बांगलादेशचे नागरिक असलेले नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. देशातील कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आरोपात दोषी आढळल्यामुळे न्यायालयाने ही कारवाई केली आहे. युनूस यांनी जगाला सूक्ष्म वित्तीय कर्ज प्रणाली दिली असून, त्याचा जगभरातील गरीब लोकांना फायदा झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर मुहम्मद युनूस यांना तुरुंगवासाची शिक्षा का झाली? त्यांच्यावर काय आरोप आहेत? हे जाणून घेऊ…

मुहम्मद युनूस यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास

न्यायालयाने दिलेल्या या शिक्षेनंतर युनूस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया, तसेच तर्क बाजूला ठेवून मला ही शिक्षा देण्यात आली आहे, असे युनूस म्हणाले आहेत. तर, हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. शिक्षेनंतर त्यांनी लगेच जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केल्यामुळे ते सध्या बाहेर आहेत. मुहम्मद युनूस हे एक प्राध्यापक आहेत. गेल्या काही वर्षांपासून युनूस आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यातील संबंध चांगले नाहीत.

Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
AMU minority status upheld 1967 decision quashed by Supreme Court
‘एएमयू’चा अल्पसंख्याक दर्जा कायम, १९६७ चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; नियमित खंडपीठात सुनावणी
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
DY Chandrachud landmark verdicts
DY Chandrachud Important verdicts: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त; कशी होती त्यांची कारकीर्द? जाणून घ्या, त्यांचे काही ऐतिहासिक निर्णय
person in jail to contest polls candidates win polls from prison prison contest polls
एक काळ असा होता…
Delhi High Court
Delhi High Court : वकिलाकडून न्यायमूर्तीवर अपमानास्पद टिप्पणी; दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावली चार महिन्यांची शिक्षा
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक

मुहम्मद युनूस यांच्याविरोधात कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याबरोबरच अन्य अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये भ्रष्टाचार, निधीचा गैरवापर अशा आरोपांचा समावेश आहे.

मुहम्मद युनूस कोण आहेत?

मुहम्मद युनूस हे प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आहेत. १९४० साली चितगाव येथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी १९६९ साली अमेरिकेतील टेनेसी येथील वॅंडरबिल्ट विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी.ची पदवी मिळवली. पीएच.डी. मिळाल्यानंतर ते मिडल टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले. १९७२ साली बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर ते बांगलादेशमध्ये परतले. बांगलादेशमध्ये परतल्यावर ते चितगाव विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख झाले.

कोणतेही तारण न घेता कर्ज देण्याची योजना

बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर तेथील परिस्थिती फार बिकट होती. गरिबीशी सामना करीत तेथील अर्थव्यवस्था बळकट करणे गरजेचे होते. याच काळात युनूस यांनी आपल्या कल्पक बुद्धीने वेगवेगळ्या योजना आणल्या; जे लघुउद्योजक बँकांकडून कर्ज घेण्यास अपात्र होते, त्यांना युनूस यांनी कर्ज देण्याचे ठरवले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो प्रयोग मोठ्या स्तरावर राबवला जाऊ शकतो, असे युनूस यांना वाटू लागले. त्यांनी बांगलादेशच्या वेगवेगळ्या भागांत हे प्रारूप लागू केले. त्यांच्या मेहनतीनंतर अवघ्या सात वर्षांत म्हणजेच १९८३ साली ग्रामीण बँक नावारूपाला आली.

३४.०१ अब्ज डॉलर्सचे कर्जाचे वितरण

ग्रामीण बँकेमुळे लक्षावधी लोक गरिबीतून बाहेर आले, असे म्हटले जाते. बांगलादेशमधील डेली सन या वृत्तपत्रानुसार या बँकेने कोणतेही तारण न घेता, (Collateral free loans) साधारण ९.५५ दशलक्ष लोकांना ३४.०१ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते. विशेष म्हणजे या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण हे ९७.२२ टक्के होते. सध्या युनूस यांच्या संकल्पनेवर आधारित साधारण १०० देशांत अशा प्रकारच्या ग्रामीण बँका कार्यरत आहेत.

गरिबांचे बँकर म्हणून ओळख

त्यांच्या या कार्याची दखल घेत २००६ साली ग्रामीण बँक, तसेच युनूस यांना संयुक्तपणे शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. पुढे युनूस यांना गरिबांचे बँकर म्हणून ओळखले जाऊ लागले.

युनूस आणि शेख हसीना यांच्यात वाद का?

नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर युनूस यांनी राजकारणात येण्याचा प्रयत्न केला. ते स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करू लागले. याच काळात खंडणीच्या आरोपांखाली शेख हसीना तुरुंगात होत्या. त्यांना युनूस यांची ही कल्पना आवडली नाही. पुढच्या काही महिन्यांत युनूस यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार सोडून दिला. कारण- त्यांच्या या भूमिकेला फारसा प्रतिसाद लाभला नाही. पुढे २००९ साली शेख हसीना सत्तेत आल्या. त्यानंतर युनूस यांच्या कामांची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला. ग्रामीण बँकेचे प्रमुख असताना मुहम्मद यांनी गरिबांकडून कर्जवसुलीसाठी बळाचा, तसेच अन्य मार्गांचा वापर केला, असा आरोप त्यावेळी शेख हसीना यांनी केला होता.

युनूस यांना तुरुंगवासाची शिक्षा का देण्यात आली?

ढाकातील एका न्यायालयाने सोमवारी (१ जानेवारी २०२४) मुहम्मद युनूस यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. युनूस यांच्या ग्रामीण टेलेकॉम या कंपनीने कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही कंपनी ना-नफा तत्त्वावर स्थापन करण्यात आली होती. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार या कंपनीतील ६७ कामगारांना कामावर कायम करण्यात येणार होते; मात्र तसे करण्यात आले नाही. तसेच कामगार कल्याण निधी तयार करण्यात आला नव्हता. कंपनीच्या धोरणानुसार पाच टक्के लाभांश हा कर्मचाऱ्यांमध्ये वितरित करण्यात येणार होता; मात्र हादेखील नियम पाळण्यात आला नाही. याच प्रकरणात ग्रामीण टेलेकॉम कंपनीचे संचालक म्हणून न्यायालयाने युनूस यांना दोषी ठरवले आहे. त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

युनूस यांच्यावर अनेक आरोप

युनूस यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले. त्यांच्यावर वेगवेगळे १५० गुन्हे दाखल असल्याचे म्हटले जाते. २०१५ साली १.५१ दशलक्ष कर न भरल्याच्या आरोपाखाली त्यांना बांगलादेशच्या महसूल विभागाने नोटीस पाठवली होती. त्याच्या दोन वर्षांआधी नोबेल पुरस्कार, तसेच पुस्तकांतून मिळणारी रॉयल्टी बांगलादेश सरकारच्या परवानगीशिवाय स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला होता. २०११ साली युनूस यांना ग्रामीण बँकेच्या संचालक या पदावरून हटवण्यात आले. शासनाच्या सेवानिवृत्तीच्या नियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली होती.

जगभरातील नेत्यांनी व्यक्त केली चिंता

अशा वेगवेगळ्या आरोपांमुळेच जगभरातून चिंता व्यक्त करण्यात आली होती. गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या व्यक्तींनी एकत्र येत एक संयुक्त पत्र प्रसिद्ध केले होते. त्यात युनूस यांना न्यायालयीन कारवायांच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे, असे मत व्यक्त करण्यात आले होते. त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, तसेच माजी संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून यांचा समावेश होता