लाख प्रवाशांची वाहतूक झाली. मागील वर्षाच्या याच कालावधीत १,३८२.३४ लाख प्रवाशांची वाहतूक झाली होती. एकंदरीत प्रवाशांच्या वाहतुकीत वार्षिक ५.९१ टक्के आणि मासिक ११.९० टक्के इतकी वाढ नोंदवली गेली,” अशी नोंदणीकृत माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) देण्यात आली आहे.
हेही वाचा : दोन लाखांहून अधिक जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ विध्वंसाने त्सुनामीचा पूर्वइशारा देणारी प्रणाली कशी बदलली?
देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एअरलाइन्स त्यांच्या ताफ्याचा विस्तार करीत आहे. कारण- अधिकतर लोक मध्यमवर्गात सामील होतात आणि त्यांना अधिक आर्थिक स्वातंत्र्य मिळते. ‘Cirium’च्या २०२४ फ्लीट अंदाजानुसार देशातील प्रवासी विमानांचा ताफा २०२३ मधील ७२० विमानांवरून २०४३ मध्ये ३,८०० विमानांपर्यंत वाढेल.