Nobel Peace Prize : भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अवघ्या जगाला अहिंसेचा संदेश दिला. ब्रिटिश राजवटीच्या आक्रमक आणि क्रूर वृत्तीसमोर अहिंसात्मक आणि शांततापूर्ण मार्गाने सत्याग्रह करून आपलं म्हणणं ठामपणे अधोरेखित करण्याचा मार्ग महात्मा गांधींनी तमाम भारतीयांना दाखवला. नंतर अवघ्या जगानं तो ऐकला, पाहिला आणि अनुभवला! आजपर्यंत अवघ्या जगानं गांधीजींच्या कार्याचा गौरव केला. पण जगात सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शांततेच्या नोबेल पुरस्काराने आजपर्यंत महात्मा गांधींना सन्मानित करण्यात आलेलं नाही. वेळोवेळी यावर जागतिक पटलावरही चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, अजूनपर्यंत गांधीजींना हा पुरस्कार का जाहीर करण्यात आला नाही? नेमकं यामागचं कारण काय?
बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बिलियात्स्की, रशियातील मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनची मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या तिघांमध्ये यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने पुन्हा एकदा अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींना त्यांच्या हयातीत किंवा मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर न झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकरंग विशेष : गांधी एक अपरिहार्य रहस्य
नोबेल समितीलाच पडलाय प्रश्न!
महात्मा गांधींना कधीही न मिळालेला नोबेल पुरस्कार हा जसा जगभरातल्या विचारवंतांसाठी गूढ बनून राहिलेला प्रश्न आहे, तसाच तो खुद्द नोबेल पारितोषिक समितीलाही पडलेला प्रश्न आहे. नोबेल पारितोषिक संकेतस्थळावरच यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. “नॉर्वेच्या नोबेल समितीचा आवाकाही संकुचित आहे का? युरोपच्या बाहेरील लोकांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची दखल घेण्यात समितीचे सदस्य अक्षम आहेत का? की मग अशा प्रकारे पुरस्कार जाहीर केला, तर त्यांचे ब्रिटनशी असलेले संबंध बिघडतील याची समितीच्या सदस्यांना भीती वाटतेय?” असे प्रश्न या संकेतस्थळावर उपस्थित करण्यात आले आहेत.
‘महात्मा गांधी..दी मिसिंग लॉरेट’
नोबेल पारितोषिक संकेतस्थळावर ‘महात्मा गांधी..दी मिसिंग लॉरेट’ अशा नावाचा स्वतंत्र विभागच असून त्यामध्ये इतिहासाची काही निरीक्षणं नोंदवण्यात आली आहे. “१९६०पर्यंत नोबेल पुरस्कार हे फक्त अमेरिकी आणि युरोपीय नागरिकांनाच जाहीर केले जात होते. त्यामुळे व्यापक अर्थाने नॉर्वेच्या नोबेल पुरस्कार समितीचा दृष्टीकोन या बाबतीत संकुचित दिसतो. आधीच्या पुरस्कार विजेत्यांपेक्षा महात्मा गांधी हे फार वेगळे होते. ते खरे राजकारणीही नव्हते, आंतरराष्ट्रीय कायद्यांचे समर्थकही नव्हते, मानवतावादी कार्यकर्तेही नव्हते किंवा आंतरराष्ट्रीय शांतता काँग्रेसचं आयोजनवगैरेही त्यांनी कधी केलं नाही. ते कदाचित वेगळ्याच श्रेणीतील व्यक्तीमत्व होते”, असं या संकेतस्थळावर महात्मा गांधींबद्दल नमूद करण्यात आलं आहे.
विश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय?
गांधीजींना कधीच नोबेलसाठी नामांकन मिळालं नाही?
महात्मा गांधींना आजपर्यंत कधीच नोबेल पारितोषिक मिळालं नसलं, तरी त्यांना तब्बल १० वेळा नामांकन मिळालं होतं. सर्वात आधी १९३७, १९३८ आणि १९३९ अशी सलग तीन वर्ष नॉर्वेच्या संसदेतील कामगार पक्षाचे सदस्य ओले कॉल्बजोरनसेन यांनी महात्मा गांधींना शांततेचं नोबेल पारितोषिक देण्यात यावं यासाठी नामांकन दिलं होतं. मात्र, “गांधीजी हे एक चांगलं व्यक्तीमत्व असलं, तरी त्यांनी अनेकदा धोरणं बदलली आहेत. त्यामुळे ते स्वातंत्र्यसैनिकही आहेत, पण त्याचवेळी ते हुकुमशाहसुद्धा ठरतात. ते एक आदर्शवादीही आहेत आणि राष्ट्रवादीही आहेत”, असं म्हणत तत्कालीन समितीचे सल्लागार प्राध्यापक जेकब वॉर्म-म्युलर यांनी हे नामांकन फेटाळून लावलं होतं. ‘गांधीजींचे विचार खऱ्या अर्थाने विश्वव्यापी नसून दक्षिण आफ्रिकेतील त्यांचा लढा हा फक्त भारतीयांच्या वतीने होता, तिथल्या कृष्णवर्णीयांसाठी नाही’, अशी टीका गांधीजींवर करणाऱ्या टीकाकारांचा संदर्भ म्युलर यांनी त्यावेळी दिला.
१९४७मध्ये पुन्हा एकदा गांधीजींना नोबेल पारितोषिक देण्यात यावं यासाठी बी. जी. खेर, जी. व्ही. मावलणकर आणि जी. बी. पंत या मान्यवरांनी नामांकन दिलं. यावेळचे समितीचे सल्लागार इतिहासतज्ज्ञ जेन्स अरूप सेप यांनी गांधीजींच्या बाजूने अहवाल दिला असला, तरी त्यात गांधीजींना पुरस्कार देण्यास पाठिंबा दर्शवला नव्हता, असं नोबेल पारितोषिक संकेतस्थळावर नमूद करण्यात आलं आहे. तेव्हाच्या समितीमधील दोन सदस्यांनी गांधीजींना नोबेल दिलं जावं, या बाजूने मतदान केलं होतं. पण उरलेल्या तिघांनी याविरोधात मतदान केल्यामुळे गांधीजींना तेव्हा नोबेल देण्यात आलं नाही.
विश्लेषण : नोटांवर महात्मा गांधींचा फोटो कधी आणि का छापला? वाचा इतिहास…
मरणोत्तर नोबेल देण्यात काय अडलं?
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास वर्षभरात गांधीजींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेच्या दोनच दिवस नंतर शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकन दाखल करण्याची मुदत संपली. गांधीजींना नोबेल दिलं जावं, यासाठी तब्बल सहा नामांकनं दाखल झाली होती. यामध्ये १९४६ आणि १९४७च्या नोबेल पुरस्कार विजेत्यांचाही समावेश होता. पण इथे तांत्रिक कारण पुढे करत गांधीजींना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यास नकार देण्यात आला.
अपवादात्मक परिस्थिती मरणोत्तर नोबेल पुरस्कार प्रदान करण्याची तरतूद नोबेलच्या नियमावलीमध्ये आहे. मात्र, महात्मा गांधी हे कोणत्याही संस्थेचे सदस्य नव्हते. शिवाय त्यांनी मृत्यूपूर्वी मृत्यूपत्रही लिहून ठेवलेलं नव्हतं. त्यामुळे पुरस्काराची रक्कम कुणाला सोपवावी, याविषयी संदिग्धता असल्याचं सांगत हा पुरस्कार नाकारण्यात आला!
विश्लेषण : ७२ वर्षांपूर्वीची ‘पोन्नियिन सेल्वन’ ही कादंबरी आजही इतकी लोकप्रिय का आहे? जाणून घ्या
इतिहासातील या घडामोडी काय दर्शवतात?
महात्मा गांधीजींना शांततेचं नोबेल न मिळण्याच्या या प्रवासाचा आढावा घेतल्यास काही गोष्टी ठळकपणे समोर येतात. १९६० साली वर्णभेदविरोधी कार्यकर्ते अल्बर्ट जॉन ल्युट्युली यांना शांततेचं नोबेल जाहीर झालं. तोपर्यंत शांततेचं नोबेल फक्त युरोपीय किंवा अमेरिकी नागरिकांनाच दिलं जात होतं. शिवाय, नोबेल पारितोषिक समितीच्या कागदपत्रांवरून असं कुठेही दिसून येत नाही की ब्रिटनशी संबंध बिघडण्याच्या भीतीपोटी महात्मा गांधींना आजपर्यंत शांततेचं नोबेल नाकारण्यात आलं. १९४७ साली नोबेल समितीतील बहुतांश सदस्यांनी महात्मा गांधीजींबद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवून त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करणं नाकारलं.