प्रकाश प्रदूषणाच्या अतिरेकाने रात्रीचा नैसर्गिक प्रकाश कृत्रिम प्रकाशासमोर हरवत चालला आहे. प्रकाश प्रदूषणाविषयी फार कमी लोक जागरूक आहेत. झाडे, वनस्पती, प्राणी आणि मानवजातीच्या आरोग्यावर या कृत्रिम प्रकाशाचा विपरीत परिणाम होत आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. आता संशोधकांची नवीन माहिती समोर आली आहे; ज्यात कृत्रिम प्रकाशामुळे अल्झायमर रोगाचा धोका वाढत चालला आहे.
अमेरिकेतील संशोधकांना रात्रीच्या वेळी होणारे प्रकाश प्रदूषण आणि अल्झायमर रोगाचा (स्मृतिभ्रंश) प्रादुर्भाव यांच्यातील संबंध आढळून आला आहे. शिकागोच्या रश युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे संशोधक रॉबिन वोइट, बिचुन ओउयांग व अली केशवार्जियन यांनी शुक्रवारी फ्रंटियर्स इन न्यूरोसायन्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात लिहिले आहे, “रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाचा संपर्क हा एक पर्यावरणीय घटक आहे, जो अल्झायमरवर परिणाम करू शकतो.” प्रकाश प्रदूषण म्हणजे काय? त्याचा मानवी शरीरावर नक्की काय परिणाम होतो? याविषयी जाणून घेऊ.
हेही वाचा : शनी ग्रहाच्या विलोभनीय कडा मार्च २०२५ मध्ये होणार अदृश्य? कारण काय?
अल्झायमर आणि प्रकाश प्रदूषण
अल्झायमर हा मज्जातंतूला हानी पोहोचवणारा आजार आहे; ज्यामध्ये संज्ञानात्मक कार्यक्षमतेचे नुकसान होते आणि स्मृतिभ्रंश होतो. त्यात मेंदूमध्ये प्लेक्स आणि गुंता तयार होतो. हा आजार प्रामुख्याने व्यक्तीची स्मृती, आकलनशक्ती व दैनंदिन कार्यावर परिणाम करतो. वाढत्या वयात या आजाराचा धोका सर्वाधिक असतो. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये माणसाला विस्मरण होते आणि जसजसा आजार वाढत जातो, तसतसे रुग्ण अधिक गोंधळू लागतात. अगदी सोप्या कार्यांचे नियोजन करण्यात आणि ते पूर्ण करण्यात त्यांना अडचणी येऊ लागतात.
२०२३ च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अंदाजानुसार, जगभरात ५५ दशलक्षांहून अधिक लोक स्मृतिभ्रंशाने ग्रस्त आहे. त्यापैकी सुमारे ७५ टक्के प्रकरणांमध्ये अल्झायमर हा आजार कारणीभूत आहे. तीन ते नऊ दशलक्ष भारतीय या आजाराने ग्रस्त असल्याचे मानले जाते आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नवीनतम औषधे या आजाराचे प्रमाण कमी करू शकत असली तरी यावर अद्याप कोणताही उपचार उपलब्ध नाही.
प्रकाश प्रदूषण
प्रकाश प्रदूषण म्हणजेच कृत्रिम प्रकाशाचे अतिक्रमण, असे म्हणता येईल. इमारतीच्या खिडक्यांमधील प्रकाश, रस्त्यावरील दिवे, गाड्यांचे हेडलाइट्स, विशिष्ट प्रकाश प्रणालींचा वापर यांमुळे प्रकाश प्रदूषणात वाढ होत आहे. गाव-खेड्यांच्या तुलनेत शहरात याचे प्रमाण जास्त आहे. आज आपल्या आजूबाजूचे निरीक्षण केल्यास सर्वत्र रोषणाईचा चकचकाट दिसतो. तारे दिसणेही फार कमी झाले आहे आणि नैसर्गिक प्रकाश तर क्वचितच अनुभवता येतो. परंतु, प्रकाशाच्या या अतिक्रमणामुळे आरोग्यावरही दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.
अभ्यास काय सांगतो?
पूर्वीच्या एका संशोधनात असे सुचवण्यात आले आहे की, अल्झायमरमध्ये आनुवंशिकता, वैद्यकीय परिस्थिती, पर्यावरणीय ताण यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. नवीन अभ्यासात आता नव्या पर्यावरणीय घटकाचा समावेश करण्यात आला आहे आणि ते म्हणजे प्रकाश प्रदूषण. त्याचा यापूर्वी कदाचितच विचार झाला असावा. पण, या नवीन अभ्यासाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अभ्यासात अमेरिकेमधून उपग्रह-अधिग्रहित प्रकाश प्रदूषण डेटा आणि अल्झायमरचा प्रसाराविषयीचा सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेला मेडिकेअर डेटा वापरण्यात आला आहे.
संशोधकांना असे आढळून आले की, मधुमेह आणि उच्चर क्तदाब यांसारख्या परिस्थितींचा अल्झायमरच्या प्रादुर्भावाशी अधिक मजबूत संबंध आहे. तसेच, मूत्रपिंडाचा तीव्र आजार, नैराश्य व लठ्ठपणा यांचाही अल्झायमरच्या प्रादुर्भावाशी संबंध आहे. अल्झायमर आजार होण्यास कारणीभूत ठरणारे हे महत्त्वपूर्ण घटक आहेत. जेव्हा ६५ वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक अल्झायमर आजाराने ग्रस्त होतात, तेव्हा प्रकाशाचे प्रदूषण यासाठी कारणीभूत असल्याचे स्पष्ट होते, असे संशोधक सांगतात.
याबाबतचा अभ्यास करणाऱ्या लेखकांपैकी एक अस रॉबिन व्होइग्ट यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले की, आपल्या शरीरात झोप व जागरणाचे विशिष्ट चक्र असते; ज्याला ‘सर्काडियन ऱ्हिदम’ असे म्हणतात. रात्रीच्या वेळी प्रकाशाच्या संपर्कात येण्यामुळे नैसर्गिक ‘सर्काडियन ऱ्हिदम’ विस्कळित होतो आणि झोपेमध्ये अडथळा निर्माण होतो; ज्यामुळे व्यक्तींना अल्झायमर होण्याची अधिक शक्यता असते. त्याव्यतिरिक्त “सर्काडियन ऱ्हिदममध्ये अडथळा आल्याने लठ्ठपणा, मधुमेह आणि नैराश्यासह अल्झायमरसारख्या आजारांची जोखीम वाढत आहे,” असे अभ्यासात म्हटले आहे.
हेही वाचा : भारताप्रमाणेच थायलंडमध्येही साजरी केली जाते गणेश चतुर्थी; कोणकोणत्या देशात केली जाते बाप्पाची पूजा?
प्रकाशामुळे वाढते धोके
जागतिक लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांना प्रकाश प्रदूषणाचा सामना करावा लागतो. रात्रीचे कृत्रिम दिवे बहुतेकदा निरुपद्रवी आणि फायदेशीर (सुरक्षेच्या दृष्टीने) असतील याकडे लक्ष दिले जात असले तरी, अलीकडील संशोधनातून या दिव्यांचे असंख्य नकारात्मक परिणाम मानव आणि पर्यावरणावर दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे. नवीनतम अभ्यासाने या विषयावरील वाढत्या धोक्यांवर भर दिला आहे.