होंडा मोटार कंपनीशी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरील चर्चेला पूर्णविराम देण्याची निसान मोटार कंपनीची इच्छा आहे. आणि भविष्यात ही कंपनी नव्या भागीदाराच्या शोधात असल्याचे सूतोवाच विलीनीकरणाच्या प्रक्रियेतील जाणकारांनी सांगितले. निसान ही जपानी कार उत्पादक कंपनी आहे. निसान कंपनी व्यवस्थापनाने भागीदार म्हणून तंत्रज्ञान क्षेत्रातील आणि अमेरिकास्थित कंपनीशी हातमिळवणी करण्याचा इरादा स्पष्ट केल्याचे सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. या संदर्भातील बोलणी सध्या प्राथमिक स्तरावर सुरू आहेत. त्यामुळे त्याची जाहीर वाच्यता करता येणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
भागीदार म्हणून अमेरिकन कंपनीच का?
येत्या काळात इलेक्ट्रिक कार आणि नव्या उत्पादनासाठी मोठे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे जगातील काही कंपन्यांनी भागीदारीतून वाहननिर्मितीवर भर दिला आहे. निसान मोटार कंपनीनेही त्यासाठीची वाटचाल सुरू केली आहे. शिवाय निसानचा उत्तर अमेरिकेत दबदबा आहे. येथील बाजारातील निसानचे स्थान भक्कम आहे. मात्र, निसानला भागीदाराचा नव्याने शोध घ्यायचा आहे. गुरुवारी सकाळच्या सत्रात टोकयो शेअर बाजारातील निसानचा शेअर साडेआठ टक्क्यांनी वधारला. होंडा आणि निसान या दोन मोटार कंपन्या एकत्र येत असल्याच्या वा विलीनीकरणाच्या आधीच फारकत घेत असल्याच्या विषयावर बोलण्यास निसानचे प्रवक्ते शिरो नागाइ यांनी नकार दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीच्या मध्यास ठरल्याप्रमाणे त्याबाबत जाहीर केले जाईल.
निसान विलीनीकरणास अनुकूल का नाही?
भागीदारी प्रक्रियेत होंडा मोटार कंपनीचा वरचष्मा असायला हवा, असे कंपनी व्यवस्थापनाने संकेत दिले आहेत. त्याआधी दोन्ही कंपन्यांमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. त्यासाठी विविध मुद्द्यांवर खल झाला. भागीदारीवरील चर्चा लवकरात लवकर संपविण्याच्या शक्यतेवरही दोन्ही कंपन्यांनी मत व्यक्त केले. होंडा मोटार कंपनीने निसान ताब्यात घ्यायची आहे. अर्थात निसान ही होंडा मोटारची उपकंपनी असेल. त्याविषयीचा आपला इरादा होंडाच्या व्यवस्थापनाने बोलून दाखवला आहे. मात्र, ही कल्पना निसान व्यवस्थापनाला मान्य नसून असे काही घडणार नसल्याचे निसानने निक्षून सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गुंतवणूक मर्यादेच्या मुद्द्यावरही अद्याप तोडगा निघू शकला नसल्याचे या प्रक्रियेतील सूत्रांनी सांगितले. बुधवारी निसानने प्रसिद्ध निवेदनात दोन्ही कंपन्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर परस्परांमध्ये एकमत होऊ न शकल्याचे म्हटले आहे.
निसानसमोरील आव्हाने काय आहेत?
निसानला येत्या काळात उत्पादकतेतील दर्जा टिकविण्यासाठी नेतृत्वाच्या पातळीवर आणि स्पर्धात्मक मूल्यांचे वर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठीची रूपरेषा तयार केली जात असल्याचे निसान कंपनीतील घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले. दरम्यान, प्रसारमाध्यमातील वृत्तानंतर निसानच्या शेअरचा भाव टोकयो आणि पॅरिस शेअर बाजार घसरला. फेब्रुवारीच्या मध्यास विलीनीकरण प्रक्रियेबाबत घोषणा करण्याचा दोन्ही कंपन्यांनी पुनरुच्चार केला. प्रत्यक्षात ही बोलणी जानेवारीच्या अखेरीस पूर्ण होणार होती.
दोन्ही कंपन्यांची नेमकी पंचाईत कुठे?
संभाव्य भागीदारीसाठी आवश्यक ठोस धोरणाचा अभाव, असे चित्र सध्या आहे. होंडा-निसान विलिनीकरणात होंडा हा मोठा भाऊ असेल. शिवाय निसान ही उपकंपनी असेल, असे होंडा व्यवस्थापनाला अपेक्षित होते. त्यासाठी निसानने त्यांच्या नेतृत्व आणि व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात अर्थात निसानचा फेररचनेचा आराखडा हा प्रगतीच्या दिशेने असावा आणि तसे दृश्यरूप निसानने आपल्यासमोर ठेवावे, असे होंडाला अपेक्षित आहे. यासाठी होंडाने निसानसमोर कठोर अटी ठेवल्या असल्याची माहिती या प्रकरणाशी निगडित सूत्रांनी दिली. दोन्ही कंपन्यांमधील बोलणी कुठवर आली आहेत, हे आता सांगणे कठीण आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. विलिनीकरणाचा प्रस्ताव हा निसानला बुडत्याला काठीचा आधार आहे का, या मुद्द्यावर अनेकांनी विविधांगी खल केला. त्यानुसार होंडाची आर्थिक स्थिती तुलनेने मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि निसाने होंडाशी हातमिळवणी केल्यास त्यांच्या व्यवसायवृद्धीला नवसंजीवनी मिळेल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. होंडाने त्यांचा दुचाकी निर्मितीतील नफ्यातील व्यवसाय पुन्हा आपल्याकडे घेतला आहे. मात्र, इलेक्ट्रिक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या वाहननिर्मितीचे मोठे आव्हान दोन्ही कंपन्यांसमोर आहे. अशा वाहनांच्या निर्मितीतील अडचणी हा प्राधान्याचा मुद्दा आहे. निसानचा वार्षिक कार खपाचा आकडा ३० लाखांहून अधिक आहे, तर होंडाच्या कारचा दरवर्षाचा खप ४० लाख इतका आहे. दोन्ही कंपन्या एकत्र आल्यास होंडा-निसान हा समूह जगातील तिसरा मोठा कारनिर्मिती समूह असेल. टोयोटा आणि फोक्सवॅगन या दोन कंपन्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांवर आहेत.