No secret chamber found inside Jagannath temple: ओडिशाचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी अलीकडेच स्पष्ट केले की, पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या रत्न भांडारात कोणतेही गुप्त तळघर नाही. मंत्र्यांची ही घोषणा मंदिराच्या रत्न भांडाराचे सर्वेक्षण झाल्यानंतर करण्यात आली. हे सर्वेक्षण भारतीय पुरातत्त्व खाते (एएसआय) आणि नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनजीआरआय) येथील वरिष्ठ तज्ज्ञांनी सप्टेंबर महिन्याच्या मध्यात केले होते. समिती लवकरच मंदिर प्रशासनाला आपला अंतिम अहवाल देणार आहे. मंदिरात ‘गुप्त तळघर’ असल्याच्या दाव्यांचा मुद्दा उपस्थित केला जात होता आणि त्यामुळेच सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण कसे झाले याविषयी सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.
अधिक वाचा: विश्लेषण: पुरीचा जगन्नाथ पंथ नेमका आला कुठून?
जगन्नाथ मंदिरातील गुप्त तळघराचे मिथक
जगन्नाथ मंदिराच्या रत्न भांडाराबद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत..त्यातीलच एक म्हणजे गुप्त तळघराची. या मिथकासाठी कोणत्याही स्वरूपाचा कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही. या मिथकांनुसार पुरीच्या इतिहासकालीन शासकांनी आक्रमकांपासून भगवान जगन्नाथांच्या दागिन्यांचे संरक्षण करण्यासाठी गुप्त तळघर तयार केले होते. गेल्या काही दशकांत हे मिथक अधिक प्रसिद्ध झाले आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ रत्नभांडार बंद असल्यामुळे या मिथकांना आणखी बळ मिळाले.
तांत्रिक सर्वेक्षणाला का सुरुवात करण्यात आली?
ओडिशा सरकारने जुलै महिन्यामध्ये ४६ वर्षांनंतर रत्नभांडाराचे द्वार उघडले. मंदिराच्या सेवकांसह विविध गटांकडून रत्न भांडारातील तळघर शोधण्यासाठी तपशीलवार सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली होती. मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिव्यसिंह देब यांनी सांगितले की, एएसआयने (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग) लेसर-स्कॅनिंग सारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून गुप्त तळघराबाबतची शंका दूर केली आहे. मूलतः राज्य सरकारच्या मानक कार्यपद्धतीत (एसओपी) तांत्रिक सर्वेक्षण समाविष्ट नव्हते, तरी मंदिर प्रशासनाने या व्यापक मागणीचा विचार करून सरकारची मंजुरी मागितली होती. मंजुरी मिळाल्यानंतर, प्रशासनाने एएसआयला हे सर्वेक्षण करण्यासाठी अधिकृतरित्या विनंती केली.
अधिक वाचा: Indian History: भारताने त्याच्या इतिहासात गुंतवणूक करायला हवी!
तांत्रिक सर्वेक्षणात काय करण्यात आले?
१८ सप्टेंबर रोजी एएसआयचे अतिरिक्त महासंचालक जन्हविज शर्मा यांच्या नेतृत्वाखालील १७ सदस्यांच्या टीमने मंदिराच्या अधिकाऱ्यांसह रत्नभांडारात प्रवेश केला आणि दुपारी २ ते ५ या दरम्यान सुमारे ३ तास या कक्षाचे निरीक्षण केले. त्यांनी लेसर स्कॅनिंग केले. या टीमने रत्न भांडाराच्या भिंती, छत आणि मजले यांचे प्रत्यक्ष निरीक्षणही केले आणि ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (जीपीआर) सर्वेक्षणासह दुसऱ्या तपासणीची शिफारस केली.
तर जीपीआर सर्वेक्षण २१ आणि २२ सप्टेंबर रोजी करण्यात आले. हैदराबादमधील नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे (एनजीआरआय) तज्ञ सुमारे आठ तास सर्वेक्षणासाठी उपस्थित होते. जीपीआर सर्वेक्षण भूमीखालील थर, संरचना आणि इतर बाबींचे मॅपिंग आणि मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते. एनजीआरआयच्या टीमने २००, २०० आणि ९०० MHz च्या फ्रिक्वेन्सी असलेल्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला. यामुळे मजल्याच्या १० मीटर आतपर्यंतचा डेटा गोळा केला गेला. एनजीआरआयच्या टीमने डेटा १० दिवसांहून अधिक काळ प्रक्रियेत ठेवून तो एएसआयकडे अहवाल स्वरूपात सादर केला आहे.
प्राथमिक निष्कर्ष
जरी एएसआयने अंतिम अहवाल अद्याप सादर केलेला नसला तरी, ओडिशाचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी सांगितले की, एएसआयबरोबरच्या प्राथमिक चर्चेत असे संकेत मिळाले आहेत की रत्न भांडारात कोणतेही गुप्त तळघर नाही. मात्र, या सर्वेक्षणामुळे खजिन्यातील भेगांचे तपशीलवार निरीक्षण करणे सरकारला शक्य झाले आहे. या निरीक्षणाच्या आधारावर एएसआयकडून योग्य संवर्धनाची उपाययोजना करण्यात येईल.
रत्न भांडाराशी संबंधित आणखी एक दंतकथा
रत्न भांडारात देवतांच्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करणाऱ्या सापांच्या गटाबद्दलची आणखी एक दंतकथा आहे. रत्न भांडाराच्या अंतर्गत कक्षातून फुत्कारांचे आवाज येत असल्याचे दावे करण्यात आले आहेत. या अफवांमुळे, सरकारने १४ जुलै रोजी रत्न भांडार उघडताना मंदिराच्या परिसरात सर्पमित्रांच्या टीमची नियुक्ती केली होती. परंतु, रत्न भांडारात प्रवेश केलेल्या या टीमने कोणतेही साप, सरपटणारे प्राणी किंवा कीटक आढळले नसल्याचे सांगितले.