न्यूझीलंडमधील नागरिक मोठ्या संख्येने देश सोडून जात आहेत. एका नवीन आकडेवारीमध्ये न्यूझीलंडमधील स्थलांतरित नागरिकांचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. ‘स्टॅट्स एनझेड’च्या नवीन आकडेवारीनुसार २०२४ मध्ये एप्रिल महिन्यापर्यंत ५६,५०० नागरिक देश सोडून परदेशात स्थायिक झाले आहेत. मार्च महिन्यापर्यंत हा आकडा ५२ हजार होता. आतापर्यंत एकूण ८१,२०० न्यूझीलंडच्या नागरिकांनी स्थलांतर केले असून मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा ४१ टक्क्यांनी वाढला आहे. २०१२ मधील ७२,४०० नागरिकांच्या स्थलांतरानंतरचा हा विक्रमी आकडा आहे. परंतु, न्यूझीलंडमधील नागरिक देश सोडून जाण्यामागील कारण काय? याविषयी जाणून घेऊ या.
न्यूझीलंडच्या नागरिकांचे ऑस्ट्रेलियात स्थलांतर
‘स्टॅट्स एनझेड’च्या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०२३ पर्यंत २४,२०० नागरिकांनी ऑस्ट्रेलियात स्थलांतर केले होते. नागरिक ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरित होत असल्याची ही काही पहिली वेळ नाही. गेल्या अनेक काळापासून न्यूझीलंडचे नागरिक ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक होत आहेत. २००४ ते २०१३ दरम्यान वार्षिक सरासरी ३० हजार आणि २०१४ ते २०१९ दरम्यान वार्षिक सरासरी ३ हजार नागरिकांनी ऑस्ट्रेलियात स्थलांतर केले. परंतु, या वर्षी देश सोडून जाणार्या नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
हेही वाचा : कुवेतमधील आग दुर्घटनेचे कारण काय? मोदी सरकार पीडित भारतीय कुटुंबियांची कशी मदत करत आहे?
न्यूझीलंडमधील नागरिक देश सोडून जाण्यामागील कारण काय?
न्यूझीलंडमधील लोकांना परदेशात संधी शोधण्यासाठी अनेक घटक प्रवृत्त करत आहेत. वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ मार्क स्मिथ यांनी सांगितले की, आर्थिक परिस्थिती आणि परदेशातील चांगल्या संधींचे आकर्षण असल्यामुळे लोक देश सोडत आहेत. इन्फोमेट्रिक्सचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ ब्रॅड ओल्सन यांनी स्थलांतराची दोन कारणे स्पष्ट केली. ते म्हणाले, “अनेक तरुण परदेशी अनुभवासाठी आणि तेथील राहणीमानाच्या आकर्षणामुळे देश सोडत आहेत. न्यूझीलंडमधील बरेच लोक चांगल्या राहणीमानाच्या शोधात आहेत. घराच्या परवडणार्या किमती आणि नोकरीच्या संधींमुळे लोक परदेशात जाय असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत असल्याने, त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
न्यूझीलंडमध्ये येणार्या परदेशी नागरिकांची संख्या वाढली?
न्यूझीलंडमधील नागरिक देश सोडून जात असले, तरी न्यूझीलंडमध्ये इतर देशातील नागरिक स्थलांतर करत आहेत. एप्रिल २०२४ या वर्षात, न्यूझीलंडमध्ये ९८,५०० लोक स्थलांतरित झाले आहेत. न्यूझीलंडमध्ये स्थलांतरित होणार्यांमध्ये भारतीयांची संख्या सर्वात जास्त आहे. गेल्या वर्षात न्यूझीलंडमध्ये ४८ हजार भारतीय नागरिक, ३०,३०० फिलीपाइन्स नागरिक, २५,७०० चिनी नागरिक, फिजी येथील १०,४०० नागरिकांचा समावेश आहे.
‘वेस्टपॅक’चे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ मायकेल गॉर्डन यांनी नमूद केले की, कोविडपूर्व काळात न्यूझीलंडमध्ये येणार्या परदेशी नागरिकांची संख्या जास्त होती. २०२२ च्या सुरुवातीपासून न्यूझीलंडमधील नागरिकांच्या स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे, असेही त्यांनी सांगितले. नोकरीच्या संधी नसल्यामुळे ही परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे.
हेही वाचा : सरकारचा मोठा निर्णय; विशिष्ट सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीवर घातली बंदी, कारण काय?
स्थलांतर कशावर अवलंबून असते?
न्यूझीलंडचे नागरिक मोठ्या प्रमाणात देश सोडून जात आहेत, जे अर्थशास्त्रज्ञ आणि धोरणकर्त्यांमधील चिंतेचे कारण ठरत आहे. ‘स्टॅट्स एनझेड’चे लोकसंख्या निर्देशक व्यवस्थापक तेहसीन इस्लाम यांनी नमूद केले, “ऐतिहासिकदृष्ट्या, स्थलांतरातील बदल सामान्यत: आर्थिक आणि कामगार बाजार परिस्थितीवर अवलंबून असतात.”
न्यूझीलंडचे तत्कालीन पंतप्रधान क्रिस हिपकिंस यांनी गेल्या वर्षी, महागाईच्या संकटावर आणि वाढत्या जीवनावश्यक खर्चाच्या सरकारी सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्याचे वचन दिले होते. परंतु, डिसेंबर २०२२ मध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीत ११.३ टक्क्यांनी वाढ झाली. ही तीन दशकांमधली सर्वाधिक वाढ होती. तसेच इतर आर्थिक आव्हानांमुळेही लोक चांगल्या नोकरीच्या शोधात परदेशात जात असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. लोक देश सोडून जात असल्याचे मुख्य कारण महागाई आहे.