Supertech Twin Tower Demolition: नोएडात अनधिकृतपणे बांधण्यात आलेले भव्य ट्विन टॉवर्स आज जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. ९ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे ‘सुपरटेक’ कंपनीच्या मालकीचे महाकाय टॉवर्स पाडण्यात येणार आहेत. ‘एपेक्स’ ३२ मजली तर ‘सेयान’ हा टॉवर २९ मजल्यांचा आहे. हे महाकाय टॉवर्स पाडल्यानंतर तब्बल ३० मीटर उंचीपर्यंत ढिगारा तयार होण्याची शक्यता आहे. या ट्विन टॉवर्संना स्फोटकांच्या मदतीने दुपारी अडीचच्या सुमारास अवघ्या १३ सेकंदांमध्ये जमीनदोस्त करण्यात येणार आहे. या कामासाठी नोएडा परिसरात ५६० पोलीस, १०० राखीव दलाचे जवान आणि चार एनडीआरएफच्या (NDRF) टीम घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.
नोएडातील सेक्टर ९३ A मधील ‘एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण’ प्रकल्पातील या टॉवर्समध्ये ८५० फ्लॅट्स आहेत. नोएड-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेसवेला लागून असलेल्या या टॉवर्सची उंची १०० मीटर लांब म्हणजेच कुतुबमिनारापेक्षाची जास्त आहे. या टॉवर्सचं पाडकाम हाती घेण्याआधी लगतच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. टॉवर परिसराचा जवळपास ५०० मीटरचा भाग सील करण्यात आला आहे. या परिसरात पाडकामाशी निगडित अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणालाही प्रवेश नसणार आहे.
‘एडिफाय इंजिनीअरिंग’ला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले आहे. हे टॉवर्स पाडण्यासाठी ४६ जणांची टीम कार्यरत असणार आहे. टॉवर्स पाडण्यात आल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धुळ पसरण्याची शक्यता आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जीओ फायबर शीट्स बसवण्यात आल्या आहेत. ‘सुपरटेक’ कंपनीच्या मालकीचे हे टॉवर्स पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दिले होते. त्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. हा कालावधी नंतर २२ मे २०२२ पर्यत वाढवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तीनदा टॉवर्स पाडण्याची तारिख विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आज अखेर हा अनधिकृत टॉवर पाडण्यात येणार आहे.
असे पाडले जाणार टॉवर्स…
तब्बल ३ हजार ७०० किलो स्फोटकांचा वापर करून हे ट्विन टॉवर्स पाडण्यात येणार आहेत. ‘एपेक्स’ या इमारतीच्या खालच्या ११ मजल्यांवर आणि ‘सेयान’ इमारतीच्या मधल्या भागातील सात मजल्यांवर स्फोट घडवण्यात येणार आहे. अत्याधुनिक स्फोटकं आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हे टॉवर्स पाडण्यात येणार आहेत. शॉक ट्यूब्स, इलेक्ट्रिक डिटोनेटर्स या पाडकामासाठी वापरण्यात येणार आहेत.
१७७३ रोजी आयर्लंडच्या वॉटरफोर्डमधील ‘होली ट्रिनिटी कॅथेड्रॉल’ ही इमारत पाडण्यासाठी या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. त्यावेळी ६८ किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. कोचीमधील चार इमारती पाडण्यासाठी २०२० रोजी भारतात या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. पूल, बोगदे, इमारती पाडण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.
टॉवर्स पाडण्याचे नेमके कारण काय?
‘सुपरटेक’ कंपनीला न्यू ओखला औद्योगिक प्राधिकरणाने ९ मजल्यांचे १४ टॉवर्स बांधण्याची परवानगी २००५ मध्ये दिली होती. यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि बागेचा देखील समावेश होता. त्यानंतर २००९ मध्ये या प्रकल्पात सुधारणा करत ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे दोन भव्य टॉवर्स बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठीच्या नवीन आराखड्याला नोएडा प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली होती. अनधिकृत बांधकामाचा आरोप करत या प्रकल्पाविरोधात ‘द इमेरॉल्ड कोर्ट ओनर्स रेसिडेन्ट्स वेलफेअर’ने(RWA) २०१२ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बांधकाम अनधिकृत ठरवून २०१४ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते. या निकालाविरोधात ‘सुपरटेक’ कंपनी आणि नोएडा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते. इमारतीचे नियम आणि अग्निसुरक्षा धाब्यावर बसवून हे टॉवर्स बांधण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.