गेल्या काही दिवसांपासून देशात निपाह, झिका आणि चांदिपुरा विषाणूंचा कहर पाहायला मिळत आहे. या प्राणघातक विषाणूंच्या वाढत्या प्रसारामुळे सध्या जगभरात भारत चर्चेत आला आहे. २१ जुलैपर्यंत गुजरातमध्ये चांदिपुरा विषाणूची तब्बल ५० प्रकरणे नोंदवली गेली आहेत, परिणामी १६ जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य मंत्री हृषिकेश पटेल यांनी सांगितले. राजस्थानमध्येही या विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी केरळच्या मलप्पूरममधील एका १४ वर्षीय मुलाचा निपाह व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू झाल्याने या संकटात भर पडली आहे. निपाह व्हायरसने डोके वर काढल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात झिका विषाणूची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. १९ जुलैपर्यंत ३८ संक्रमित व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे. झिका विषाणू गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भातील मुलांसाठी घातक ठरत आहे. केरळ आणि कर्नाटकमध्येदेखील याचे रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूंच्या झपाट्याने होणार्या प्रसारामुळे भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीवर मोठे संकट निर्माण झाले आहे, तसेच जगाचेही लक्ष वेधले आहे. या विषाणूंचा वाढता प्रसार किती घातक आहे? या विषाणूंची देशातील सद्यपरिस्थिती काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
हेही वाचा : ब्रीफकेस ते टॅबलेट व्हाया बही खाता: निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचं सादरीकरण कसं बदललं?
झिका विषाणू
झिका विषाणूची चर्चा सध्या सर्वत्र आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. प्रामुख्याने डासांच्या चाव्याव्दारे, रक्त संक्रमण, लैंगिक संपर्क आणि स्तनपानाद्वारे हा विषाणू पसरतो. त्यामुळे या विषाणूचे संकट मोठे मानले जात आहे. महाराष्ट्रात, विशेषतः २०२१ पासून झिका प्रकरणांची सर्वाधिक संख्या पाहिली गेली आहे. १९ जुलैपर्यंत राज्यात झिकाच्या अनेक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे; ज्यामध्ये पुणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. पुण्यात झिका विषाणूची २८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केरळ आणि कर्नाटकमध्येही झिकाचे रुग्ण आढळून आले असून अनेकांचा मृत्यूही झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, झिका विषाणू विशेषतः गर्भवती महिलांसाठी धोकादायक आहे. या विषाणूचे संक्रमण गर्भापर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे मुलांमध्ये जन्म दोष (लहान डोके आणि अविकसित मेंदू) आढळून येतो. याव्यतिरिक्त, झिका संसर्गामुळे गर्भातील बालकाचा मृत्यू किंवा निर्धारित कालावधीच्या आधीही जन्म होऊ शकतो. पीअरलेस हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध सल्लागार डॉ. अजय कृष्णा सरकार यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला स्पष्ट केले की, जरी झिका विषाणू आणि डेंग्यूमध्ये साम्य आहे, तरी हा विषाणू अधिक धोकादायक मानला जातो. झिकाच्या लक्षणांमध्ये ताप, पुरळ, डोकेदुखी, सांधेदुखी, लाल डोळे आणि स्नायू दुखणे यांचा समावेश होतो.
वाढता प्रसार पाहता राज्य सरकारांनी उद्रेक रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारने दिलेल्या महितीनुसार, प्रभावित जिल्ह्यांमध्ये दर तीन ते पाच किलोमीटर अंतरावर केंद्रे स्थापन केली जातील आणि क्षेत्राचे निरीक्षण केले जाईल. तापाच्या रुग्णांचे जलद रक्ताचे नमुने गोळा केले जातील. डेंग्यूप्रमाणे झिकाचा उपचार हा लक्षणात्मक आहे. “व्हायरससाठी विशिष्ट औषध नाही. रुग्णांना ताप आणि वेदनाशामक औषधांसाठी पॅरासिटामॉलची गरज असते,” असे डॉ. साहा यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले.
निपाह विषाणू
मलप्पूरममधील १४ वर्षांच्या मुलाचा निपाह व्हायरसने मृत्यू झाल्यानंतर केरळमधील अधिकारी हाय अलर्टवर आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, मुलाला रविवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करूनही डॉक्टरांना अपयश आले. जागतिक आरोग्य संघटनेने निपाह विषाणूचे (NiV) वर्णन झुनोटिक व्हायरस म्हणून केले आहे; ज्याचा अर्थ हा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये प्रसारित होतो. हा विषाणू दूषित अन्न किंवा थेट व्यक्तीच्या संपर्काद्वारे पसरू शकतो. वटवाघळाची लाळ किंवा लघवीने दूषित फळे खाल्ल्याने माणसांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.
परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून केरळ सरकारने निर्णायक कारवाई केली आहे. शनिवारी आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी बाधित व्यक्तींची ओळख पटण्यासाठी २५ समित्यांची स्थापना करण्याची घोषणा केली. रूग्णांवर उपचार करण्यासाठी संपूर्ण आरोग्य संस्थांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत मृत मुलाच्या प्राथमिक संपर्क यादीत ३५० लोकांचा समावेश आहे, असे वृत्त ‘न्यूज १८’ने दिले आहे. याव्यतिरिक्त, पशुसंवर्धन विभागही डुकरांसह प्राण्यांची चाचणी करत आहेत. मलप्पूरममधील ६८ वर्षीय व्यक्तीला निपाहसारखीच लक्षणे दाखवत आहेत. परंतु, हा व्यक्ती मृत मुलाशी संबंधित नाही. या व्यक्तीला आता गंभीर स्थितीत कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
कालिकतमधील एस्टर एमआयएमएस हॉस्पिटलमधील क्रिटिकल केअर मेडिसिनचे संचालक डॉ. अनूप कुमार यांनी ‘रॉयटर्स’ला माहिती दिली आहे की, या टप्प्यावर निपाह विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची किमान शक्यता आहे. पुढील सात ते १० दिवस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असेही त्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, निपाह विषाणूच्या संसर्गामध्ये ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, उलट्या होणे आणि घसा खवखवणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. यात मृत्यूचे प्रमाण २० ते ७५ टक्क्यांपर्यंत आहे.
चांदिपुरा विषाणू
चांदिपुरा विषाणूचा वेसिक्युलर स्टोमाटायटीस आणि रेबीजला कारणीभूत असलेल्या विषाणूंशी जवळचा संबंध आहे. हा विषाणू विशेषतः लहान मुलांसाठी धोकादायक ठरत आहे. गुजरात चांदिपुरा विषाणूच्या उद्रेकाचा सामना करत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री हृषिकेश पटेल यांनी राज्यभरात ५० प्रकरणे आणि १६ मृत्यूची नोंद केली आहे. हा विषाणू संक्रमित सँडफ्लाय किंवा ड्रेनफ्लाइजच्या (माशा) चाव्याद्वारे पसरतो, डास आणि उवांच्या चाव्याद्वारेही याचा प्रसार होतो. या विषाणूची लागण झाल्यानं उच्च ताप, अतिसार, उलट्या आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतो. गंभीर प्रकरणांमध्ये, संसर्ग झालेला व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकतो किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो.
हेही वाचा : ‘Amazon Prime Day Sale’ नक्की काय असतो? ग्राहकांना वस्तूंवर मिळणारी सूट खरी असते का?
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी विषाणूचा सामना करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. बाधित जिल्ह्यांमध्ये मॅलेथिऑन पावडरची फवारणी केली जात आहे आणि तापाच्या रुग्णांवर सखोल उपचार केले जात आहेत. ग्रामीण भागात हा विषाणू आणखी पसरू नये म्हणून आशा आणि अंगणवाडी सेविका यांसारख्या तळागाळातील कर्मचाऱ्यांना जागरूकता वाढवण्यासाठी एकत्रित केले जात आहे, असे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
गुजरातमधील लाटेपाठोपाठ शेजारील महाराष्ट्रातही सतर्कतेची पातळी वाढवली आहे. राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात संशयास्पद संसर्गामुळे चार मुलांचा मृत्यू झाल्यानंतर आणखी दोन प्रकरणे संशयास्पद असल्याने राजस्थान आरोग्य विभाग सतर्क आहे. सध्या, चांदिपुरा विषाणूसाठी कोणताही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नाही.