हैदराबादचे आठवे निजाम मुकर्रम जाह यांचे तुर्की येथे वयाच्या ८९ व्या वर्षी (१६ जानेवारी रोजी) निधन झाले. त्यांची छानछौकी, श्रीमंतीचा आब आणि जगण्यातल्या रुबाबाची चर्चा अनेकदा झाली. मुकर्रम यांचे वडील सातवे निजाम मीर उस्मान अली याला जगातला सर्वात श्रीमंत पण तेवढाच कंजूस राजा म्हणून पाहिले जात होते. तसे सर्वच निजामांचे अनेक किस्से लोक चवीने चघळतात. हजारो किलोमीटर दुरुन भारतात येऊन हैदराबादमध्ये स्वतःचे राज्य निर्माण करणाऱ्या निजामांबद्दल अनेक कहाण्या आहेत. त्यांच्या किस्स्यांमुळे सामान्य माणसांचे डोळे विस्फारतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निजामांचे मुळ भारतातले नव्हते

हैदराबादच्या निजामांच्या गोष्टीचा उदय होतो, उझबेकिस्तानच्या समरकंद शहरापासून. येथे निजामाचे मुळ घराणे एक सुफी कुटुंब होते. समरकंदच्या काझी परिवाराने निजामाच्या पुर्वजांपैकी ख्वाजा आबिद यांना दरबारात महत्त्वाच्या पदावर बसवले होते. काझीच्याच एका कामाच्या निमित्ताने १६५५ मध्ये ख्वाजा आबिद भारतात आला. तेव्हा दिल्लीत शाहजहाँचे राज्य होते. तर दक्षिणेत त्याचा मुलगा औरंगजेब आपल्या वडीलांना हरवून दिल्ली काबिज करण्याच्या तयारीत होता. याच दरम्यान ख्वाजा आबिदची औरंगजेबसोबत भेट झाली. ख्वाजाची हुशारी, चातुर्य, युद्धकौशल्य यावर खूश होऊन औरंगजेबने त्याला खान ही पदवी दिली आणि त्याला स्वतःच्या खास लोकांमध्ये स्थान दिले. इथूनच पुढे ख्वाजाचा भारतातील वंश सुरु झाला.

ख्वाजाचा नातू कमरुद्दीनला दिल्ली मुघल बादशहाकडून निजाम ए मुल्क ही पदवी मिळाली. निजाम म्हणजे एखाद्या विभागाचा राखणदार. दिल्ली दरबाराने दक्षिणेतील त्याच्या प्रांतावर देखरेख ठेवण्यासाठी, महसूल गोळा करणे, प्रशासन चालवण्यासाठी स्वतःचा प्रतिनिधी नेमला. त्यालाच निजाम ही पदवी म्हणत. निजामांनी हैदराबादला स्वतःची राजधानी बनविले. सात पिढ्यापर्यंत ख्वाजाच्या कुटुंबात निजाम पद्धत सुरु होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सातव्या निजामाला गुडघे टेकवत भारतात सामील व्हावे लागले. तेव्हा कुठे निजाम पद्धतीचा अंत झाला. सातव्या निजामाचे पुत्र मुकर्रम जाह यांचा नुकताच मृत्यू झाला. आपल्या पुर्वजांप्रमाणेच तेही निजामी शाही थाटात जगण्यासाठी ओळखले जात होते.

हैदराबाद स्वातंत्र्यपूर्व काळातील पुढारलेले संस्थान

निजामांचा हैदराबाद येथील गोलकुंडा हा किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे. हैदराबादमधील संपन्नतेचा काळ या किल्ल्याशी जोडला जातो. सतराव्या शतकात इथे मोती आणि मूल्यवान धातूंवर काम केले जात होते. निजामांनी व्यापारासोबतच संस्कृतीचाही तडका या प्रांताला दिला. दक्षिणेतील अनेक भाषा इथे बोलल्या जात होत्या. यासोबतच तुर्की आणि अरबी भाषांची जाण असलेले लोकही इथे होते. प्रशासनावर निजामाची चांगली पकड होती. म्हणूनच दिर्घकाळ निजाम या प्रांतावर राज्य करु शकले. चौथ्या आसफजाह याच्या काळात हैदराबाद संस्थानात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी राज्याची व्यवस्था लागावी यासाठी निजामाने १६ जिल्ह्यांमध्ये राज्य वाटले. यातील आठ राज्य आपल्या महाराष्ट्रातील होते. जे नंतर महाराष्ट्राशी जोडले गेले. विशेष म्हणजे हैदराबाद सामाजिकरित्याही पुढारलेले होते. १८५६ साली सती प्रथा बंद करणारे हैदराबाद पहिले संस्थान होते.

जगातला सर्वात श्रीमंत आणि सर्वात कंजूस व्यक्ती

निजामाचे खानदान तसे युद्धकलेसाठी ओळखले जायचे. मात्र सातव्या आणि आठव्या निजामाची ओळख वेगळ्या कारणांसाठी केली जाते. सातव्या निजामाला तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. प्रतिष्ठित टाइम मासिकाने १९३७ साली सातव्या निजामाला कव्हर पेजवर प्रसिद्धी दिली होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून असा त्याचा उल्लेख टाइमने केला होता. हैदराबादच्या लोकप्रिय अशा उस्मानिया विद्यापीठाची स्थापना याचवेळी करण्यात आली होती. निजाम इतके श्रीमंत होते की, पहिल्या महायुद्धात त्यांनी ब्रिटिश सैन्याला जवळपास २५ मिलियन पाउंड दिले होते. जगातला श्रीमंत व्यक्ती असूनही निजाम मात्र कंजूस स्वभावासाठी प्रसिद्ध होता. आजही त्याच्या कंजुसीचे किस्से चर्चेत असतात.

निजाम चार मिनार नावाची स्वस्त सिगारेट ओढायचा

निजामाच्या कंजुसीबद्दलचे वर्णन भारतीय आणि ब्रिटिश लेखकांनी आपल्या पुस्तकात केले आहे. फ्रीडम ॲट मिडनाइट या पुस्तकात डॉमिनिक लापियरे व लॅरी कॉलिन्स यांनी एक मजेशीर किस्सा नोंदवला आहे. निजामाला वर्षातून एकदा राज्यातील प्रतिष्ठित नेते सोन्याचं नाणे भेट द्यायचे. आधीचे निजाम या नाण्यांना स्पर्ष करुन परत देत असत. पण सातव्या निजामाने ते परत देण्याऐवजी सिंहसनावर ठेवलेल्या एका पिशवीत नाणे टाकायला सुरुवात केली. एकदा तर नाणे घेत असताना जमिनीवर पडले. तेव्हा निजाम स्वतः गुडघ्यावर बसून ते नाणे शोधू लागला. तसेच निजामाचे अत्यंत निकटवर्तीय राहिलेले वॉल्टर मॉन्कटन यांच्या ‘द लाइफ ऑफ विस्काउन्ट मॉन्कटन ऑफ ब्रेन्चेली’ चरित्रात फ्रेडरिक बर्केनहेड यांनी लिहिले आहे की, निजाम खूप श्रीमंत असले तरी तेवढेच कंजूस होते. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांनी नोकरीस ठेवले होते. स्वतःकडे अनेक महाल, इमारती असूनही या अधिकाऱ्यांना मात्र ते अतिशय घाणेरडी खोली देत असत. स्वतः निजामाचा शयनकक्ष घाणेरडा होता. त्यांना स्वस्त सिगारेट ओढण्याची सवय होती. चार मिनार हा त्याचा आवडता ब्रँड. त्यांच्या घरात सिगारेटची दुर्गंधी आणि थोटके पडलेले असायची. वर्षातून एकदाच ही खोली स्वच्छ केली जायची.

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस आधी निजामाने लंडनच्या वेस्टमिंस्टर बँकेत १ मिलियन पाउंड रुपये जमा केल्याचे सांगितले जाते. जर काही अडचण आलीच तर देश सोडून इतर ठिकाणी राहता येईल, अशी त्यांची अटकळ होती. खरंतर निजाम तेव्हा भारत की पाकिस्तान? नेमक्या कोणत्या देशात जायचं, हे ठरवू शकला नाही. स्वतंत्र हैदराबाद हे निजामाचे पहिले स्वप्न होते. मात्र ते शक्य होणार नव्हते, ज्याचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. अनेक वर्षांनंतर काही पत्रकारांनी वेस्टमिंस्टर बँकेत असलेल्या या रकमेची माहिती घेतली. वर्ष २०१९ मध्ये या रकमेचे मूल्य ३०० कोटी झाल्याचे सांगण्यात आले. गार्डियन वृत्तपत्राने यावर अनेक वृत्तमालिका केल्या.

कंजूस असला तरी अनेक प्रेमसंबंध

सातवा निजाम हा दिसायला ठेंगणा आणि थोडा पोक काढून चालणारा होता. कपड्यांची निवड आणि रोजचे जेवण यातही तो कंजूस होता. घरी येणाऱ्या पाव्हण्यांना चहासोबत केवळ दोन बिस्किटे दिली जायची. त्यातलेही एक बिस्किट स्वतः निजाम खायचा. मात्र निजामाला शारीरिक संबंधात चांगलाच रस होता. लग्नाच्या व्यतिरिक्त अनेक महिलांकडून त्याला संतती प्राप्त झाली होती, असेही सांगितले जाते. १९११ सातवा निजाम म्हणून उस्मान अली खान याचा राज्याभिषेक झाला होता. १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत त्याने हैदराबाद संस्थानावर राज्य केले. त्यानंतर त्याचा मुलगा आठवा निजाम याचाही आता मृत्यू झाला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nizam of hyderabad controversial history amid death of eighth nizam mukarram jah in turkey kvg