युक्रेनमधील चेरनोबिल किरणोत्सर्ग क्षेत्रातील लांडगे कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या किरणोत्सर्गाच्या संपर्कात येऊनही, त्यांच्यात कर्करोग प्रतिकारकशक्ती आढळून आली. प्रिन्स्टन विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ डॉ. कारा लव्ह यांनी गेल्या महिन्यात सिएटल, वॉशिंग्टन येथे ‘सोसायटी फॉर इंटिग्रेटिव्ह अँड कॉम्पॅरेटिव्ह बायोलॉजी’ यांच्याकडे सादर केलेल्या अहवालात हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. या संशोधनामुळे वैद्यकीय विश्वात खळबळ उडाली आहे. त्याविषयी…
चेरनोबिलमध्ये किरणोत्सर्ग कशामुळे?
उत्तर युक्रेनमधील चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पात एप्रिल १९८६ मध्ये अणुभट्टीचा स्फोट झाला होता. त्यावेळी हे क्षेत्र सोव्हिएत रशियाचा भाग होता. तेथे स्फोटामुळे कर्करोगाला कारणीभूत किरणोत्सर्ग झाल्याने शहरातून साडेतीन लाखांहून अधिक लोकांना स्थलांतरीत करण्यात आले होते. आजही तिथे मानवी वस्ती नाही. तसेच अजूनही किरणोत्सर्ग होत असल्याने १००० चौरस मैल क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बेलारूस, युक्रेन आणि पश्चिम रशियामधील माती आणि पाण्यात किरणोत्सारिता टिकून असल्याने आजही त्याचा परिणाम दिसून येतो.
हेही वाचा : Indo-China relations: चीनचा महत्त्वाकांक्षी लष्करी प्रकल्प ‘शाओकांग’ आहे तरी काय?
लांडग्यांचा अभ्यास कसा केला?
प्रिन्स्टन विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ कारा लव्ह या चेरनोबिलमधील लांडगे कसे जगतात याचा अभ्यास करत आहेत. त्यांनी आणि त्यांच्या टीमने २०१४ मध्ये चेरनोबिल किरणोत्सर्ग क्षेत्राला भेट दिली. तिथे त्यांनी लांडग्यांना रेडिओ कॉलर लावून त्यांच्या हालचाली टिपल्या. लांडगे कुठे आहेत आणि किती किरणोत्सर्गाच्या संपर्कात आहेत याचे प्रत्यक्ष मोजमाप त्या कॉलरद्वारे त्यांना मिळाले. लांडग्यांचे शरीर कर्करोगास कारणीभूत किरणोत्सर्गाला कसा प्रतिसाद देतात हे समजून घेण्यासाठी त्यांनी रक्ताचे नमुनेदेखील घेतले.
हेही वाचा : विश्लेषण : ‘मार्ड’च्या डॉक्टरांना वारंवार संपावर का जावे लागते?
लांडग्यांच्या अभ्यासात काय आढळले?
उच्च किरणोत्सारी क्षेत्रातील राखाडी लांडगे दररोज ११.२८ मिलीरेम किरणोत्सर्गाच्या संपर्कात येतात. हे प्रमाण मानवासाठी सुरक्षित असलेल्या किरणोत्सर्गाच्या प्रमाणापेक्षा सहा पटींनी अधिक आहे. डॉ. लव्ह यांना त्यांच्या अभ्यासात आढळले की, लांडग्यांनी ‘रेडिएशन’ उपचार घेत असलेल्या कर्करोगाच्या रुग्णांप्रमाणेच आपली रोगप्रतिकारक प्रणाली बदलली आहे. डॉ. लव्ह यांच्या टीमने प्राण्यांच्या शरीरातील कर्करोग होण्याची जोखीम वाढवण्याऱ्या काही भागांची अनुवांशिक माहितीही घेतली. म्हणजे उदाहरणार्थ, माणसांवर झालेल्या बऱ्याच संशोधनांनंतर मनुष्याच्या जनुकांत काही बदल आढळले आहे जे कर्करोगाचा धोका वाढवतात. जसे की बीआरसीए (BRCA ) जनुकाच्या भिन्नतेमुळे किंवा त्यात झालेल्या बदलामुळे स्त्रियांना स्तनाचा किंवा गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. परंतु डॉ. लव्ह यांना लांडग्यांमधील जनुकांमधील संरक्षणात्मक उत्परिवर्तनामुळे कर्करोगाला प्रतिकार करण्याची शक्ती वाढल्याचे आढळले..
हेही वाचा : विश्लेषण : मुंबई कोस्टल रोड लवकरच सुरू होणार?
चेरनोबिलमध्ये प्राण्यांच्या संख्येत वाढीचे कारण काय?
चेरनोबिलमध्ये तेथील स्थानिक पुन्हा वस्तीला आलेच नाहीत. पण लांडगे आणि घोडे यांसारखे वन्यजीव आपत्तीनंतर ३५ वर्षांहून अधिक काळ रिकाम्या असलेल्या शहराच्या पडीक भागात फिरत असतात. त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच तिथे एक जंगलच वसले आहे. चेरनोबिल किरणोत्सर्ग क्षेत्र- सीईझेड ऱ्हासानंतर निसर्गाच्या पुनर्निर्मितीचे हे अतिशय आश्चर्यकारक उदाहरण आहे असे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या ‘नेचर फॉर क्लायमेट’ शाखेचे प्रमुख, टिम क्रिस्टोफरसन यांनी म्हटले आहे. जगातील सर्वात घातक आण्विक अपघातानंतर, मानवाच्या अनुपस्थितीत निसर्गाची भरभराटच होते, असे आणखी एका शास्त्रज्ञाचे मत आहे. करोना साथ आणि रशियाच्या आक्रमणामुळे अलीकडच्या काळात डॉ. लव्ह आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील संशोधनासाठी सीईझेडमध्ये परत जाता आलेले नाही.