स्वयंघोषित स्वामी नित्यानंद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुलांचे अपहरण, लैंगिक अत्याचार व गैरवर्तनाचा आरोप असलेला आणि स्वतःला देव मानणारा नित्यानंद २०१९ साली भारतातून पळून गेला होता. तेव्हापासून तो भारतात परतलेला नाही. त्याने स्वतःचे हिंदू राष्ट्र ‘कैलास’ची स्थापना केल्याचा दावा केल्यानंतर तो चर्चेत आला होता. मुख्य म्हणजे या कथित देशाचे प्रतिनिधी २०२३ साली संयुक्त राष्ट्रांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी अनेक जागतिक नेत्यांबरोबर फोटोदेखील काढले होते. परंतु, आता बोलिव्हिया सरकारने कथित कैलासचा संशयास्पद व्यवहार बघता, मोठी कारवाई केली आहे. नित्यानंदच्या काही सहकाऱ्यांना बोलिव्हियामध्ये फसवणूकप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हे नेमके प्रकरण काय? कथित हिंदू राष्ट्र वसवण्यासाठी नित्यानंदने बोलिव्हियातील जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला का? नित्यानंद सध्या कुठे आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
नित्यानंदचा बोलिव्हिया ताब्यात घेण्याचा प्रयत्न?

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर देशाच्या जवळ एक बेट विकत घेऊन नित्यानंदने त्या बेटाला देश म्हणून घोषित केले आहे आणि या देशाला ‘कैलास’ असे नाव दिले आहे. त्याने हे जगातील सर्वोत्कृष्ट हिंदू राष्ट्र असल्याचे म्हटले आहे, तसेच स्वतःचे पासपोर्ट आणि वैश्विक संविधानही तयार केले आहे. नित्यानंदने सोन्यापासून स्वतःचे चलन तयार केल्याचा दावाही केला आहे. परंतु, हे दावे कितपत खरे आहेत, हे अजून स्पष्ट झालेले नाही. बोलिव्हियन अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात माहिती दिली की, त्यांनी ‘कैलास’शी संबंधित २० लोकांना अटक केली आहे. अॅमेझॉनच्या जंगलातल्या काही आदिवासी समूहांची फसवणूक करून, त्यांच्या ताब्यातील जमीन तब्बल एक हजार वर्षांच्या भाडेकरारावर लाटण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर देशाच्या जवळ एक बेट विकत घेऊन नित्यानंदने त्या बेटाला देश म्हणून घोषित केले आहे. (छायाचित्र-इंडियान एक्सप्रेस)

बोलिव्हियन पोलीस अधिकाऱ्यांकडून हा करार रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आणि कैलासशी संबंधित या आरोपींना त्यांच्या काल्पनिक देशात हद्दपार न करता, त्यांच्या मूळ देशांत पाठविण्यात आले आहे. या देशांमध्ये भारतासह अमेरिका, स्वीडन व चीन यांचा समावेश आहे. बोलिव्हिया परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, बोलिव्हियाचे ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास’ या कथित राष्ट्राशी कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत. या कथित देशाच्या सदस्यांनी बोलिव्हियामधील आदिवासी समुदायांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला होता. बोलिव्हियाचे इमिग्रेशन संचालक कॅथेरिन कॅल्डेरॉन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हे लोक पर्यटक म्हणून बोलिव्हियामध्ये आले होते. त्यांनी देशात प्रवेश करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला. काही व्यक्ती नोव्हेंबर २०२४ पासून बोलिव्हियामध्ये होत्या; तर काहींनी जानेवारी २०२५ मध्ये देशात प्रवेश केला होता.

१६ मार्च रोजी बोलिव्हियन वृत्तपत्र ‘एल डेबर’ने एक चौकशी अहवाल प्रकाशित केला. त्यानंतर ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली. या चौकशी अहवालात असे स्पष्ट दिसून आले की, तीन आदिवासी गटांनी कैलासशी संबंधित काही लोकांबरोबर सुमारे ४.८ लाख हेक्टर जमिनीसाठी करार केले होते, जे बेकायदा होते. याच आदिवासी गटांपैकी एक असणाऱ्या बौरेचे नेते पेड्रो गुआसिको यांनी ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ला सांगितले की, २०२४ मध्ये कथित ‘कैलास’च्या प्रतिनिधींशी आमचा संपर्क सुरू झाला. त्यांनी जंगलात लागलेल्या आगीदरम्यान आम्हाला मदत केली होती.

त्यांनी करार केलेली जमीन ही नवी दिल्लीच्या तिप्पट आकाराची असल्याची माहिती आहे. बौरे या आदिवासी गटाने सुमारे २,००,००० डॉलर्सच्या वार्षिक देयकाच्या बदल्यात २५ वर्षांच्या भाडेपट्ट्याचा करार केल्याची माहिती दिली. नित्यानंदच्या काल्पनिक राष्ट्राने बौरे, कायुबा व एसे एहा या आदिवासी समुदायांबरोबर १,००० वर्षांच्या भाडेपट्टी करारांवर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती बोलिव्हियाचे मंत्री एडुआर्डो डेल कॅस्टिलो डेल कार्पियो यांनी दिली. या करारानंतर कैलासला भाडेपट्ट्यावरील प्रदेशातील सर्व संसाधनांवर विशेष अधिकार मिळाले, असे वृत्त ‘द न्यूज मिनीट’ने दिले.

कथित देश ‘कैलास’

नित्यानंदने भारतातून पलायन केले होते. २०१९ मध्ये तो देशातून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. भारतात त्याच्यावर बलात्कार, छळ आणि बालशोषण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. भारत सोडल्यानंतर अनेक काळ त्याचा कुठेच थांगपत्ता नव्हता. काही वर्षांनंतर अचानक त्याने ‘युनायडेट स्टेट्‍स ऑफ कैलास’ हे जगातले सर्वोत्कृष्ट हिंदू राष्ट्र स्थापन केल्याचा दावा केला आणि तो चर्चेत आला. या कथित राष्ट्राच्या वेबसाइटवर, कैलास हा सीमांचे बंधन नसणारा देश आहे. हा देश जगभरामधून हाकलवून लावण्यात आलेल्या हिंदू लोकांनी एकत्र येऊन तयार केला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

या वेबसाईटवरील माहितीनुसार, मोफत आरोग्य सेवा आणि शिक्षण देणे, शाकाहाराला आणि लिंग समानतेला प्रोत्साहन देणे यांसाठी कैलासची स्थापना करण्यात आली आहे. या वेबसाइटनुसार, विज्ञान, योग, ध्यान व गुरुकुल शिक्षण पद्धतीचा पुरस्कार करणारा हा देश आहे. या कथित देशाने इंग्रजी, संस्कृत व तमीळ या त्याच्या अधिकृत भाषा असल्याचे सांगितले आहे.

नित्यानंद कोण आहे?

नित्यानंदचे नाव अरुणाचलम राजशेखरन आहे, जो मूळचा तमिळनाडू येथील रहिवासी आहे. त्याने २००० मध्ये बंगळुरूजवळ आश्रमाची स्थापना केली. त्यानंतर देशात त्याची चर्चा सुरू झाली. कालांतराने त्याने देशभरात त्याचा प्रभाव वाढवला आणि देशातील जवळजवळ प्रत्येक राज्यात त्याचे आश्रम उघडले. २०१० मध्ये अभिनेत्रीबरोबरचा आक्षेपार्ह स्थितीतील त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली. त्याला त्याबद्दल अटकही झाली. नित्यानंदवर बलात्काराचे आरोप करण्यात आले.

त्याच्यावरील बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप वाढत गेले. पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई सुरू केली. हे खटले हिंदूविरोधी कटाचा भाग असल्याचे सांगत आपल्यावरील सर्व आरोप नित्यानंदने फेटाळून लावले. १ एप्रिल रोजी त्याच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरली होती. मात्र, त्याच्या प्रतिनिधींनी एक निवेदन जारी करीत सांगितले की, नित्यानंद जिवंत आणि सुरक्षित आहे. त्याचा पुतण्या सुंदरेश्वरने नित्यानंदचे निधन झाल्याची माहिती दिल्यानंतर सर्वत्र त्याच्या मृत्यूचे वृत्त पसरले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nithyananda tried to take over bolivia to establish hindu nation kailasa rac