देशातील ४४० जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांमध्ये भूजलातील नायट्रेट धोकादायक पातळीवर आढळून आल्याचे केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालात म्हटले आहे, त्याविषयी..

केंद्रीय भूजल मंडळाचा अहवाल काय?

केंद्रीय भूजल मंडळाने (सीजीडब्ल्यूबी) ‘वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल २०२४’ नुकताच प्रकाशित केला आहे. या अहवालात देशातील विविध राज्यांमधील भूजलाची गुणवत्ता दर्शविण्यात आली आहे. भारतातील ४४० जिल्ह्यांमध्ये भूजलातील नायट्रेटचे प्रमाण धोकादायक पातळीवर आढळून आले आहे. गोळा केलेल्या २० टक्के नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) यांनी पिण्याच्या पाण्यासाठी निर्धारित केलेल्या ४५ मिलीग्रॅम प्रति लीटर मर्यादेपेक्षा जास्त आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये भूजलात नायट्रेटचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढले आहे, त्यात महाराष्ट्रातील वर्धा, बुलढाणा, अमरावती, नांदेड, बीड, जळगाव आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांचा समावेश आहे.

नायट्रेटचे प्रमाण वाढल्याचे परिणाम काय?

भूजलात नायट्रेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त होणे, ही गंभीर बाब असून यामुळे पर्यावरण आणि आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषत: ज्या भागात नायट्रोजन आधारित खते वापरली जातात, तेथे याचा धोका जास्त आहे. बागायती क्षेत्रात नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे, यासाठी सरकार प्रयत्नशील असले, तरी ग्रामीण भागात अनेक गावे विहीर, बोअरवेल, हातपंपांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पाण्याचे स्रोत दूषित असले, तर त्याचे दुष्परिणाम जाणवतात. नळाद्वारे पाणी पुरवण्यात येत असले, जरी ते किती प्रमाणात शुद्ध असते, यावरही शंका असते. आता पिकांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. त्यातूनदेखील जलप्रदूषण होते. जर पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असेल, तर त्याचा परिणाम सर्वप्रथम लहान बालकांवर होतो. ‘ब्लू बेबी सिंड्रोम’ सारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. रक्ताभिसरणासंबंधातील आजार निर्माण होतात.

महाराष्ट्रात नायट्रेटचे प्रमाण किती?

गोळा करण्यात आलेल्या भूजल नमुन्यांपैकी राजस्थान, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील ४० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये नायट्रेट मर्यादेपेक्षा जास्त होते, तर महाराष्ट्रातील नमुन्यांमध्ये ३५.७४ टक्के, तेलंगणात २७.४८ टक्के, आंध्र प्रदेशात २३.५ टक्के आणि मध्य प्रदेशात २२.५८ टक्के दूषिततेचे प्रमाण होते. देशातील १५ जिल्हे असे ओळखले गेले, जेथे भूजलामध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त होते. यामध्ये राजस्थानमधील बारमेर, जोधपूर, महाराष्ट्रातील वर्धा, बुलढाणा, अमरावती, नांदेड, बीड, जळगाव आणि यवतमाळ, तेलंगणातील रंगारेड्डी, आदिलाबाद आणि सिद्धीपेट, तामिळनाडूमधील विल्लुपुरम, आंध्र प्रदेशातील पलानाडू आणि पंजाबमधील भटिंडा यांचा समावेश आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये २०१५ पासून नायट्रेट पातळी स्थिर आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि हरियाणामध्ये २०१७ ते २०२३ या कालावधीत प्रदूषणात वाढ झाली आहे. अनेकदा जमिनीत मुरलेली प्रदूषके आणि घातक रसायने जलस्तरांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे जलस्तराचे पाणी दूषित होते. एवढेच नाही, तर जलस्तरामार्फत ते दूर दूर अंतरापर्यंत पोहोचते.

अहवालातील इतर निरीक्षणे कोणती?

‘वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल २०२४’ नुसार ९.०४ टक्के नमुन्यांमध्ये फ्लोराइड पातळीदेखील सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त होती, तर ३.५५ टक्के नमुन्यांमध्ये आर्सेनिक दूषित आढळून आले.  भूजल गुणवत्ता तपासण्यासाठी देशभरातील एकूण १५ हजार २५९ निरीक्षण स्थाने निवडण्यात आली. यापैकी २५ टक्के विहिरींचा  तपशीलवार अभ्यास करण्यात आला. जल पुनर्भरणाचा गुणवत्तेवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर चार हजार ९८२ ठिकाणांहून भूजलाचे नमुने घेण्यात आले. काही राज्यांमध्ये आर्सेनिकचे प्रमाण जास्त आहे. त्यात पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. पंजाबच्या काही भागात आणि छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातही आर्सेनिकची पातळी जास्त आढळून आली आहे. फ्लोराइडचे प्रमाण वाढल्यामुळे फ्लोरोसिस होऊ शकतो आणि आर्सेनिकचे प्रमाण वाढल्यास कर्करोग किंवा त्वचेचा रोग होण्याची शक्यता असते.

युरेनियमची पातळीदेखील वाढली?

भूजल गुणवत्तेच्या अहवालातून आणखी एक चिंतेची बाब आढळून आली आहे. अनेक भागात भूजलामध्ये युरेनियमची पातळी वाढली आहे. राजस्थानमधील ४२ टक्के नमुन्यांमध्ये आणि पंजाबमधील ३० टक्के नमुन्यांमध्ये पाण्यातील युरेनियमचे प्रमाण अधिक आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे. युरेनियमच्या या वाढलेल्या प्रमाणामुळे मूत्रपिंडाचे नुकसान होण्याची शक्यता असते. राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात काही भागांमध्ये भूजलामध्ये युरेनियम अधिक प्रमाण आढळले आहे. भूजलात रासायनिक घटकांचे वाढते प्रमाण रोखण्‍यासाठी आता सर्वांनाच काळजी घ्‍यावी लागणार आहे.

mohan.atalkar@expressindia.com