हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीवर कठोर निर्बंध लादले आहेत. अन्न, पाणी आणि वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी गाझापट्टीतील नागरिक इजिप्तकडील सीमेजवळ आश्रय घेत आहेत. तिथेही अन्न-पाण्याची कमतरता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्रायल आणि हमास यांच्यात चाललेल्या संघर्षामुळे सामान्य पॅलेस्टिनी नागरिक होरपळून निघाला आहे. ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री हमासने इस्रायलवर अचानक हल्ला करून संपूर्ण जगाला धक्का दिला. त्यानंतर इस्रायलनेही चोख प्रत्युत्तर देत गाझापट्टीवर हवाई हल्ले केले. दोन दिवसांपासून जमिनी हल्ल्याची धमकी देत असलेल्या इस्रायलने गाझापट्टीतील नागरिकांना इजिप्तची सीमा असलेल्या दक्षिण दिशेकडे जाण्यास भाग पाडले. आधीच इस्रायलच्या नाकेबंदींमुळे हैराण झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांसमोर आता आभाळच कोसळले आहे. “वीज नाही, पाणी नाही, इंटरनेट नाही… आता माणुसकीचाच अंत जवळ आलाय, असे वाटते”, अशा शब्दांत गाझापट्टीतील ५५ वर्षीय मोना अब्देल हमीद या महिलेने आपली व्यथा मांडली. इजिप्तला लागून असलेल्या रफाह सीमा चौकीजवळ आपल्या नातेवाईकाच्या घरी जात असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मोना यांच्याप्रमाणेच गाझापट्टीतील अनेकजण आपली व्यथा मांडत आहेत. फर्स्टपोस्ट या संकेतस्थळाने याबाबत सविस्तर लेख दिला आहे.

इस्रायलचा भयंकर हवाई हल्ला आणि जमिनीवरून हल्ला करण्याच्या भीतीने गाझापट्टीतील सामान्य नागरिकांची भीतीने गाळण उडाली आहे. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीतील पाणी, वीजपुरवठा खंडीत केला होता. त्यानंतर दाट लोकवस्तीच्या परिसरात रविवारपासून (१५ ऑक्टोबर) पुन्हा एकदा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, तरीही तो पुरेसा नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. बॉम्ब वर्षाव झेलणारे नागरिक विना अन्न-पाण्यामुळे जास्त हैराण झाले आहेत.

४३ वर्षीय अहमद हमीद यांनी आपली पत्नी आणि सात मुलांसह गाझा शहरातून पळ काढला असून रफाह येथे आश्रय घेतला. एएफपी या वृत्तसंस्थेला माहिती देताना हमीद यांनी सांगितले, “आठवड्याभरापासून आम्ही अंघोळ केलेली नाही. शौचालयाला जायचे असेल तर आम्हाला बराच काळ रांगेत उभे राहावे लागत आहे. पुरेसे अन्न नाही. बाजारात वस्तुंचा अपुरा पुरवठा आहे आणि ज्या वस्तू उपलब्ध आहेत, त्याचे दर गगनाला भिडले आहेत. आम्हाला खाण्यासाठी फक्त टूना कॅन (टूना माश्याचे मास असलेले डबे) आणि चीज मिळू शकले. आपण काहीही करू शकत नाही, या भावनेने माझ्या मनावर खूप दडपण आले आहे.” या शब्दात हमीद यांनी आपली खंत बोलून दाखविली.

संयुक्त राष्ट्राने अंदाज व्यक्त केल्यानुसार, इस्रायलने हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्यापासून गाझापट्टीतील दहा लाख लोक आल्या घरातून विस्थापित झाले आहेत. हमासच्या हल्ल्यामुळे इस्रायलमधील १,४०० लोकांचा बळी गेला होता. त्यापैकी अनेकजण सामान्य नागरिक होते. त्यानंतर इस्रायलकडून केलेल्या हल्ल्यात जवळपास २,६७० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यापैकी अनेकजण हे सामान्य पॅलेस्टिनी नागरिक होते. इस्रायलने बॉम्ब हल्ल्यासोबतच पाणी, वीज यांचा पुरवठा खंडीत केल्यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांचे जीवन असह्य झाले आहे.

विस्थापितांसारखे जगणे

सर्वात वाईट आणि भयंकर गोष्ट म्हणजे आम्हाला पाणी मिळत नाही. पाण्याची कमतरता असल्यामुळे आमच्यापैकी कुणीही अंघोळ करत नाहीये, अशी खंत ५० वर्षीय सबाह मस्बाह या महिलेने एएफपीशी बोलताना व्यक्त केली. २१ नातेवाईकांसह त्यांनी रफाहमध्ये आश्रय घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी शाळा चालविणाऱ्या युनिस खान यांनी सांगितले की, आमच्या घरी गाझापट्टीतून अनेक लोक आश्रयासाठी आले आहेत. त्यांच्यासाठी पुरेसे अन्न-पाणी आमच्याकडे नाही.

ज्या लोकांनी संयुक्त राष्ट्रांच्या रिलीफ अँड वर्क्स एजन्सीच्या (UNRWA) शाळेत आश्रय घेतला आहे, त्यांनाही अन्न व पाण्याची कमतरता भासत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीचे संवाद विभागाचे संचालक ज्युलिएट टॉमा एएफपीला माहिती देताना म्हणाल्या, “गाझापट्टीतून आणखी काही लोक विस्थापित होण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या इशाऱ्यानंतर अनेक लोक आपले घर सोडत आहेत.”

इस्रायलने गाझापट्टीवर भू-आक्रमण करण्यापूर्वी सैन्य आणि शस्त्राची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. गाझापट्टीतील नागरिकांना दक्षिणेकडे जाण्याचा प्रस्ताव दिल्यानंतरही दक्षिणेकडील रफाह आणि अन्य शहरांवरही हवाई हल्ले सुरू आहेत. येथील एका नागरिकाने सांगितले की, डॉक्टरांच्या घराला लक्ष्य करण्यात आले आहे.

खमीस अबू हिलालने सांगितले की, माझ्या पूर्ण कुटुंबाचा बळी गेला. तर रफाह येथे राहणाऱ्या एका रहिवाशाने त्याच्या घरावर झालेल्या गोळीबाराचे ताजे निशाण दाखविले. मी कमालीचा विध्वंस पाहिला. त्यांनी (इस्रायलने) सांगितले की, इथे दहशतवाद आहे. आमचा त्यांना प्रश्न आहे की, ते सांगत असलेली माणुसकी मग नेमकी कुठे आहे? अशी उद्विग्न प्रतिक्रिया घरावर गोळीबार झालेल्या रहिवाशाने दिली. दुसऱ्या एका रहिवाशाने म्हटले की, या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक राहत होते, कोणत्याही संघटनेशी त्यांचे काही देणेघेणे नव्हते. तरीही ते मारले गेले. त्यांचे आता कुणीही मागे उरले नाही.

समीरा कसाब यांनी बॉम्बहल्ल्यात उदध्वस्त झालेल्या घराच्या अवशेषाजवळ येऊन आक्रोश केला. आता आम्ही कुठे जायचे? अरब राष्ट्र कुठे आहेत? ते आमच्या मदतीला का नाही येत? असा प्रश्न भग्नावस्थेत असलेल्या घरासमोर समीरा उपस्थित करतात. आमचे संपूर्ण आयुष्य विस्थापितांचे जीवन जगण्यात गेले. आमचे घर आज जमीनदोस्त झाले असून आम्हाला आमच्या मुलाबाळांसह रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.

समीरा कसाब पुढे म्हणाल्या, “आम्ही एकटे पडले आहोत. माझ्या मुलीला कर्करोग आहे, तिला आता रुग्णालयात कसे नेऊ? मीसुद्धा उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची रुग्ण आहे.”

मागच्या नऊ दिवसांपासून इस्रायलकडून होणाऱ्या भीषण हल्ल्यामुळे गाझापट्टीतील असंख्य सामान्य नागरिकांच्या अशाचप्रकारच्या भावना आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No food no water no internet how gaza strip deprived of water in israeli attack kvg