गुरुवारी न्यूझीलंडच्या संसदेत एक अभूतपूर्व गोष्ट घडली. माओरी आदिवासी समुदायातील खासदारांनी एका विधेयकाच्या विरोधात त्यांचा विरोध व्यक्त करण्यासाठी संसदेत पारंपरिक नृत्य सादर केले. जेव्हा संसदेतील अध्यक्षांनी तरुण महिला खासदार हाना-राविती मायपी-क्लार्क यांना विचारले की, त्यांचा पक्ष वैतांगी विधेयकाच्या कराराच्या तत्त्वांवर कसे मतदान करील, तेव्हा २२ वर्षीय महिला खासदार मायपी-क्लार्क यांनी उभे राहून विधेयकाची प्रत फाडली आणि पारंपरिक हाका नृत्य करण्यास सुरुवात केली. संसदेतील वरील मजल्यावर असणाऱ्या इतर विरोधी नेत्यांनीही त्यांना साथ देत हाका नृत्य करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष गेरी ब्राउनली यांनी अधिवेशन तात्पुरते स्थगित केले. गेल्या वर्षी निवडून आलेल्या मायपी-क्लार्कला तिच्या निषेधासाठी निलंबितही करण्यात आले होते. न्यूझीलंडमधील माओरी कोण आहेत? पारंपरिक हाका नृत्य काय आहे? निषेध करण्यात येणाऱ्या विधेयकात काय? कोण आहेत हाना-राविती मायपी-क्लार्क? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूझीलंडमधील माओरी कोण आहेत?

माओरी हे शतकानुशतके न्यूझीलंडच्या स्थानिक जमातीशी संबंधित आहेत. माओरी मोठ्या सागरी मार्गाने येऊन पॉलिनेशिया आणि न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. त्यांच्या संस्कृतीचा जमीन आणि पूर्वजांच्या आत्म्यांशी सखोल संबंध आहे. ते रेओ माओरी म्हणून ओळखली जाणारी माओरी भाषा बोलतात. हा त्यांच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आजही अनेक माओरी लोक ही भाषा बोलतात. माओरी लोकांचा निसर्ग आणि भूमीशी खोल आध्यात्मिक संबंध आहे. ते स्वत:ला नैसर्गिक साधनसंपत्तीचे ‘कैतीकी’ (संरक्षक) म्हणवतात. ते ‘व्हकापापा’ या संकल्पनेवर विश्वास ठेवतात. त्याचा अर्थ जगातील प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे, असा होतो. माओरी संस्कृतीत पूर्वजांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि त्यांच्या कथा व परंपरा पिढ्यान् पिढ्या पुढे जात आहेत.

हेही वाचा : रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?

न्यूझीलंडच्या ५.३ दशलक्ष लोकांपैकी अंदाजे २० टक्के लोक माओरी समुदायाचे आहेत. त्यांना भौतिक त्रास सहन करावा लागतो, त्यांची आरोग्याची स्थिती खराब असते आणि त्यांना इतर समुदायांच्या तुलनेत जास्त तुरुंगवास भोगावा लागतो. न्यूझीलंडमध्ये सहा प्रमुख वांशिक गट आहेत. त्यात युरोपियन, माओरी, पॅसिफिक लोक, आशियाई, MELAA (मध्य पूर्व / लॅटिन अमेरिकन / आफ्रिकन) व २०१८ च्या जनगणनेनुसार इतर वांशिक या गटांचा समावेश आहे.

पारंपरिक हाका नृत्य काय आहे?

हाका नृत्याला युद्धनृत्य म्हणूनही संबोधले जाते. या युद्धनृत्याला सांस्कृतिक महत्त्व आहे. हाका हा नृत्यप्रकार शक्तिशाली हालचाली, स्वर मंत्र आणि चेहऱ्यावरील तीव्र भावांसह सादर केला जातो. ‘tribes.world’नुसार भावना व्यक्त करणे, संदेश देणे आणि अभ्यागतांचे स्वागत करणे यांसाठी हे नृत्य सादर केले जाते. नृत्य हे माओरी जमातीसाठी एकता आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. वसाहतवाद आणि इतिहासातील अनेक आव्हानांना तोंड देत असूनही, माओरी न्यूझीलंडच्या समाजाचा अविभाज्य भाग आहेत.

वैतांगीचा करार कशासाठी आहे? माओरी त्यासाठी का लढत आहेत?

१८४० मध्ये ब्रिटिश राजवट आणि ५०० ​​हून अधिक माओरी प्रमुख यांच्यात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या आणि हा न्यूझीलंडचा संस्थापकीय दस्तऐवज मानला जातो. त्यात दोन्ही पक्षांमधील शासनाच्या अटी निश्चित केल्या गेल्या आहेत. त्याची कलमे आजही न्यूझीलंडचे कायदे आणि धोरणांवर प्रभाव टाकत आहेत. न्यूझीलंडमधील ‘ॲक्ट’ नावाच्या राजकीय पक्षाने गेल्या आठवड्यात हे विधेयक सादर केले. त्यात सर्वांसाठी समान हक्क हवेत, असे नमूद करीत कराराच्या तत्त्वांना कमी लेखले गेले आहे. पक्षाचा असा युक्तिवाद आहे की, माओरी अधिकार आणि प्रशासन यांना प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेल्या धोरणांमुळे गैर-माओरी नागरिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आधीच देशात जातीय तणाव निर्माण झाला आहे.

विधेयकावर निषेध

आंदोलकांनी नऊ दिवसांसाठी हिकोई (मोर्चा)चा भाग म्हणून पारंपरिक पोशाख परिधान केला. माओरी ध्वज फडकवणाऱ्या आणि समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या जमावाने त्यांची भेट घेतली. देशाच्या १८४ वर्षांपूर्वी जुन्या संस्थापकीय दस्तऐवजाची पुनर्व्याख्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वादग्रस्त विधेयकाचा निषेध करण्यासाठी या आठवड्यात वेलिंग्टनच्या दिशेने निघालेल्या हिकोई यात्रेमध्ये हजारो लोक सहभागी झाले.

मायपी-क्लार्क स्वतःला माओरी लोकांच्या संरक्षक मानतात आणि त्या न्यूझीलंडमधील तरुण पिढीच्या मतदारांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करतात. (छायाचित्र-एपी)

हेही वाचा : एलॉन मस्क मंगळावर पोहोचवणार इंटरनेट सेवा? कारण काय? त्याचा फायदा कोणाला?

हाना-रावती मायपी-क्लार्क कोण आहेत?

मायपी-क्लार्क स्वतःला माओरी लोकांच्या संरक्षक मानतात आणि त्या न्यूझीलंडमधील तरुण पिढीच्या मतदारांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करतात. २०२३ मध्ये त्यांच्या निवडीनंतर त्यांनी आपल्या संसदीय भाषणाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. त्यांनी आपल्या पहिल्या संसदीय भाषणादरम्यान पारंपरिक हाका नृत्य सादर केले होते. मायपी-क्लार्क आणि त्यांचे वडील दोघेही निवडणुकीत माओरीचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार मानले जात होते. अखेरीस मायपी-क्लार्क यांना त्यांच्या तरुण दृष्टिकोनासाठी निवडण्यात आले. विशेष म्हणजे मायपी-क्लार्क यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन आणि त्यांच्या पुराणमतवादी सरकारवर टीका केली आहे. मायपी-क्लार्क हवामान बदलाशी निगडित समस्यांचा सामना करण्यासाठी स्वदेशी ज्ञान आणि पद्धतींचा समावेश करण्यासदेखील समर्थन देतात. याबाबत त्यांना त्यांचे आजोबा माओरी कार्यकर्ता गट ‘Nga Tamatoa’चे सदस्य तैतीमू मायपी यांच्याकडून प्रेरणा मिळाली असल्याचे त्या सांगतात. मायपी-क्लार्क या ऑकलंड आणि हॅमिल्टनदरम्यान वसलेल्या हंटली या छोट्या शहरातील रहिवासी आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand youngest mp and maori leaders protested in parliament with a war dance rac