– हृषिकेश देशपांडे
विधानसभेत मुख्यमंत्री विरुद्ध विधानसभा अध्यक्ष असा वाद क्वचितच पहायला मिळतो. कारण मुख्यमंत्र्यांचा प्रभाव मोठा असतो. अर्थात सभागृहात अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. याला उल्लेख करण्याचे कारण म्हणजे बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीशकुमार यांची विधानसभा अध्यक्ष भाजपचे विजयकुमार सिन्हा यांच्याशी नुकतीच जोरदार शाब्दिक चकमक झाली. मुख्यमंत्र्यांनी अचानक रौद्रावतार धारण केल्याने सभागृह अवाक् झाले. नितीशकुमार सौम्य प्रकृतीचे राजकारणी म्हणून ओळखले जातात. मग मुख्यमंत्र्यांचा पारा का चढला? त्याला संयुक्त जनता दल विरुद्ध भाजप असा सुप्त संघर्षाची किनार आहे का?
वादाचे कारण?
विधानसभा अध्यक्ष आणि नितीशकुमार यांच्यात संघर्षाला कारण ठरला तो लखीसराई येथील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा. लखीसराई हा सिन्हा यांचा मतदारसंघ. फेब्रुवारीत सरस्वती पूजा कार्यक्रमात करोना नियमांचा भंग केला म्हणून दोन तरुणांना अटक करण्यात आली होती. मात्र कार्यक्रम आयोजकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यावरून सिन्हा नाराज होते. त्यातच याबाबत सदनात प्रश्न विचारण्यात आले त्याला मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. म्हणून दोन दिवसांची मुदत देण्यात आली. अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा त्यांचा आरोप होता. त्यातून विधानसभेत याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र चौकशी सुरू असताना सतत हा मुद्दा उकरून काढण्याचे कारण काय, असा नितीशकुमार यांचा सवाल होता. गृहखाते नितीश यांच्याकडे आहे. त्यामुळे संतापाचा हा एक मुद्दा. सिन्हा यांनी नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातही यापूर्वी काम केले आहे. त्यामुळे दोघांना एकमेकांची कार्यपद्धती माहीत आहे. सत्तेत असूनही नोकरशाही दाद देत नाही अशी भाजपची तक्रार आहे. विधानसभा अध्यक्षांनी सूचना करूनही पोलीस अधिकारी दुर्लक्ष करतात असे सिन्हा यांचे म्हणणे, यातून मग विधानसभेत सत्तारूढ आघाडीतील संघर्ष चव्हाट्यावर आला. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी करत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पेच वाढविण्याचा प्रयत्न केला.
समेटाचे प्रयत्न
आता बहुतेक राज्यांमध्ये सदनातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जात असल्याने या प्रकाराला मोठे वार्तामूल्य मिळाले. सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीत वाद वाढू नये म्हणून संयुक्त जनता दलाचे वरिष्ठ नेते विजयकुमार चौधरी यांनी पुढाकार घेतला. हा वाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अध्यक्ष सिन्हा सभागृहात आले नाहीत. बुधवारी सदनात आल्यानंतर त्यांनी सदस्यांना लोकशाहीवर उद्देशून छोटेखानी भाषण दिले. ते नितीशकुमार यांना उद्देशून होते. पण ते सभागृहात नव्हते. हा वाद झाल्यानंतर बिहारमधील भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्त्वाला याची कल्पना दिली. नितीशकुमार यांनीही वादानंतर चारच दिवसांनी म्हणजे शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकारी रंजन कुमार यांना हटवून सईद इम्रान मसूद यांना विभागीय पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे एकंदर या वादात विधानसभा अध्यक्षांचा विजय झाल्याचे चित्र निर्माण झाले.
राजकीय आडाखे
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेल्या काही वर्षांत काहीसे बेभरवशाचे राजकारण केले आहे. सुरुवातीला भाजप आघाडीत नंतर राष्ट्रीय जनता दल -काँग्रेस यांची महाआघाडी ते आता पुन्हा भाजपशी सोयरीक असा त्यांचा प्रवास. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपशी आघाडी केली खरी मात्र बिहारमधील एकूण २४३ पैकी भाजपला ७४ तर जनता दलाला ४३ जागा मिळाल्या. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय जनता दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला झुंजवले. संयुक्त जनता दलाला सत्तेसाठी भाजपबरोबर मंत्रिमंडळात दुय्यम भागीदार म्हणून आता स्थान आहे. पक्षात त्यावरून नाराजी आहे. तर भाजप राज्यात पकड मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे दोन पक्षांमध्ये वर्चस्वाची ही लढाई आहे. नितीशकुमार हे पुन्हा भाजप विरोधी आघाडीत जातील काय, असा प्रश्न आहे. मध्यंतरी राष्ट्रपतिपदासाठी विरोधकांचे संयुक्त उमेदवार म्हणून नितीशकुमार यांचे नाव घेतले जात होते. मात्र कुमार यांनी त्याचा लगेचच इन्कार केला. नितीश आता ७१ वर्षांचे आहेत. पुढील विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये अपेक्षित आहे. गेल्या वेळी प्रचारात एका ठिकाणी ‘अंत भला तो सब भला’ असे वक्तव्य करत त्यांनी निवृत्तीचे सूतोवाच केले होते. राजकारणात ऐनवेळी काय घडेल हे सांगता येत नाही. भाजपसाठी केंद्रात सत्तेच्या दृष्टीने बिहार महत्त्वाचे आहे. आधीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेना व अकाली दलासारखे जुने मित्र पक्ष बाहेर पडले आहेत. त्यामुळे संयुक्त जनता दलाला दुखवणे परवडणारे नाही. राज्यात राष्ट्रीय जनता दल-संयुक्त जनता दल तसेच माले गट एकत्र आल्यास भाजपला या राज्यातील लोकसभेच्या चाळीस जागा कठीण जातील. त्यामुळे दोन्ही पक्ष वाद झाला तरी तुटेपर्यंत ताणणार नाहीत असे आताचे चित्र आहे. विधासभेत झालेल्या संघर्षानंतरही दोघांनीही एक पाऊल मागे घेतले हे त्याचेच द्योतक मानले जाते.