काम सोपे व्हावे आणि लवकर व्हावे म्हणून आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक मॉडर्न गोष्टींचा समावेश करतो. त्यातच मायक्रोवेव्हचेही नाव येते. पूर्वी लोक चुलीवर स्वयंपाक करायचे. जसजसा काळ बदलत गेला तसतशी चुलीची जागा गॅसने घेतली आणि आता बदलती जीवनशैली अन् धावपळीचे आयुष्य पाहता अनेक स्वयंपाकघरात गॅसची जागा मायक्रोवेव्ह घेताना दिसत आहे. मायक्रोवेव्हमुळे स्वयंपाक जरी सोपा झाला असला, तरी कुठे ना कुठे यासंबंधित अशा अनेक बाबी आहेत; ज्यामुळे आरोग्यासंबंधित धोका वाढत आहे आणि हे आपल्या नकळत घडत आहे. कारण अनेकदा आपण याविषयी जागरूक नसतो. अलीकडील अभ्यासातही अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मायक्रोवेव्हमुळे खरंच घातक आजार होऊ शकतो का? त्याविषयीच्या संशोधनात नेमके काय आढळून आले? याविषयी जाणून घेऊ.
अभ्यास काय सांगतो?
स्पेनमधील संशोधकांनी केलेला अभ्यास ‘फ्रंटियर्स इन मायक्रोबायोलॉजी’मध्ये प्रकाशित झाला. या अभ्यासात संशोधकांनी घरे, कार्यालये आणि अगदी प्रयोगशाळांमधील मायक्रोवेव्हची तपासणी केली. त्यांच्या संशोधनात मायक्रोवेव्हमध्ये मोठ्या संख्येत जीवाणू (बॅक्टेरिया) असल्याचे आढळून आले. हे जीवाणू मायक्रोवेव्हच्या कमाल तापमानात, किरणोत्सर्ग आणि कोरडेपणा यांच्याशी जुळवून घेत आहेत, त्यामुळे लोकांना सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी या अभ्यासात सांगितले आहे.
“आमच्या निकालातून असे दिसून आले आहे की, घरगुती मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाकघरातील ओट्याप्रमाणेच मोठ्या संख्येत जीवाणू आढळून येतात. तर प्रयोगशाळेतील मायक्रोवेव्हमध्ये असणारे जीवाणू किरणोत्सर्गास अधिक प्रतिरोधक असतात,” असे अभ्यासाचे लेखक आणि स्पेनमधील डार्विन बायोप्रोस्पेक्टिंग एक्सलन्स एसएलचे संशोधक डॅनियल टोरेंट यांनी सांगितले. टोरेंट म्हणाले, “घरगुती मायक्रोवेव्हमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंच्या काही प्रजाती, जसे की क्लेब्सिएला, एन्टरोकोकस आणि एरोमोनास या मानवी आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकतात.
संशोधन कसे करण्यात आले?
मानवनिर्मित वातावरण, सागरी तेल गळती आणि अगदी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या आतही वाढण्यास या जीवाणूंनी स्वतःला अनुकूल केले आहे. या अभ्यासात, संशोधकांना विशेषतः गरम मायक्रोवेव्ह जीवाणूंची उपस्थिती असते की नाही हे तपासायचे होते. संशोधकांनी ३० मायक्रोवेव्हमधून सूक्ष्मजीवशास्त्रीय नमुने गोळा केले. यात १० घरे, १० कार्यालये किंवा कॅफेटेरियासारख्या आणि १० प्रयोगशाळांमधील मायक्रोवेव्हचा समावेश होता. या तपासात संशोधकांना एकूण ७४७ प्रकारचे जीवाणू आढळून आले. यापैकी फर्मिक्युट्स, ॲक्टिनोबॅक्टेरिया आणि प्रोटीओबॅक्टेरिया या जीवाणूंची संख्या सर्वात जास्त आढळून आली.
हेही वाचा : न्यूयॉर्क शहरापेक्षा पाचपट मोठा हिमखंड फिरतोय एकाच जागेवर; समुद्रतटीय शहरांना धोका?
आरोग्यासाठी किती घातक?
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, क्लेबसिएला हा एक प्रकारचा असा जीवाणू आहे; ज्यामुळे हेल्थकेअर असोसिएट इन्फेक्शन (HAIs) होऊ शकते. यात न्यूमोनिया, रक्तप्रवाहात जिवाणू शिरल्यास विविध आजार, संसर्ग, जखम किंवा शस्त्रक्रियेवर संसर्ग आणि मेंदूज्वर होऊ शकतो. तर, यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, एन्टरोकोकस या जीवाणूमुळे मूत्रमार्गातील संसर्गासह अनेक आजार होण्याची शक्यता असते. रॉडच्या आकाराच्या एरोमोनास या जीवाणूमुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन, किडनी रोग, सेल्युलायटिस आणि मेंदूज्वरसारखे आजार होऊ शकतात.
© IE Online Media Services (P) Ltd