भारतीय लष्कराने सैनिकांच्या गणवेशाबाबतचे नियम पुन्हा एकदा अधोरेखित करीत, ते कटाक्षाने पाळण्याची आठवण करून दिली आहे. गळ्यामध्ये धार्मिक चिन्ह घालणे अथवा कोणतेही धार्मिक प्रतीक गणवेशावर न बाळगण्याबाबतचे नियम कसोशीने पाळण्याबाबत हे नियम आहेत. लष्करातील काही सैनिक धार्मिक निशाणी, माळ अथवा तत्सम गोष्टी परिधान केल्याचे काही समाजमाध्यमांवरील पोस्ट्समधून दिसून आले. त्यानंतर पुन्हा एकदा गणवेशाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराचे हे नवे नियम गणवेश आणि त्यावर परिधान केली जाणारी धार्मिक चिन्हे वा प्रतीके यांच्याबाबत आहेत. कोणत्या गोष्टींना परवानगी आहे आणि कोणत्या नाही, याबाबतही सुस्पष्ट कल्पना या नियमांमध्ये देण्यात आली आहे. ‘डिफेन्स सर्व्हिसेस रेग्युलेशन अॅण्ड आर्मी ड्रेस रेग्युलेशन्स’मध्ये कपडे आणि इतर वस्तूंबाबत तपशीलवार सूचनांची यादी दिली आहे.

हेही वाचा : हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत अंधश्रद्धाविरोधी कायद्याची मागणी; काय आहे महाराष्ट्रात लागू असलेला हा कायदा?

गणवेशाबरोबरच धार्मिक गोष्टी परिधान करण्याबाबत लष्कराचे नियम काय सांगतात?

लष्कराचे नियम स्पष्टपणे सांगतात की, गणवेशाबरोबर कोणतेही मनाई करण्यात आलेले दागिने अथवा प्रतीके परिधान करू नयेत. एखादे चिन्ह असलेली अंगठी घालण्यास परवानगी आहे; मात्र गणवेशाबरोबर उघडपणे दिसेल अशा पद्धतीने घड्याळ, चेन आणि गळ्यामध्ये छोटासाही दागिना घालण्यास परवानगी नाही. लष्करातील गणवेशाबाबतचे नियम स्पष्टपणे सांगतात की, गळ्यामध्ये चेन अथवा कोणत्याही प्रकारचा धागा परिधान करू नये. जर घातला असेलच, तर तो बाहेरून दिसणार नाही अशा पद्धतीने गणवेशाच्या आत योग्य प्रकारे लपवलेला असला पाहिजे. ‘गणवेशाबरोबर लहान दागिना वा धार्मिक प्रतीक परिधान करण्याबाबतच्या’ नियमांमधील परिच्छेदात असे नमूद आहे, “गणवेशात असताना कोणताही सैनिक हातामध्ये कोणत्याही प्रकारचे कडे घालणार नाही. पूजेच्या दिवशी मनगटावर एकच पवित्र धागा घातला जाऊ शकतो (अनेक धाग्यांना परवानगी नाही.) ‘कडे’ फक्त शीख अधिकारी, जेसीओ (आणि शीख सैन्याचे नेतृत्व करणारे पण शीखधर्मीय नसलेले अधिकारी परिधान करू शकतात. गणवेशात असताना कपाळावर टिळा, विभूती वा तत्सम कोणतेही धार्मिक प्रतीक लावता येणार नाही.”

महिला सैनिकांसाठी कोणते नियम आहेत?

लष्कराच्या नियमांनुसार, गणवेशात असताना लग्न झालेल्या महिला वरून दिसणार नाही अशा पद्धतीने गळ्यामध्ये मंगळसूत्र घालू शकतात. मेकअप आणि सौंदर्यप्रसाधनांबाबतचे नियमही बरेच कडक आहेत. या नियमांनुसार लिपस्टिक आणि नेल पॉलिश लावण्यास मनाई आहे. कपाळावर टिकली लावण्यासही परवानगी नाही. गणवेशात असताना डोक्याच्या भांगामध्ये सिंदूर (कुंकू) लावता येऊ शकते; मात्र, ते गणवेशात समाविष्ट असणारी टोपी घातल्यावर दिसणार नाही अशा पद्धतीनेच लावलेले असावे. या नियमांमध्ये असे म्हटले आहे, “भारतीय लष्कराचा गणवेश परिधान करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी कोणताही मेकअप आणि सौंदर्यप्रसाधनांचा वापर करू नये. खोटे आयलॅशेस, आयलायनर, काजळ तसेच कोणत्याही प्रकारचा मेकअप करण्यास परवानगी नाही. फक्त पारदर्शक नेल पेंट लावण्यास परवानगी आहे. बाहेर कार्यरत असताना सूर्यप्रकाशापासून संरक्षण देणारे फेशियल क्रीम वापरण्यास परवानगी आहे. गणवेशात असताना हातावर मेंदी लावण्यास मनाई आहे.”

हेही वाचा : ब्रिटनमधील प्रत्येक निवडणुकीचे मतदान गुरुवारीच घेण्यामागे काय आहे कारण?

दागिन्यांबाबत काय नियम आहेत?

लहान कानातले आणि साखरपुड्याची/लग्नाची/चिन्हांकित अंगठी यांचा अपवाद वगळता इतर कोणताही दागिना गणवेशाबरोबर घातलेला चालणार नाही. महिला कर्मचाऱ्यांना फक्त एकाच ठिकाणी कान टोचण्याची परवानगी आहे. गणवेश परिधान केलेला असताना लहान आकाराचे कानातले घालण्यास परवानगी आहे. त्याचा आकार ५ मिमीपेक्षा व्यासाहून अधिक नसावा. महिलांनी नाक टोचलेले असल्यास चालू शकते; मात्र गणवेशात असताना नाकात कोणताही दागिना घालू नये. मेस ड्रेस घातलेला असताना २.५ मिमी पेक्षा जास्त व्यास नसलेला हलक्या रंगाचा एकच मुगवट परिधान केला जाऊ शकतो. ‘फॅन्सी’ कानातले, नाकातले घालण्यास परवानगी नाही. डाव्या हाताच्या बोटामध्ये साखरपुड्याची अथवा लग्नाची अंगठी परिधान केली जाऊ शकते. मात्र, कवायत करताना वा औपचारिक कार्यक्रमात ती परिधान करू नये.

इतर कोणते नियम लागू आहेत?

गणवेशामध्ये असताना अत्तर, डिओडरंट्स अथवा कोणतीही सुवासिक गोष्ट शरीरावर लागू करण्यास परवानगी नाही. दाढी केल्यानंतर ‘आफ्टर-शेव्ह’ लावता येऊ शकते. घड्याळ अथवा बॅण्ड घालू नये. कारण- त्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. चमकदार-रंगीत घड्याळे किंवा घड्याळाच्या बॅण्डलादेखील परवानगी नाही. साखळी असलेली पॉकेट घड्याळेदेखील चालणार नाहीत. औपचारिक कवायतीदरम्यान, कवायत क्रम नियंत्रित करणाऱ्या वरिष्ठ सैनिकाशिवाय इतर कोणत्याही सदस्याने घड्याळ घालू नये.