२७ वर्षांनंतर भारत ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाणार आहे. स्पर्धेचे ७१ वे पर्व भारतात होणार असल्याचे मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने ८ जून रोजी जाहीर केले. भारतातील वैविध्यपूर्ण संपन्न संस्कृती, जागतिक वारसास्थळे आणि महिला सबलीकरणासाठी भारताने केलेले आटोकाट प्रयत्न याची माहिती जगभरात पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशी प्रतिक्रिया ‘मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन’ने दिली. ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा भारतात आयोजित करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी १९९६ साली बंगळुरु येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र या स्पर्धेमुळे त्या वेळी भारतात बराच गहजब झाला. तीव्र आंदोलने झाली. एका आंदोलकाचा आत्मदहन करीत असताना मृत्यू झाला. तर अमिताभ बच्चन यांचे फार मोठे नुकसान झाले. १९९६ साली या स्पर्धेला विरोध का झाला? याशिवाय ही स्पर्धाच केव्हा सुरू झाली, स्पर्धेचा आणि बिकनीचा काय संबंध? याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा काय आहे आणि कोण आयोजित करते?

‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा ही जगातील जुन्या स्पर्धांपैकी एक आहे. अमेरिकेच्या पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (PBS) या वेबसाइटच्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये १९५१ साली या स्पर्धेची सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्राचे पुनर्निर्माण करीत असताना ब्रिटिश सरकारने ब्रिटन महोत्सव आयोजित करण्याची कल्पना मांडली. या महोत्सवात देशाची औद्योगिक उत्पादने, नवे तांत्रिक शोध आणि कलांचे प्रदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महोत्सवाच्या आयोजकांनी मेक्का लिमिटेड या करमणूक कंपनीकडे महोत्सवाची प्रसिद्धी करण्याची जबाबदारी दिली. कंपनीचे प्रसिद्धी विभागाचे संचालक एरिक मोर्ले यांनी महोत्सवाच्या नियोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा घेण्याबाबत आयोजकांचे मन वळविले.

मोर्ले यांनी सौंदर्य स्पर्धेची आखणी केली. बिकनी परिधान केलेल्या महिला स्पर्धकांना परीक्षक गुण देतील, अशी रचना सुरुवातीला करण्यात आली. मात्र आयर्लंड आणि स्पेनने याचा विरोध केला. विरोधामुळे बिकनीऐवजी वनपिस बाथिंग सूटवर स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले. ब्रिटिश माध्यमांनी या स्पर्धेचा उल्लेख ‘मिस वर्ल्ड’ असा केला आणि वर्षागणिक स्पर्धेची लोकप्रियता वाढत गेली. टेलिव्हिजनच्या वाढत्या वापरामुळे स्पर्धेच्या लोकप्रियतेने एक नवे शिखर गाठले. ब्रिटनमध्ये सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणून स्पर्धेची गणना केली जाऊ लागली.

हे वाचा >> Video : प्रियांका चोप्राने ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला तेव्हा निक ७ वर्षांचा होता; खुद्द अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ क्षण

या वर्षी भारतात होत असलेल्या ७१ व्या पर्वात जगभरातील १३० देशांमधील स्पर्धक भारतात येणार आहेत. स्पर्धेच्या निकषानुसार स्पर्धा जिंकण्यासाठी सौंदर्यासोबतच अद्वितीय प्रतिभा, चातुर्य आणि मनात दयाभाव असणे आवश्यक आहे. स्पर्धकांना अतिशय कठोर अशा नियमावलीतून पदोपदी आपले कौशल्य दाखवीत पुढे जावे लागते. विविध क्रीडा प्रकार, चॅरिटेबल इव्हेंटमध्ये सहभागी होऊन आपल्या हुशारीची चुणूक स्पर्धकांना दाखवावी लागते. नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या अंतिम फेरीआधी तब्बल एक महिना स्पर्धा चालणार आहे. प्राथमिक फेऱ्यांमध्ये यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांचा अंतिम फेरीत समावेश केला जातो.

१९९६ साली भारतात काय झाले?

१९९१ नंतर भारताने नवे आर्थिक धोरण आत्मसात करून अमलात आणले. उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली. यामुळे मोठ्या संख्येने परदेशी व्यापार आणि कंपन्या भारतात येऊ लागल्या. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतातील मोठी बाजारपेठ खुणावत होती. त्यातच १९९४ साली ‘मिस वर्ल्ड’ आणि ‘मिस युनिव्हर्स’ हे खिताब दोन भारतीय महिलांनी पटकाविले. ऐश्वर्या राय ‘मिस वर्ल्ड’ तर सुश्मिता सेन ‘मिस युनिव्हर्स’ झाली. यामुळे अशा सौंदर्य स्पर्धांना भारताच्या अनेक भागांत लोकप्रियता मिळू लागली होती.

इंडियाना विद्यापीठातील मीडिया स्कूल आणि ॲकॅडमी विभागाच्या प्राचार्या राधिका परमेस्वरम यांनी भारतात १९९६ साली आयोजित केलेल्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेवर संशोधन करून जर्नल लिहिले आहे. ‘ग्लोबल मीडिया इव्हेंट्स इन इंडिया: कॉटेंस्ट ओव्हर ब्युटी, जेंडर ॲण्ड नेशन’ या अहवालात राधिका यांनी सांगितले की, सौंदर्य स्पर्धेला साबण आणि सौंदर्य प्रसाधन उत्पादक कंपन्या आणि क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्या प्रयोजक म्हणून लाभल्या होत्या. मात्र स्पर्धेचे भारतात आयोजन करण्याच्या कल्पनेला बराच राजकीय आणि सामाजिक आघाड्यांवर विरोध झाला. अमिताभ बच्चन यांच्या ‘अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड’ (ABCL) या कंपनीकडे स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात होती. या स्पर्धेच्या आयोजनानंतर एबीसीएल कंपनीला मोठा आर्थिक तोटा झाला आणि कंपनी गाळात रुतली.

हे ही वाचा >> ऐश्वर्या रायनेही केलेली बिकिनी बंदीची मागणी; म्हणालेली, “रॅम्पवर बिकिनी घालणं….”

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेला बंगळुरु आणि देशभरात मोठा विरोध झाला. आत्मदहन करण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली. या स्पर्धेमुळे महिला आणि हिंदू संस्कृतीचे अधःपतन होत असून पाश्चिमात्य अधोगतीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाल्याचा आरोप स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी केला. उजव्या विचारसरणीच्या संघटनांनीदेखील स्पर्धेवर खरपूस टीका केली. परीक्षकांचे मत मिळवण्यासाठी महिलांनी आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करणे ही पाश्चिमात्य संकल्पना आत्मसात केल्यामुळे भारतीय संस्कृतीचा नाश होईल, असा युक्तिवाद या संघटनांकडून करण्यात आला. डाव्या पक्षांनीही स्पर्धला विरोध केला. ही स्पर्धा जागतिकीकरणाचा ओढा भारतात आणत असून भारतीय महिला आणि कामगार यांना वेठीस धरत असल्याचा आरोप त्यांनी लावला. तसेच ‘मिस वर्ल्ड’ ऐवजी गरिबी आणि महिला सबलीकरण अशा महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.

राधिका आपल्या जर्नलमध्ये लिहितात, महिला जागरण समिती, महिला जागृती, विमोचन, ‘ऑल इंडिया वुमन्स डेमोक्रॅटिक फोरम’ आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या महिला सदस्यांनी विरोध दर्शविल्यामुळे देशी आणि विदेशी माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. माध्यमांकडून प्रसिद्धी मिळाल्यानंतर ऑल ‘इंडिया वुमन्स डेमोक्रॅटिक फोरम’ने ‘मिस वर्ल्ड’चा विरोध करण्यासाठी उपरोधिक प्रतिस्पर्धा घेतली. या स्पर्धेत मिस पॉव्हर्टी (गरिबी), मिस होमलेस (बेघर), मिस लॅण्डलेस (शेतजमीन नसलेले) असे पुरस्कार देऊन त्यांच्या डोक्यावर मुकुट चढविण्यात आला. या उपहासात्मक प्रतिस्पर्धेलाही त्या वेळी बरीच प्रसिद्धी मिळाली. अनेक वृत्तवाहिन्यांनी आणि वृत्तपत्रांनी या आगळ्यावेगळ्या स्पर्धेची दखल घेतली.

या सगळ्या विरोधानंतर आणि एका आंदोलकाचा आत्मदहनात मृत्यू झाल्यानंतरही भारतातील ही स्पर्धा पार पडली. ग्रीसमधील १८ वर्षीय मॉडेल इरिना स्क्लिव्हाला ‘मिस वर्ल्ड’ होण्याचा मान मिळाला.

यंदाच्या स्पर्धेत भारताकडून नंदिनी गुप्ता

‘मिस वर्ल्ड’च्या खिताबासाठी भारताकडून नंदिनी गुप्ता आपले नशीब अजमावणार आहे. १९ वर्षीय नंदिनी गुप्ता राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी आहे. याच वर्षी ‘मिस इंडिया’चा खिताब तिने जिंकला. नंदिनी सध्या मुंबईतील महाविद्यालयात व्यवसाय व्यवस्थापन विषयाचा अभ्यास करीत आहे.

‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत आतापर्यंत सहा भारतीय महिलांनी विजय मिळवला आहे. सर्वात पहिल्यांदा १९६६ साली रिटा फारिया यांनी विजय मिळवला. त्यानंतर १९९४ ऐश्वर्या राय, १९९७ डायना हेडन, १९९९ युक्ता मुखी, २००० प्रियंका चोप्रा आणि २०१७ साली मानुषी छिल्लर यांनी हा खिताब पटकावला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Next miss world contest to be held in india recalling why protests accompanied indias 1996 and amitabh bacchan abcl loss kvg